चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 07:37 AM2023-05-24T07:37:39+5:302023-05-24T07:40:14+5:30

आपोआप चलनातून बाहेर जाणाऱ्या नोटेसाठी इतकी महागडी कवायत का? सरकारने नोटबंदीच्या समाधीवर दोन हजाराच्या नोटेचे गुलाबी फूल वाहिले!

Playing with currency notes will burn your hands! | चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील!

चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील!

googlenewsNext

- योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया, सदस्य, जय किसान आंदोलन

दिल्लीतील तीन मूर्ती भवनामध्ये देशाच्या पंतप्रधानांचे संग्रहालय आहे. त्यात सध्या नरेंद्र मोदी यांचा कक्ष अपुरा आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या समाप्तीनंतर देश त्यांच्या बऱ्या-वाईट निर्णयांचा लेखाजोखा मांडील तेव्हा या कक्षात नोटबंदीचा कक्ष जरूर असेल. त्या कक्षात गुलाबी रंगाच्या दोन हजारांच्या नोटांनाही नक्कीच जागा मिळेल. 

या नव्या प्रकारच्या संग्रहालयात नोटबंदीसंबंधी जनमानसात जे किस्से तयार झाले त्यांनाही जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि काही होवो ना होवो, एका सुप्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या त्या अँकरचे क्लिपिंग तेथे नक्की असेल. नोटबंदीच्या दिवशी हे अँकर दोन हजाराच्या नोटेला लावलेल्या नॅनो चीपविषयी माहिती देत होते. मला अधिकार मिळाला तर रोपल गांधी या नावाने झालेले ट्वीटसुद्धा मी त्या संग्रहालयात ठेवीन. ‘विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजाराच्या नोटेत बसवलेल्या चिपशी फाइव्ह जी कनेक्शन जोडले जात नव्हते. आता नवीन पाच हजारांची फाइव्ह जी वाली सुपरनोट येईल.  काळा पैसा साठवणाऱ्यांनी ही नोट समजा कपाटात ठेवली, तर ती नोट स्वत: उबेर बुक करून रिझर्व्ह बँकेच्या कचेरीत पुन्हा दाखल होईल.’ असे हे ट्वीट म्हणते.

या कक्षात ८ नोव्हेंबर २०१६ च्या संध्याकाळपासून १९ मे २०२३ पर्यंतची नोटबंदीची कहाणी सांगितली जाईल. प्रारंभी पंतप्रधानांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप असेल. इतरही अनेक चेहरे असतील. देशभर लागलेल्या रांगा, निरूपयोगी झालेल्या नोटा हातात घेतलेल्यांचे भयभीत चेहरे, हे ही तेथे दिसतील. तेथे दस्तावेजही असतील यात संशय नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधूनमधून दिलेले आदेश, बँकांचे रोज बदलत गेलेले नियम... असे सगळे तेथे असेल.

प्रामाणिकपणे ते संग्रहालय उभे केले गेले तर ते हेही सांगेल की कोणत्याही अर्थतज्ज्ञांचे मत न घेता देशाच्या चलनाशी इतका मोठा खेळ कसा केला गेला..? रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी इशारा देऊनही हा निर्णय कसा घेतला गेला..? या संग्रहालयाला समजा भविष्याबद्दल काळजी असेल तर त्यात एक पॅनल असेल. ते नोटबंदीचे दावे आणि प्रत्यक्षात काय झाले ते समोरासमोर ठेवील.

नोटबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाला आळा बसेल, भ्रष्टाचार कमी होईल, असा दावा केला गेला होता. वास्तवात  रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार ९९.३ टक्के नोटा बॅंकांमध्ये परत आल्या. धन्नासेठ मंडळींचे पैसे बुडाले तर नाहीतच, मात्र गरिबांच्या कनवटीच्या काही नोटा नक्की सडल्या. काळा पैसा साठवणारे भ्रष्टाचारी लोक चलनी नोटांच्या गड्ड्या लपवून ठेवतात, असा समज नोटबंदी करण्यामागे होता. नंतर असे आढळले की काळा पैसा साठवणारे लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात; आणि आपले काळे पैसे ते बेनामी संपत्ती, जमिनी किंवा जडजवाहिरांमध्ये गुंतवतात. खोट्या नोटांची संख्या खूप होती असाही दावा केला गेला. नंतर खुद्द रिझर्व्ह बँकेनेच नंतर असे सांगितले की खोट्या नोटांचे प्रमाण केवळ ०.०००७ टक्के होते.

नोटबंदीचा हा गुलाबी रंगाचा  कक्ष आपल्याला एक प्रश्न येथे विचारील. जर प्रश्न पाचशे आणि हजाराच्या नोटांचा होता तर त्यावरचे उत्तर दोन हजाराची नोट कशी असू शकेल? जर हजाराच्या नोटेमुळे भ्रष्ट लोकांना पैसा साठवणे सोपे जात होते तर दोन हजाराच्या नोटेमुळे ते आणखी सोपे होणार नव्हते का? - या प्रश्नाचे उत्तर ना त्यावेळी मिळाले, ना नंतर कधी. नोटबंदीच्या तुघलकी निर्णयाबद्दल सरकारने कधीच जनतेची माफी मागितली नाही. काळा पैसा संपल्याचे दावे करून निवडणूक मात्र जिंकली. काही वेळा नोटबंदीवर जल्लोष साजरा करून नंतर हा विषय विस्मरणात ढकलला गेला. 

२०१८ साली सरकारने गुपचूप दोन हजाराच्या नोटा छापणे बंद केले आणि जेवढ्या छापून झाल्या होत्या, त्याही १९ मे २३ पासून परत घेण्याची घोषणा केली. दरबारी मंडळींनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरुद्ध अंतिम लढाई सुरू झाल्याचा दावा केला; परंतु, यावेळी ऐकायला कोणीच नव्हते. रिझर्व्ह बँकेने सांगितले, दोन हजाराच्या नोटा जास्त वापरातच नव्हत्या; परंतु, हे सांगितले नाही की एवढी साधी गोष्ट माहित करून घेण्यासाठी संपूर्ण देशाशी प्रयोग करण्याची काय गरज होती? असेही समजले की दोन हजाराच्या नोटेचे बनावट स्वरूप तयार करणे पहिल्यापेक्षा जास्त सोपे होते. एक हजाराच्या १८१ कोटी नोटा बँकात परत घेण्याची कसरत झाली. मग प्रत्येक दिवशी मर्यादा ठरवून दिली गेली. दर आठवड्याला त्याविषयीच्या नियमात बदल केले गेले. जी नोट आपोआप चलनातून बाहेर जात होती ती समाप्त करण्यासाठी इतकी महागडी कवायत का केली गेली, याचे कारण कधीही कोणाला कळले नाही. असे समजा की सरकारने नोटबंदीच्या समाधीवर दोन हजाराच्या नोटेचे गुलाबी फूल वाहिले.

पंतप्रधान संग्रहालयात नोटबंदी कक्ष तयार होईल तोवर जगभरातील अर्थशास्त्राच्या पुस्तकात भारतातील नोटबंदीविषयी केस स्टडी छापले जातील. सुरळीत चाललेल्या अर्थव्यवस्थेशी बसल्या बसल्या कसा खेळ केला गेला हेच त्यात असेल.  शक्यता अशीही आहे की या कक्षाच्या शेवटी एक पाटी लावलेली असेल. त्यावर लिहिले जाईल : ‘सावधान चलनाशी खेळणे, विद्युत प्रवाहाशी खेळण्यासारखे आहे.’
    yyopinion@gmail.com

Web Title: Playing with currency notes will burn your hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.