सावली हरवण्याचे सुख
By admin | Published: May 19, 2017 02:43 AM2017-05-19T02:43:03+5:302017-05-19T02:43:03+5:30
निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती
- प्रल्हाद जाधव
निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवता येऊ शकतात. किंबहुना एकही क्षेत्र असे आढळणार नाही, की ज्याची माहिती, ज्याचे उत्तर निसर्गाकडे नाही. आणि म्हणून माणसाने निसर्गाकडे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून पाहिले पाहिजे, असे मला वाटते.
गेल्याच आठवड्यात आपण शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने माणसाची सावली हरवल्याचा आभास निर्माण झाला. एरव्ही डावीकडे किंवा उजवीकडे असणारी किंवा मागे पुढे असणारी, सतत सोबत करणारी त्याची सावली काही क्षण त्याला सोडून गेली होती...
सावली ही माणसाच्या सर्वात जवळची गोष्ट. ती कायम आपल्या सोबत असणार असा त्याला विश्वास असतो; पण तीसुद्धा कधी ना कधी आपली सोबत सोडणार आहे हे जळजळीत वास्तव स्वीकारूनच माणसाला जगता आले पाहिजे आणि तसे जगता आले तरच त्याला जगण्याचा खरा अर्थ उमगला असे म्हणता येईल.
सावली हरवणे हा काही क्षणांचा आभास असला किंवा चकवा असला तरी, आपली सावलीही आपल्याला सोडून जाऊ शकते हे त्यामागील सत्य माणसाला बरेच काही शिकवून जाणारे आहे.
माणूस जगताना अनेक गोष्टी घट्ट धरून ठेवतो. हे माझे, ते माझे करतो. मी इतक्या पदव्या मिळवल्या, इतकी प्रॉपर्टी मिळवली, इतका प्रवास केला, इतकी माणसे जोडली, असे म्हणत राहतो. हा सारा हिशेब अखेरच्या निरोपाच्या क्षणी
निरर्थक ठरणारा असतो. या साऱ्या गोष्टी इथेच सोडून आपल्याला एकट्यानेच त्या शेवटच्या अज्ञात प्रवासासाठी निघायचे आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा माणसाला मोठा धक्का बसतो आणि तो तडफडायला लागतो. पण याची जाणीव आधीपासूनच असेल तर माणसाला त्याचा धक्का बसत नाही, आणि म्हणूनच कदाचित निसर्ग माणसाला हा सावली हरवण्याचा चकवा घालत असावा.
हे माझे हे माझे करत प्रत्येक गोष्टीला चिकटून न बसता आज ना उद्या हे मला सोडावे लागणार आहे, याचे भान ठेवून निर्लेप मनाने जगणारा माणूस सदैव सुखी असतो. इदं न मम हा वेदांत त्याला सांगण्याची वेळ येत नाही. आणि म्हणूनच स्वत:ची सावली हरवून बसण्याची जाणीव सुखपर्यवासी आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि ती करून दिल्याबद्दल आपण निसर्गाप्रति कृतज्ञ असायला हवे.