मोदी म्हणतात, ‘ये दिल मांगे मोअर!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 08:13 AM2022-05-19T08:13:42+5:302022-05-19T08:14:34+5:30

नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय सांगतात की, शरद पवार वगळता कोणाचेच त्यांच्याशी व्यक्तिगत नाते नाही.

pm narendra modi speech in bharuch gujarat its analysis and consequences | मोदी म्हणतात, ‘ये दिल मांगे मोअर!’

मोदी म्हणतात, ‘ये दिल मांगे मोअर!’

googlenewsNext

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

गुजरातेतील भरूचमध्ये परवा बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेला ‘तो’ नेता कोण, हे शोधण्यासाठी राजकीय पंडित अहोरात्र डोके खाजवत बसले आहेत. पंतप्रधान म्हणाले होते, ‘‘आम्हाला सतत राजकीय विरोध करणारे एक ज्येष्ठ नेते एकदा मला भेटले. अर्थात, मीही त्यांचा आदरच करतो. काही प्रश्नांवरून ते रागावले होते. मला भेटायला आले. ‘तुम्हाला देशाने दोनदा पंतप्रधान केले, आता आणखी किती काम कराल? सगळे तर उत्तम चालले आहे’, असे ते मला सांगत होते. पण मोदी हा वेगळ्या मातीत घडलेला माणूस आहे, हे ठाऊक नसावे. गुजरातच्या या भूमीने मला घडवले आहे. मी विश्रांती घेऊ शकत नाही!”

- मोदी यांच्या या बोलण्यातून दोन गोष्टी उघड झाल्या. पहिली, हा नेता त्यांच्या अगदी जवळचा आणि मातब्बर असला पाहिजे. तरच दोघांत हे असे खासगी बोलणे होत असेल. दुसरे म्हणजे ७५ वर्षांचे वय झाल्यावर २०२५मध्ये मोदी स्वत:हून  पायउतार होतीलच, असे नाही. ते तिसरी संधी घेऊ शकतात. मोदींच्या या प्रतिपादनात काही चुकले, असे नाही. कोणता पंतप्रधान स्वत;हून पद सोडेल? हे अत्यंत खासगी संभाषण मोदींनी सार्वजनिक का केले, हे राजकीय पंडितांना कळेनासे झाले आहे. पंतप्रधानांशी एवढे गुफ्तगू करणारा हा विरोधी पक्षनेता कोण?

मोदींचे निकटवर्तीय सांगतात की शरद पवार, कमलनाथ, गुलाम नबी आझाद, भूपिंदर सिंग हुडा अशी अनेक नेतेमंडळी मोदींच्या जवळची आहेत. १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांचे या नेत्यांशी संबंध विकसित झाले; पण शरद पवार वगळता कोणाचेच त्यांच्याशी व्यक्तिगत नाते नाही. यामागे एक कहाणीही आहे. शरद पवार त्यावेळी केंद्रात कृषीमंत्री होते. मोदी यांचे जवळचे सनदी अधिकारी गुजरात केडरचे पी. के. मिश्रा यांना पवार यांनी कृषी खात्यात सचिव म्हणून घ्यावे, अशी गळ त्यांनी पवारांना घातली.  मोदी यांच्या जवळचे म्हणून मिश्रा यांना आपल्या खात्यात घेण्यास तत्कालीन युपीए सरकारमधला कोणीही मंत्री तयार नव्हता. अखेर पवारांनी मिश्रा यांना सामावून घेतले. तेव्हापासून दोघांत सख्य निर्माण झाले.

मोदींचा गोंधळात टाकणारा खुलासा 

मोदींनी खासगी संभाषण खुले का केले, याचे राजकीय पंडितांना आश्चर्य वाटते आहे. तेही लोकसभा निवडणूक दोन वर्षे लांब असताना... सत्ता संपादनाची ८ वर्षांची पूर्तता वाजतगाजत साजरी करण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. ‘लोकांसाठी जे करायचे आहे ते केल्याशिवाय आपण खुर्ची सोडणार नाही’ असे मोदी यांनी केजरीवाल, ममता, के. चंद्रशेखर राव, इतकेच काय, पण शरद पवार यांनाही एका दमात सांगून टाकले, असा अनेकांचा होरा आहे. आपल्याला पदच्युत करण्याच्या योजना आखण्यात वेळ घालवू नका, असेही त्यांना सुचवायचे असावे. 

ये दिल मांगे मोअर

मोदी यांना पंतप्रधान म्हणून दोनपेक्षा जास्तवेळा संधी का हवी आहे? मोदी भरूचमध्ये जे बोलले ते राष्ट्रीय माध्यमात फारसे कुठे झळकले नाही. ‘१०० टक्के लक्ष्यपूर्ती हे माझे स्वप्न आहे. सरकारी यंत्रणेला शिस्त अंगवळणी पडू दे. काम पूर्ण झाल्याशिवाय मी थांबू शकणार नाही’, असे मोदी म्हणाले आहेत.
यापूर्वी नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंत सगळेजण याच वळणाची वक्तव्ये करत आले आहेत.  ‘मी टायर्ड नाही आणि रिटायर्डही नाही’ असे म्हणून वाजपेयी यांनी सर्वांवर कडीच केली होती. पण ‘सरकारी यंत्रणेच्या अंगवळणी शिस्त पडू दे’ हे मोदी यांचे विधान अधिक महत्त्वाचे आहे. अर्थातच त्यांना नोकरशाहीला सरळ करायचे आहे. इंदिरा गांधी सोडता यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने असे म्हटले नव्हते. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदींनी नोकरशाहीला शिस्त लावण्याचा धडाका चालवला आहे. कल्याणकारी योजनांचा  १०० टक्के लाभ लोकांना मिळावा, यासाठी मोदींनी सर्वांना दक्षता घ्यायला लावली. लठ्ठ  पगार, सुरक्षित भवितव्य असताना बडे बाबू लोकांनी फालतू वेळ न घालवता झडझडून काम केलेच पाहिजे आणि त्यांच्या कामाचे अपेक्षित परिणामही दिसले पाहिजेत, यावर मोदींचा कायमच भर राहिला आहे. 

Web Title: pm narendra modi speech in bharuch gujarat its analysis and consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.