संभ्रम की बात!

By admin | Published: June 30, 2015 03:51 AM2015-06-30T03:51:47+5:302015-06-30T03:51:47+5:30

देशाचा पंतप्रधान जनतेशी नियमतिपणे संवाद साधतो, ही गोष्ट गेल्या काही वर्षांत प्रथमच घडू लागल्याने नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या उपक्रमाचे बहुतांशी स्वागतच झाले होते.

The point of confusion! | संभ्रम की बात!

संभ्रम की बात!

Next

देशाचा पंतप्रधान जनतेशी नियमतिपणे संवाद साधतो, ही गोष्ट गेल्या काही वर्षांत प्रथमच घडू लागल्याने नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या उपक्रमाचे बहुतांशी स्वागतच झाले होते. देशापुढील समस्या, त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न, जनहिताच्या अनेक आर्थिक व सामाजिक योजना आणि त्याच्या अंमलबजावणीचे सरकारी प्रयत्न, त्यात येणाऱ्या अडचणी व त्या दूर करण्यासाठी लोकांचा अपेक्षीत असलेला सहभाग इत्यादीबाबत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आपले मत जनतेसमोर आता नियमितपणे मांडणार, असे मानले जात होते. शिवाय जे जे काही वाद वा विसंवाद देशात घडत असतात, त्याबाबतची सरकारची भूमिका पंतप्रधान जनतेपुढे मांडतील, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण पंतप्रधानपदी आल्यापासून नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्र माचा मुख्य भर हा प्रबोधनपर राहिला आहे आणि देशापुढच्या प्रमुख समस्यांवर मोदी काहीही बोललेले नाहीत. साहजिकच जनतेशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम सामाजिक समस्या सुधारणा या पुरताच मर्यादित राहणार की काय, अशी शंका वाटू लागली होती. ही शंका रविवारच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाने खरी ठरवली आहे. गेल्या पंधरवडाभर देशात एकीकडे ललित मोदी प्रकरणावरून राजकीय रण माजले आहे आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक स्थितीबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. अशा मुद्यांंना रविवारच्या ‘मन की बात’मध्ये काही स्थान मिळालेले नाही. उलट ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचा एक भाग म्हणून आपल्या मुलीबरोबर स्मार्टफोनमधून ‘सेल्फी’ काढण्याबाबत हरयाणातील एका खेड्यातील पंचायतीने तेथील रहिवाशांना केलेल्या आवाहनालाच रविवारच्या ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी स्थान दिले. अशी ‘सेल्फी’ छायाचित्रे काढून ती योग्य त्या शीर्षकासह ‘आॅनलाईन पोस्ट’ करा आणि त्यातील सर्वात चांगल्या शीर्षकासहितच्या ‘सेल्फी’ची निवड करून मी ते माझ्या ’ट्विटर’ खात्यावरून देशभर पाठवीन, असा नवा कार्यक्र म मोदी यांनी देशाला दिला आहे. दररोज सकाळी उठलो की, पहिल्या अर्धा मिनिटात माझ्या हातात स्मार्टफोन असतो आणि लगेच मी जगाशी ‘कनेक्टेड’ असतो, असे मोदी यांनी एका ब्रिटिश लेखकाला मुलाखत देताना मध्यंतरी सांगितले होते. परदेशात गेल्यावर पंतप्रधान मोदी तेथील नेते व लोकांबरोबर किती व कसे ‘सेल्फी’ काढून घेतात, हेही भारतीयांना गेल्या वर्षभरात बघायला मिळाले आहे. तेव्हा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या आपल्या योजनेच्या प्रसारासाठी मोदी यांनी ‘सेल्फी’च्या आवडत्या तंत्राचा उपयोग करायचे ठरवले, तर आजच्या २१ व्या शतकात त्यांना कोणी दोष द्यावा, अशी स्थिती नाही. पण मुद्दा नुसता ‘सेल्फी’चा नाही वा मोदी यांच्या ‘डिजीटल आवडी’चाही नाही. तो आहे ‘मन की बात’ या कार्यक्रमामागच्या उद्देशाचा व त्यातील आशयाचा. जर जनतेशी संवाद साधणे, हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असेल, तर पंतप्रधानानी या कार्यक्रमाद्वारे देशात चालू असलेल्या वाद व विसंवादाचे रूपांतर संवादात करण्यावर भर देणे अपेक्षीत आहे. तसे काहीच करायचे मोदी यांच्या मनात दिसत नाही. राजकीय व आर्थिक समस्यांकडे आम्ही लक्ष देऊ, तुम्ही फक्त सामाजिक उपक्र मात आमची साथ द्या’, अशी मोदी यांची भूमिका दिसते. एकदा जनतेने मते दिली की, पाच वर्षांनी त्यांनी आम्हाला विचारावे, तोपर्यंत आम्ही राज्य करू, ते जनहिताचे आहे की नाही, ते पाच वर्षांनी तुम्ही ठरवा, अधेमधे आम्हाला काही विचारू नका, असा या भूमिकेमागचा दृष्टिकोन आहे. मात्र पालकांनी मुलीबरोबर काढलेल्या ‘सेल्फी’मुळे’ ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेतला विधायक हातभार लागेल, असे जर मोदी यांना वाटत असेल, तर तो पूर्ण गैरसमज आहे. अशा ‘चमकोगिरी’त सहभागी होऊन प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात येण्यापलीकडे खरोखरच कुटुंबात मुलीला प्रतिष्ठेचे व मुलाच्या बरोबरीचे स्थान पुरूषप्रधान संस्कृतीची मुळे घट्टपणे रूजलेल्या आपल्या समाजात दिले जाईल, याची अजिबात शक्यता नाही. बाकी समाजाचे सोडा, खुद्द मोदी यांच्या भाजपातील आणि एकूण संघ परिवारातील नेते व कार्यकर्ते यांना ज्या प्राचीन हिंदू (भारतीय नव्हे) संस्कृतीचे सतत उमाळे येत असतात, त्यात ‘यत्र नार्यस्तू पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:’ या पलीकडे जाऊन स्त्रीला पुरूषाएवढे समान स्थान देण्याची सोयच नाही. स्त्रीला देवत्वाच्या चौथऱ्यावर बसवून नंतर उपभोग घेण्याची कायमची सोय असलेली एक दासी म्हणून तिचा वापर केला जाण्याची परंपराच हिंदू संस्कृतीने निर्माण केली आहे. म्हणूनच ‘विवाह बंधनात बलात्कार होणे, हे आमच्या संस्कृतीत संभवत नाही,’ असे मोदी सरकारने संसदेतच सांगून टाकले आहे. ‘बेटी बचाओ’ करायचे असेल, आपला पक्ष व संघ परिवार यांच्या पुराणमतवादी मनोभूमिकेत मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी ठोस पावले टाकली जात आहे, याची प्रचिती मोदी यांना जनतेला आणून द्यावी लागेल. पण खुद्द मोदीच जगातील प्रतिष्ठित डॉक्टरांपुढे पुराणातील वैद्यकीय प्रगतीचे गोडवे गाताना देशाने बघितले असल्याने, पंतप्रधानांचे आकाशवाणीवरील भाषण ही ‘संभ्रम की बात’ ठरणार, असा आडाखा कोणी बांधला, तर त्याला दोष तरी कसा काय देता येईल?

Web Title: The point of confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.