सुखावह अन् लाभप्रद, ज्ञानाचा योग्य वापर झाल्यास तरुणांना समाधान लाभेल....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 05:02 AM2020-07-16T05:02:07+5:302020-07-16T07:16:55+5:30

आपल्याकडील ज्ञानाचा योग्य वापर करून त्याचा देशाला लाभ होण्याने या तरुणांना समाधान लाभेल. त्यांना आर्थिक लाभ होईल. यामधून बाजारपेठेमधील मागणी वाढेल.

Pleasant and beneficial | सुखावह अन् लाभप्रद, ज्ञानाचा योग्य वापर झाल्यास तरुणांना समाधान लाभेल....

सुखावह अन् लाभप्रद, ज्ञानाचा योग्य वापर झाल्यास तरुणांना समाधान लाभेल....

Next

गुंतवणूक करण्यापूर्वी त्यापासून आपल्याला लाभ होईल की नाही, याचा विचार निश्चितच केला जातो. जेथे चांगला लाभ होण्याची शक्यता अधिक असते, तेथेच जास्त प्रमाणात गुंतवणूक केली जाते. गुगलसह अन्य जागतिक आस्थापनांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्याची केलेली घोषणा ही भारताकडे असलेली वाढीची क्षमता अधोरेखित करणारीच आहे. कोरोनाच्या जागतिक साथीमध्ये गेले काही महिने जगामधील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प होत्या. आता हळूहळू आर्थिक चलनवलन सुरू झाले असून, याच काळामध्ये भारताकडे वाढत असलेला गुंतवणूकदारांचा ओढा हा देशवासीयांसाठी निश्चितच सुखावणारा आणि दीर्घकालीन विचार करता लाभदायकही आहे.

गुगल ही जागतिक स्तरावरील कंपनी येत्या पाच वर्षांत भारतामध्ये ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे देशातील डिजिटल कार्यप्रणाली सुधारून आॅनलाईन व्यवहारांमध्ये देश सक्षम होण्याची मोठी शक्यता आहे. प्रत्येक भारतीयाला त्याच्या मातृभाषेमध्ये डिजिटल माहिती उपलब्ध करून देण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. यामुळे अल्पशिक्षित आणि इंग्रजीची जुजबी माहिती असणाऱ्यांनाही त्यांच्या मातृभाषेत ज्ञानाचा खजिना उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व किफायतशीर दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे. प्रत्येक देशाच्या विविध प्रथा, परंपरा, समजुती यानुसार वेगवेगळ्या गरजा असतात.

भारतीयांच्या अशा वेगळ्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी नवीन सेवा आणि उत्पादने देण्याला गुगलने प्राधान्य देण्याचे ठरविले असल्याने भारतीयांची सोयच होणार आहे. या सेवा आणि उत्पादने विकसित करण्यासाठी काही प्रमाणात का होईना नवीन मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामधून भारतीयांना रोजगाराच्या काही संधीही उपलब्ध होऊ शकतात. आजच्या कठीण कालखंडामध्ये रोजगार मिळणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य, शिक्षण आणि शेती या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठीही गुगलचा अग्रक्रम राहणार आहे. त्यामुळे मुख्यत: ग्रामीण भागातील भारतीयांचे जीवन अधिक सुसह्य होणार आहे.

गुगलच्या घोषणेआधी रिलायन्सच्या जिओ या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अनेक जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे डिजिटल इंडियाला गती मिळणार आहे. भारतामधील प्रचंड लोकसंख्येमुळे येथे मोठा ग्राहकवर्ग मिळण्याची शक्यता गृहीत धरूनच या कंपन्यांनी येथे गुंतवणूक सुरू केली आहे. यामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धीही सहभागी झाल्याने गुंतवणुकीमध्ये चढाओढ लागलेली दिसत आहे. फेसबुक आणि मायक्रोसॉफ्टने याआधीच भारतामध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ई-कॉमर्समधील अ‍ॅमेझॉनचाही भारतामध्ये गुंतवणूक करण्याकडेच कल आहे.

भारतामधील १.३ अब्ज ग्राहकांवर लक्ष केंद्रित करूनच या कंपन्या भारतामध्ये येत आहेत. त्यांना येथील मोठ्या बाजारपेठेचे फायदे दिसत असल्याने येथे गुंतवणूक करण्यात त्यांनी रस घेतला आहे. आंतरराष्टÑीय कंपन्या भारताकडे लक्ष केंद्रित करीत असताना भारतीय कंपन्याही मागे राहिलेल्या नाहीत. ‘टीसीएस’ या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपनीने ४० हजार नोकºया उपलब्ध करून देण्याची केलेली घोषणाही भारतीयांना सुखावणारीच आहे. देशातील तरुणांच्या हाताला काम असेल, तर त्यांची डोकी ही विघातक कामांकडे वळत नाहीत. ‘टीसीएस’च्या या घोषणेने सध्याच्या काळात अनेक तरुणांना दिलासा मिळालेला आहे.

आपल्याकडील ज्ञानाचा योग्य वापर करून त्याचा देशाला लाभ होण्याने या तरुणांना समाधान लाभेल. त्यांना आर्थिक लाभ होईल. यामधून बाजारपेठेमधील मागणी वाढेल. मागणी वाढली की, कारखान्यांमधील उत्पादन वाढून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. त्यामुळे देशातील बेरोजगारी कमी होईल. त्याचप्रमाणे सरकारच्या महसूलामध्ये वाढ होईल. असे हे चक्र पूर्णपणे फिरूशकेल.

Web Title: Pleasant and beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.