PM Narendra Modi Birthday: संपूर्ण देशालाच आपलं कुटुंब मानणारं नेतृत्व म्हणजे PM मोदी: हरदीप सिंग पुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 09:06 AM2021-09-17T09:06:36+5:302021-09-17T09:07:17+5:30
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ अशा बुलंद हाकेसोबत त्यांनी दिलेलं वचन!
देश नुकताच स्वतंत्र झाला आणि त्यांचा जन्म झाला... स्वतंत्र भारतात जन्माला येणारी अपत्यं म्हणजे देशाचा भावी चेहरा, त्याच्या स्वप्नांची बीजं! प्रगतशील आणि आश्वस्त अशा नव्या भारताचं प्रतिक असणारी ही व्यक्ती देशाची पंतप्रधान असणं हा केवढा काव्यगत न्याय. मोदीजी वयाच्या एक्काहत्तराव्या वर्षात पदार्पण करताना मला दिसते ती त्यांची देशाविषयीची नि:स्सीम प्रेमभावना... आपला देश विविधतेमधील ऐक्य, लोकशाही आणि जगाच्या क्षितीजावर शाश्वत विकासासाठी एक अनुकरणीय परिपाठ ठरावा, यासाठी त्यांची कटिबद्धता... ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ अशा बुलंद हाकेसोबत त्यांनी दिलेलं वचन!
आपल्या प्रंतप्रधानांचा उल्लेख ‘युगपुरूष’ असा करणं खरोखरी सार्थ आहे. अंगावर चाल करून आलेल्या आव्हानांमुळे नामोहरम न होता आजचा काळ समजून घेत आणि त्याला आकार देत देशाच्या उज्ज्वल भविष्याचं विधीलिखित त्यांनी घडवलं आहे. एक अब्ज तीस कोटींच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या भारतासारख्या देशावर कोरोना महामारीचा आघात एक नव्हे; दोन वेळेस झाला. महामारीची तीव्रता आणि संसर्गाचा वेग जबरदस्त होता. त्या अवघड परिस्थितीत देशा-परदेशातील सातत्यपूर्ण टीकेमुळे भारत अग्निपरीक्षेतून जात असताना मोदीजींची स्थितप्रज्ञ वृत्ती, बांधिलकी, धैर्य आणि दृढनिश्चय यामुळेच तरून जाता आले.
सर्वांना सामावून घेणारा व अत्यंत नाविन्यपूर्ण ‘आत्मनिर्भर भारत’ असा मंत्र त्यांनी दिला. वर्षभरात सुमारे आठशे कोटी गरिबांना अन्नाचं संरक्षण पुरवलं. ‘स्वच्छ भारत’सारख्या घोषणेनं आरोग्य व्यवस्थेत सुधारणा झाल्या. आपले शेतकरी, आपले उद्योगधंदे, सेवाक्षेत्र यांना शक्य ते सहकार्य पुरवून त्यांनी अर्थव्यवस्थेला रूळावर आणलं आहे. तळागाळातील शहाणपण व सहकारी संस्था यांची मोट बांधत केंद्रीय धोरण तयार करणं व त्याचं नियमन करणं मोदीजींना गेल्या सात वर्षात साधता आलेलं आहे. आपल्या पृथ्वीवरच्या पर्यावरणाला तापमान बदलापासून वाचवण्याची त्यांची चिकाटी आणि निष्ठा यामुळेच तर ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा सन्मान संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना दिला.