मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी; ...मराठवाड्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे !
By सुधीर महाजन | Published: September 7, 2019 12:42 PM2019-09-07T12:42:08+5:302019-09-07T13:12:19+5:30
ऑरिकच्या निमित्ताने मराठवाड्याच्या विकासाचा दरवाजा तुम्ही उघडा.
मा. पंतप्रधाननरेंद्रजी मोदी,
स.न.
संतांच्या भूमीत आपले स्वागत. तुम्हाला पत्र लिहावे की नाही, असा प्रश्न पडला; पण तुमच्याशी संवाद साधण्याचा हाच एक सोपा मार्ग आहे. संतांच्या भूमीत तुम्ही आलात. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरोबा, बहिणाबाई शिऊरकर अशी संतांची मांदियाळी या भूमीतली. मराठवाडा मागास आहे; पण या संतांनी एकतेचा संदेश देत आध्यात्मिक वाट दाखवली, ती भौतिक प्रगतीच्या पलीकडची म्हणावी लागेल. मराठवाड्याच्या नावामागेच हे मागासलेपण शतकानुशतके चिकटले आहे; पण ते अजून तरी हटत नाही. आता ज्या ‘ऑरिक’ सेंटरचे तुम्ही उद्घाटन करणार आहात त्याद्वारे प्रगतीचा अश्व घोडदौड घेईल, अशी अपेक्षा आहे. शिवरायांनी पुण्यात सोन्याचा नांगर चालवला आणि पुण्याचे भाग्य उजळले. आता या ऑरिकचे दरवाजे तुम्हीच उघडता आहात. लॅटिनभाषेत ऑरिक म्हणजे सुवर्ण. यानिमित्ताने मराठवाड्याच्या विकासाचा दरवाजा तुम्ही उघडा. नऊ वर्षांपूर्वी डीएमआयसी प्रकल्प आला; पण उद्योग आले नाहीत. अँकर प्रोजेक्ट नाही. म्हणजे गुंतवणूक नाही. उद्योगासाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध असणारे हे देशातील एकमेव औद्योगिक क्षेत्र; पण येथे एकही उद्योग येत नाही हे वास्तव आहे.
या कॉरिडॉरची तुलना गुजरातच्या ढोलेरो उद्योग क्षेत्राशी केली जाईल, अशी चर्चा होती आणि आमचीही तीच अपेक्षा आहे. ज्या वेगाने या उद्योग क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. १० हजार एकर जमीन घेतली; पण त्यांचा आराखडा नाही. आपण आल्यामुळे या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. औरंगाबाद हे जागतिक पर्यटन नकाशावरचे महत्त्वाचे ठिकाण. वेरूळ, अजिंठा ही दोन जागतिक वारसा असलेली ठिकाणे येथीलच. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा येथे कायमचा ओघ होता; पण गेल्या वर्षापासून तो आटला आहे. औरंगाबादची विमानसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली. शिवाय अजिंठा लेणीकडे जाणारा १०० कि.मी. रस्ता वर्षभरापासून खोदून ठेवला. ते काम ठप्प आहे. यामुळे पर्यटनावर आधारित व्यापार ठप्प झाला. विमानसेवेमुळे उद्योगावरही परिणाम झाला. आता यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे वाटते. मराठवाडा आणि दुष्काळ हे आता एक समीकरण बनले आहे. गेल्या पाच वर्षांपासून इथला शेतकरी दुष्काळाशी झुंजत आहे. आत्महत्या थांबत नाहीत. या वर्षभरात तर आतापर्यंत ५३४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. रोजची आत्महत्या हे विदारक सत्य आहे. हे चित्र कसे बदलता येईल, हे तुम्हीच सांगू शकता. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणीही मिळत नाही. सिंचन नाही. कृष्णेचे पाणी देणार, दमणगंगेचे देणार, फक्त घोषणा होतात; पण केवळ घोषणांनी आमची तहान भागत नाही याचा विचार तुम्हीच करू शकता. कारण तुम्ही नर्मदेचे पाणी थेट कच्छमध्ये नेले आहे. रस्ते हा खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग. तेथेही आमचे नशीब खडतर.
एक सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग सोडला तर बाकी सारा आनंदच आहे. निधी आणि रस्ते याच्या घोषणा झाल्या. अर्थसंकल्पात तरतुदी दिसतात; पण रस्ते दिसत नाहीत. सोलापूर-धुळे हा महामार्गसुद्धा अजून औरंगाबादच्या पुढे सरकला नाही. शिक्षणाचा विचार केला तर दोन विद्यापीठे, एक कृषी विद्यापीठ, एक विधि विद्यापीठ, अशी परिस्थिती आहे; परंतु आयआयटी, आयआयएमसारखी एकही संस्था नाही. आमचे आयआयएम नागपूरला गेले. त्या बदल्यात येणारी वास्तुशिल्पी संस्था अजूनही प्रतीक्षेत आहे. रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण नाही. घोषणा केलेली अहमदनगर-बीड रेल्वे अजून धावली नाही. असे एक ना अनेक प्रश्न आहेत. काही सुटले तर विकासाच्या प्रक्रियेला गती मिळू शकते. तुम्ही थोडे लक्ष घाला, एवढीच माफक अपेक्षा आहे.
- सुधीर महाजन, संपादक, औरंगाबाद