खेळ मांडियेला
By admin | Published: June 15, 2016 04:35 AM2016-06-15T04:35:15+5:302016-06-15T04:35:15+5:30
तो एकटाच होता. खेळायला कोणी नाही. मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत. त्याला कसेही करुन करमेना. ‘एकाकी न रमते’ तो परमात्मा एकटेपणाला कंटाळला.
(मनाचिये गुंथी)
- डॉ.गोविंद काळे
तो एकटाच होता. खेळायला कोणी नाही. मित्र नाहीत, मैत्रिणी नाहीत. त्याला कसेही करुन करमेना. ‘एकाकी न रमते’ तो परमात्मा एकटेपणाला कंटाळला.
‘एकोऽहं बहुस्यां प्रजायेय इति।’
त्याने जीवात्म्याची निर्मिती केली. सृष्टी निर्माण केली. तेव्हा कोेठे त्याला समाधान वाटले. अणुुरेणूतून चराचरातून तोच भरून उरला.
‘अत्य तिष्ठत् दशांगुलम्’
असे त्याचे वर्णन वेदांनीच केले आहे. एकूण काय तर खेळ सुरू झाला. हजारो वर्षे झाली तो चालू आहे. चालू राहणार आहे. कारण त्याचा खेळ, त्याची लीला कोण रोखणार?
मनुष्यप्राण्यानेही ईश्वराचा खेळ मनापासून स्वीकारला. चार दिवसाच्या लेकराने पाळण्यात पाय जरी हलविले तरी आईला आनंदाचे भरते येते. ती म्हणते ‘बाळ, बघ कसा खेळतोय! बाळाचा खेळ जन्मत:च सुरू झाला. मातेच्या पोटातही तो जीव लाथा मारण्याचा खेळ खेळायचा. त्याच्या लाथा आईला सुखावह वाटायच्या. हेच बाळ बालक झाले आणि आईला म्हणू लागले मी खेळायला जाऊ? याचा खेळ संपेना. घरात खेळ-बाहेर खेळ. आई रागावू लागली. तहान नाही-भूक नाही. दिवस नाही-रात्र नाही, कारटे दिवसभर खेळत असते. पुरे झाला तुझा खेळ. आता तिन्हीसांज झाली आहे. देवाचे म्हणायला घे.
आईला सृष्टीनिर्मात्या मोठ्या खेळाडूचे स्मरण होते. कारण सूत्रधार तोच आहे. आदि अंति राहणारा.
तो कान्हा काय कमी खेळ खेळला. झाडावर काय चढायचा, गोपींची वस्त्रे काय लपवायचा, गोपाळांना घेऊन चेंडू काय खेळायचा, दहीहंडी खेळायचा. परमेश्वर जन्मापासूनच खेळतच राहिला आहे. विठूरायाने खेळ नाही केला; परंतु संतानी मात्र त्याच्या दारात
‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई’
खेळाचे आणि जीवाचे जन्मापासून ते आतापर्यंतचे अतूट नाते आहे. थकलेल्या कुडीतील प्राणज्योत निघून जाते तेव्हा म्हणतात खेळ खलास झाला. आयुष्यभर खेळता खेळता अंतिम क्षण केव्हा येतो ते कधी कोणाला कळले आहे का? खेळ नीट जमला नाही तर होतो खेळखंडोबा.
संसार म्हणजे तरी काय? खेळायला दुसरा भिडू आला की सुरू होतो संसार. हार-जीत, सुख-दु:ख सारे खेळाचा अविभाज्य भाग बनतात. परमार्थात मात्र आपणच आपल्याशी खेळायचे-भिडूशिवाय. सर्वात अवघड खेळ. संताना मात्र हा खेळ चांगलाच जमला. तुकोबांना न्यायला विमान आले. आवली मात्र अहो! अहो म्हणत खालीच राहिली. परमार्थ वर जातो संसार खाली उरतो.