PM Narendra Modi Birthday: PM मोदींचे मन समर्पित, तन समर्पित आणि जीवनही समर्पित!: जगत प्रकाश नड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 09:14 AM2021-09-17T09:14:14+5:302021-09-17T09:15:00+5:30

आपले पंतप्रधान जगातील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी सर्वसामान्य जनतेशी केवळ राजकीय संबंध जोडले नाहीत, तर भावनिक बंधही निर्माण केले आहेत.

pm modi mind body and life is also dedicated says Jagat Prakash Nadda pdc | PM Narendra Modi Birthday: PM मोदींचे मन समर्पित, तन समर्पित आणि जीवनही समर्पित!: जगत प्रकाश नड्डा

PM Narendra Modi Birthday: PM मोदींचे मन समर्पित, तन समर्पित आणि जीवनही समर्पित!: जगत प्रकाश नड्डा

googlenewsNext

आपले पंतप्रधान जगातील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी सर्वसामान्य जनतेशी केवळ राजकीय संबंध जोडले नाहीत, तर भावनिक बंधही निर्माण केले आहेत. म्हणूनच,  ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेले आहेत. ते केवळ पंतप्रधान नाहीत, तर जनहितासाठी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि लोकसहभागातून या प्रश्नांवर उपाययोजना करणारे समाजसुधारकदेखील आहेत. उघड्यावर शौचाच्या पद्धतीपासून मुक्ती, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, जल संरक्षण आणि नमामि गंगे अभियानांचे यश याचीच साक्ष देणारे आहे.  ते स्वतःला प्रधानमंत्री नाही, तर ‘प्रधान सेवक’ म्हणवतात. कायमच ते समाजाला पुढे जाण्यासाठी आणि उत्तम आचार-विचार आणि संस्कार अंगी बाणवण्यासाठी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. राष्ट्रहितासाठी कितीही गुंतागुंतीचे काम असले, तरीही ते डगमगत नाहीत, उलटपक्षी, त्या उद्दिष्टप्राप्तीसाठी ते आपले सर्वस्व पणाला लावतात. त्यांचे संपूर्ण सार्वजनिक आयुष्य निष्कलंक आणि स्वच्छचरित्र आहे. 

त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे कलम ३७० संपले आणि  “एक देश, एक संविधान’ या संकल्पनेची स्थापना झाली. जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य घटक राज्य बनले. सर्जिकल आणि हवाई हल्ले यातून, नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला कठोर संदेश देत सांगितले की, भारत आता बदलला आहे. आपल्या सीमा आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता भारत कुठलेही पाऊल उचलू शकतो. श्रद्धेय लाल बहादूर शास्त्रीजी यांच्यानंतर,  मोदीजी एकमेव असे लोकनेते आहेत, ज्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, संपूर्ण देश एक होतो. मोदीजींनी देशाच्या विचारशक्तीचा दर्जा उंचावला आहे. राजकीय कार्यसंस्कृतीत चांगले बदल घडवून आणले आहेत. 

यापूर्वी, राजकारणाला जातीयवाद, घराणेशाही तसेच आश्वासन संस्कृतीसारख्या दुष्ट प्रवृत्तींनी जखडले होते, मोदीजींनी त्याजागी विकासवादाचे राजकारण प्रचलित केले आहे. रखडलेल्या योजना वेगाने पूर्ण करण्यासाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व निश्चित करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधानांनी “सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी” (Proactive Governance And Timely  Implementation) अर्थात ‘प्रगती’ची सुरुवात केली. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या बुधवारी पंतप्रधान ‘प्रगती’ची बैठक घेतात आणि निवडक योजनांचा आढावा घेतात. यामुळे योजनांना होणारा विलंब टळला असून, प्रकल्पाच्या खर्चात होणाऱ्या अवाजवी  वाढीला देखील लगाम लागला आहे. असामान्य वक्तृत्व शैली, जादुई व्यक्तिमत्त्व, इमानदार प्रतिमा, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, सुस्पष्ट दूरदृष्टी, शिस्तबद्ध जीवनशैली, साहसी वृत्ती, नेतृत्व कौशल्य, विनयशीलता आणि देशाच्या नागरिकांसाठी चांगल्या गोष्टी करण्याची ऊर्मी ही आपल्या पंतप्रधानांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील अनुकरणीय मूल्ये आहेत. 

लहानपणी त्यांच्यात जो दृढ निश्चय आणि शिस्त होती, तोच दृढ निश्चय आणि शिस्त त्यांच्यामध्ये आजही आहे. कोणताही निर्णय त्वरित घेण्याची त्यांची खासियत आहे, म्हणूनच ते केवळ योग्य निर्णय घेत नाहीत तर त्याची अंमलबजावणी ही सुनिश्चित करतात. मोदीजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि जीवनाचा प्रत्येक क्षण देशातील खेडे, गरीब, शेतकरी, दलित, पीडित, शोषित, वंचित, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.ते नियमित योगासने करतात.  कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या योगाभ्यासामध्ये कधीही व्यत्यय येत नाही. म्हणूनच ते या वयातही इतके सक्रिय आणि तंदुरुस्त आहेत. भारतीय जनता पार्टी नेहमीच मोदीजींचा वाढदिवस हा  ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करत आली आहे.  आजच्या दिवशीही आमचे कार्यकर्ते देशाच्या कानाकोपऱ्यात कोविड लसीकरण मोहिमेला चालना देत आहेत. जनतेप्रती पूर्णतः समर्पण, अंत्योदयच्या माध्यमातून सबका साथ, सबका विकास आणि राष्ट्र प्रथम – हे गेल्या २० वर्षांच्या  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभाराचे सूत्र आहे. मन समर्पित, तन समर्पित और यह जीवन समर्पित चाहता हूँ देश की धरती, तुझे कुछ और भी दूं!
 

Web Title: pm modi mind body and life is also dedicated says Jagat Prakash Nadda pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.