नरेंद्र मोदींना ठेवायचाय बॉलिवूडवर अंकुश, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 10:31 AM2020-10-14T10:31:33+5:302020-10-14T10:32:38+5:30
आपली विचारसरणी, आपल्या योजना जर प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवायच्या तर बॉलिवुड आपल्या ताब्यात हवे, असे मोदी व भाजपला वाटू लागले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु होताच गेल्या काही वर्षांत बॉलिवुडही हिंदुत्ववाद आणि सेक्युलरॅझम या विचारसरणीत विभागले गेले.
- संदीप प्रधान
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अचानक बॉलिवुडमध्ये उठलेली किंवा उठवलेली वावटळ अजून शांत झालेली नाही. बॉलिवुडमधील अनेक आघाडीचे अभिनेते व त्यांचे प्रॉडक्शन हाऊस यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. बॉलिवुडमधील मातब्बर मंडळी ही अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे वृत्तांकन करणाऱ्या दोन वाहिन्यांच्या विरोधात त्यांची कैफियत आहे. यातील एक वाहिनी तर टीआरपीच्या हव्यासापोटी एकतर्फी, एकांगी वृत्तांकन करीत असल्याचे आरोप यापूर्वीच झाले असून मुंबई पोलिसांनी या वाहिनीच्या विरोधात टीआरपी घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे.
सुशांतसिंग प्रकरण हे अगोदर हत्येचे प्रकरण असल्याचे भासवले गेले. त्यातून नेपोटिझमचा मुद्दा पुढे आणला गेला. त्यानंतर बॉलिवुडमधील ड्रग्ज कनेक्शनकडे तपास यंत्रणांचा मोर्चा वळला. सुशांतची हत्या करण्याकरिता ज्या रिया चक्रवर्ती हिला जबाबदार धरले गेले व जिने सुशांतला अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा आरोप केला गेला ती रिया हीच जामिनावर सुटली. त्यानंतर मग बॉलिवुडविरुद्धच्या या कटकारस्थाविरोधात बॉलिवुड एकवटले.
बॉलिवुड आणि राजकीय नेते यांचे जुने संबंध राहिले आहेत. पं. जवाहरलाल नेहरु जे साम्यवादाचे, समतेचे, गरीब-श्रीमंत ही दरी मिटवण्याचे स्वप्न पाहत होते तेच स्वप्न राज कपूर हेही पाहत होते. त्यांच्या चित्रपटांमधून तेच अधोरेखित केले जात होते. त्यामुळे रशियात नेहरुं इतकेच किंबहुना कांकणभर अधिक फॅन फॉलोइंग राज कपूर यांना होते. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे चित्रपट क्षेत्राशी घनिष्ट संबंध होता. श्रीकांतजींनी संगीतबद्ध केलेली अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत. ठाकरे कुटुंबात कलेचा वारसा असल्याने चित्रपट क्षेत्रातील अनेकजण शिवसेनाप्रमुखांकडे येत-जात. मराठी चित्रपट सृष्टीतील मंडळींचा ठाकरे यांच्याशी दोस्ताना होताच पण दिलीपकुमार, सुनील दत्त, अमिताभ बच्चन वगैरे अनेकांनी बाळासाहेबांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मणिरत्नम यांची ‘बॉम्बे’ फिल्म ही मुंबईतील दंगलीवर होती. त्याच्या प्रदर्शनास शिवसेनेनी विरोध केला होता. बरीच खणाखणी झाल्यावर काही भागांना कात्री लावून तो चित्रपट प्रदर्शीत केला गेला होता. मात्र त्याच शिवसेनेला २०१० मध्ये शाहरुख खान यांच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी शाहरुखने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळण्यास त्याने दर्शवलेल्या पाठिंब्याबाबत माफी माग अन्यथा हा चित्रपट रोखू हा दिलेला इशारा प्रत्यक्षात आणता आला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा-सात वर्षांत अक्षयकुमार, अमिताभ बच्चन, रणवीरसिंग, विकी कौशल, कंगना रनौत अशा काही फिल्मी हस्तींसोबत जवळीक जपली आहे. मोदींची अक्षयकुमारने घेतलेली मुलाखत गाजली होती. मोदींच्या योजना, त्यांचा सर्जिकल स्ट्राईक यावर चित्रपट प्रदर्शित झाले. आपली विचारसरणी, आपल्या योजना जर प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवायच्या तर बॉलिवुड आपल्या ताब्यात हवे, असे