पाऊल उचला, मागे वळून पाहायला वेळ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 08:14 AM2024-06-03T08:14:55+5:302024-06-03T08:18:45+5:30

दिनांक १ जून रोजी संध्याकाळी ४.१५ ते ७ या दरम्यान कन्याकुमारीहून नवी दिल्लीला परत येत असताना विमानप्रवासात शब्दबद्ध केलेले विचार..

PM Narendra Modi's Note After Meditating At Vivekananda Rock Memorial , Kanniyakumari : Take the plunge, there's no time to look back! | पाऊल उचला, मागे वळून पाहायला वेळ नाही!

पाऊल उचला, मागे वळून पाहायला वेळ नाही!

- नरेंद्र मोदी
पंतप्रधान

माझ्या प्रिय देशवासीयांनो,
लोकशाहीच्या महापर्वाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तीन दिवस कन्याकुमारी इथे आध्यात्मिक यात्रा झाली. ती पूर्ण करून दिल्लीला रवाना होण्यासाठी मी विमानात येऊन बसलो आहे. स्वतःमध्ये अपार ऊर्जेचा प्रवाह  अनुभवतो आहे.
या निवडणुकीत अनेक सुखद योगायोग आले आहेत. अमृतकाळातल्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरवात मी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थळ मेरठ इथून केली. भारतमातेची परिक्रमा करत माझी शेवटची प्रचारसभा पंजाबमधल्या होशियारपूर इथे झाली. संत रविदासजी यांची तपोभूमी.  त्यानंतर  कन्याकुमारीमध्ये भारतमातेच्या चरणांशी बसण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या क्षणांमध्ये निवडणुकीचा कोलाहल तन-मनात दाटला होता. रॅली, ‘रोड-शो’मध्ये पाहिलेले असंख्य चेहरे, अपार स्नेहाचा उमाळा, अनेकांच्या नजरेतला विश्वास, ती आपुलकी.. सारे आठवून माझे डोळे पाणावत होते. मी नीरवतेमध्ये जात होतो, साधनेत  प्रवेश करत होतो. 

काही क्षणातच राजकीय वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप... आरोपांचा आवाज आणि शब्द सारे काही अंतर्धान होऊ लागले. माझ्या मनातला विरक्त भाव अधिक गडद झाला. इतक्या मोठ्या दायित्वामध्ये अशी साधना कठीण असते; मात्र कन्याकुमारीची भूमी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने ती सोपी केली. कन्याकुमारीमध्ये विवेकानंद  स्मारकाची निर्मिती एकनाथ रानडेजींनी केली होती. एकनाथजींसोबत भटकंती करण्याची संधी मला अनेकदा मिळाली.  या ठिकाणी विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच संत तिरुवल्लूवर यांची भव्य मूर्ती,  गांधी मंडपम् आणि कामराजर मणीमंडपम् आहे. जे लोक देशाच्या एकतेविषयी शंका व्यक्त करतात, त्यांना कन्याकुमारीची ही भूमी एकतेचा अमीट संदेश देते. 

स्वामी विवेकानंद म्हणाले होते,  Every Nation Has a Message To deliver, a mission to fulfil, a destiny to reach. भारत हजारो वर्षांपासून याच भावनेने  वाटचाल करीत आहे. हजारो वर्षांपासून विचारांच्या संशोधनाचे केंद्र राहिला आहे. ‘इदं न मम’ हा भारताच्या चारित्र्याचा एक सहज आणि स्वाभाविक भाग बनला आहे. भारताच्या कल्याणातून जगाचे कल्याण आणि भारताच्या प्रगतीतून जगाची प्रगती, या धारणेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपली स्वातंत्र्य चळवळ आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी जगातील अनेक देश पारतंत्र्यात होते. भारताच्या स्वातंत्र्याने त्या देशांनाही प्रेरणा आणि बळ दिले आणि त्या देशांनीही स्वातंत्र्य मिळविले. 

आज भारताचे प्रशासनिक प्रारूप जगातील अनेक देशांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आले आहे. अवघ्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीच्या अवस्थेतून बाहेर काढणे ही अभूतपूर्व बाब आहे. लोकाभिमुख उत्तम सुशासन (प्रो-पीपल गुड गव्हर्नन्स), आकांक्षित जिल्हे (aspirational district), आकांक्षित तालुके (aspirational block) या अभिनव प्रयोगांची जगभरात चर्चा होत आहे. गरिबांचे सक्षमीकरण करण्यात, व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यात आणि गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर करू शकतो, याचे उदाहरण म्हणून आपल्या भारताची डिजिटल इंडिया मोहीम आज संपूर्ण जगासमोर एक उदाहरण म्हणून समोर आली आहे. 

सद्य:स्थितीत भारताची प्रगती आणि भारताचा उदय ही जगभरातील आपल्या सर्व सहप्रवासी देशांसाठीदेखील एक ऐतिहासिक घटना असणार आहे. आता एकही क्षण वाया न घालवता आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि मोठ्या उद्दिष्टांच्या दिशेने पावले उचलायची आहेत. नवी स्वप्ने पाहायची आहेत आणि ती स्वप्ने जगायला सुरुवात करायची आहे. मी देशासाठी रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) असा दृष्टिकोन समोर ठेवला आहे.  आपल्याला Speed (वेग), Scale (श्रेणी), Scope (व्याप्ती) आणि Standards (मानके) असे चहुबाजूंनी वेगाने काम करावे लागेल.

स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये म्हटले होते की, आपल्याला पुढील ५० वर्षे केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करायची आहेत. त्यांच्या या आवाहनानंतर बरोबर ५० वर्षांनंतर, १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. आज आपल्याकडे तशीच सुवर्णसंधी आहे. आपण पुढील २५ वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करूया. आपले हे प्रयत्न भावी पिढ्या आणि आगामी शतकांसाठी नवभारताचा भक्कम पाया बनून अमर राहतील. हे लक्ष्य आता दूर नाही. चला, वेगाने पावले उचला!

Web Title: PM Narendra Modi's Note After Meditating At Vivekananda Rock Memorial , Kanniyakumari : Take the plunge, there's no time to look back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.