मोदी व भाजपला वाटू लागले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु होताच गेल्या काही वर्षांत बॉलिवुडही हिंदुत्ववाद आणि सेक्युलरॅझम या विचारसरणीत विभागले गेले. मात्र सुशांतसिंग प्रकरणात अमली पदार्थांचे आरोप व्हायला लागल्यावर व कंगनाने आपली जीभ सैल सोडून अनेकांना घायाळ केल्यावर अनेकांनी या हल्ल्याचा विरोध केला. बॉलिवुडमधील परस्परांचे कट्टर स्पर्धक असलेले कलाकार अचानक एकवटले आहेत. बिहारची विधानसभा निवडणूक हे जसे सुशांत प्रकरणाला हवा देण्याचे एक कारण आहे त्याचबरोबर बॉलिवुडवर असलेले ठाकरे व शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आणणे हाही हे वादळ निर्माण करण्यामागे भाजपचा हेतू असावा, अशी दाट शक्यता आहे. शिवसेनेचे बलस्थान जसे मुंबई महापालिकेतील सत्ता राहिले आहे तसेच ते बॉलिवुडमधील ठाकरे यांचा असलेला दबदबा हेही राहिले आहे. त्या वर्चस्वावर हल्ला करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. आदित्य ठाकरे यांची बॉलिवुडमधील अनेक स्टार्सशी दोस्ती असून सुशांत प्रकरणात त्यांना बदनाम करताना ‘आपल्या’ विचारसरणीच्या विरोधात असलेल्या काही कलाकारांनाही बदनाम करायचे ही रणनीती असावी. मात्र बॉलिवुडचे सध्याचे आर्थिक गणित हे राजकीय नेत्यांच्या लहरीवर पूर्वीइतके अवलंबून नसल्याने भाजपला आपले मनसुबे साध्य करण्यात फारसे यश आलेले नाही.
एकेकाळी शुक्रवारी रिलीज होणारा चित्रपट चालला तरच निर्मात्यांना फायदा होत होता. आता हिंदी, तामिळ व तेलगु चित्रपट भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर रिलीज होतात. सिंगापूर, मलेशिया वगैरे अनेक देशांत या तिन्ही भाषेतील चित्रपटांचा मोठा दर्शक आहे. सर्वाधिक तेलगु भाषिक अमेरिकेत आहेत. त्या खालोखाल गुजराती व पंजाबी आहेत. त्यामुळे अमेरिकेत तेलगु चित्रपटांना मोठी मागणी आहे. म्हणजे हिंदी चित्रपटांकरिता स्थानिक व इंटरनॅशनल थिएटर, म्युझिक राईटस, सॅटलाईट (वाहिन्यांवरील प्रदर्शनाचे), ओटीटी (डिजिटल प्रदर्शनाचे), एअरबॉन राईटस वगैरे विकण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात थिएटरला चाललेल्या चित्रपटाचे राईटस विकताना अधिक नफा मिळतो. थिएटरमध्ये चित्रपट फारसा चालला नसेल तर तुलनेनी कमी किंमत दिली जाते. मात्र पूर्वी ज्या पद्धतीने राजकीय विरोधामुळे चित्रपट डब्यात गेला तर निर्माते देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण व्हायची तशी ती आता होण्याची सूतराम शक्यता नसल्याने अमली पदार्थांच्या सेवनावरुन बॉलिवुडला टार्गेट करणाऱ्या वाहिन्यांविरोधात मातब्बर कलाकार एकवटले आहेत. हा एकप्रकारे या वाहिन्यांना माहिती पुरवणाऱ्या एनसीबीला व बॉलिवुडचे रुपांतर रा. स्व. संघाच्या प्रात:कालीन शाखेत करु पाहणाऱ्या केंद्र सरकारलाही इशारा आहे. कंगनासारखी तोंडाळ अभिनेत्री तर आता चक्क एकटी पडली आहे. कदाचित २० वर्षांपूर्वी हे धैर्य बॉलिवुडच्या स्टार्सनी दाखवले नसते.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आरोप होत आहे. इंटरनॅशन फायनान्शियल सर्व्हीसेस सेंटर जे मुंबईत उभारणे मागील काँग्रेस सरकारच्या काळात प्रस्तावित होते ते गुजरातला हलवले गेले. रिझर्व बँकेची काही कार्यालये, कोस्टगार्डचे प्रशिक्षण केंद्र हेही मुंबईतून गुजरातला नेले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु करण्यामागे मुंबईचे आर्थिक पंख कापणे हाच हेतू आहे, अशी टीका सुरु आहे. नोएडा येथे फिल्म सिटी उभी करण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच केली. त्याचाही हेतू मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करणे, बॉलिवुड स्टार्सना आपला राजकीय व वैचारिक अजेंडा राबवायला भाग पाडणे आणि शिवसेनेच्या बलस्थानावर वार करणे हाच आहे.