बदलत्या जनमानसाचा राजकीय व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:59 PM2018-05-15T23:59:50+5:302018-05-15T23:59:50+5:30

परिवर्तन व प्रबोधनाच्या चळवळींनी एकेकाळी महाराष्ट्र जागविला. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि माणुसकी या मूल्यांसाठी नेते व लोकशिक्षक राजकीय नेतृत्वासारखे लोकांना सोबत घेऊन पुढे झाले.

Political business of changing public opinion | बदलत्या जनमानसाचा राजकीय व्यवसाय

बदलत्या जनमानसाचा राजकीय व्यवसाय

Next

- सुरेश द्वादशीवार

परिवर्तन व प्रबोधनाच्या चळवळींनी एकेकाळी महाराष्ट्र जागविला. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि माणुसकी या मूल्यांसाठी नेते व लोकशिक्षक राजकीय नेतृत्वासारखे लोकांना सोबत घेऊन पुढे झाले. दर्पणकार जांभेकरांपासून ज्योतिबांपर्यंत, काँग्रेसच्या स्थापनेपासून गांधीजींच्या खुनापर्यंत आणि आगरकरांपासून आंबेडकरांपर्यंतची सारी आदरणीय माणसे जनतेसोबत वा आपआपल्या संघटनांसोबत या लढ्यात आघाडीवर असलेली इतिहासाने पाहिली. जे मूल्य ज्या वर्गाला जिव्हाळ्याचे वाटले, त्या मूल्यासाठी तो वर्ग निष्ठेने केवळ पुढे येतानाच नाही तर त्यासाठी हवी ती किंमत मोजताना दिसला. ज्योतिबा व सावित्रीबार्इंनी भोगले ते साऱ्यांना ठाऊक आहे. आगरकरांच्या विरोधकांनी जिवंतपणीच त्यांच्या प्रेतयात्रा काढल्या. स्वातंत्र्याचे आंदोलन हजारोंचा तुरुंगवास व प्राणार्पणासोबत गांधीजींच्या खुनाने रक्तरंजित केले. आंबेडकरांच्या वाट्याला आलेल्या यातनांची ओळखही साºयांना आहे. आता परिवर्तनाची लक्ष्ये बदलली आहेत. नव्या लक्ष्यांना साजेशीच नेतेमंडळीही त्यांना लाभली आहे. मात्र आताच्या परिवर्तनाच्या चळवळी सक्रिय असण्याहून लिहित्या व बोलत्याच अधिक असल्याचे दिसले. त्यांंची परिणामकारकता कमी नाही. दाभोलकर व पानसरे किंवा कलबुर्गी आणि गौरी यांचे खून त्याचपायी झाले. पण या व्यक्तींसोबत उचंबळून पुढे येणारे संघटित जनमत मात्र दिसले नाही. ज्योतिबा एकटे नव्हते, गांधींसोबत सारा देश होता, आंबेडकरांच्या पाठीशी दलितांचे तांडे होते. मागे राहणाºयांचा वर्गही नेत्यांएवढाच पेटलेला, संघर्षरत व त्यागाला सिद्ध होता. आताची क्रांती कवितेत दिसते व शब्दातून प्रकटते. प्रत्यक्ष जनजीवनात तिचे सक्रियपण जाणवत नाही. या शब्दप्रभूंना मात्र आपले शब्द समाजाला वळण देतात आणि आज लिहिलेली आपली कविता लागलीच प्रकाशित झाली नाही तर क्रांतीला उशीर होईल असे खात्रीशीरपणे वाटत असते.
परिवर्तनाची गरज तशीच आहे. प्रबोधनाचा अभावही वेगळ्या नेतृत्वाची व मार्गदर्शनाची मागणी करीत आहे. तरीही असे का घडले? समाजाचा विश्वास ज्याच्या शब्दावर असतो त्याचा शब्द मंत्रासारखा सामर्थ्यशाली होतो. मात्र शब्दात मंत्रसामर्थ्य येण्यासाठी तो उच्चारणाºयाच्या मागे त्याचे आयुष्य तारण म्हणून उभे व्हावे लागते. ‘चले जाव’ हा मंत्र होता. ‘शिका आणि संघटित व्हा’ हाही मंत्र होता. त्या कविता नव्हत्या. आताचे नेतृत्व कमी पडते की असलेल्या नेतृत्वाचा जनमानसाशी असावा लागणारा हृदयसंवादच आता संपला आहे. या चळवळींना राजकीय वळण लागल्याने आणि त्यांच्या पुढाºयांना सामाजिकतेहून राजकीय सत्तेचे आकर्षण मोठे वाटल्याने हे घडले काय? सामाजिकच नव्हे तर आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील लढ्यांची स्थितीही आता याहून वेगळी नाही. कामगारांच्या चळवळी कुठे गेल्या? त्यांच्या संघटना कामगारांच्या न राहता राजकीय का बनल्या? विद्यार्थ्यांच्या चळवळीही पक्षीयच झाल्या आहेत की नाही? प्रत्येक राजकीय पक्ष विद्यार्थ्यांची सेना वा संघटना उभी करतो. या संघटना विद्यार्थ्यांसाठी झटतात की राजकीय पुढाºयांसाठी? त्यातून आपण जाती-धर्मात वाढलेले. आपल्या चळवळींना आता त्यांचेही अडसर आहेत. मुसलमानांचे प्रश्न मुसलमानांनी आणि हिंदूंचे हिंदूंनी सोडवायचे. दलितांचे दलितांनी आणि ओबीसींचे ओबीसींनी. या साºयांना एकत्र आणणारे गांधी किंवा आंबेडकर दरवेळी कसे जन्माला येणार?
पूर्वीचे जग त्यागासाठी तर आताचे आपण मतलबासाठी एकत्र येतो काय? आपली दृष्टी निष्ठेची न राहता लाभार्थ्याची झाली आहे काय? हे कशासाठी, याहून यातून काय मिळेल हा सवाल महत्त्वाचा झाला आहे काय? शुंपिटर या राज्यशास्त्रज्ञाने राजकारणाची व्याख्या ‘कुणाला काय, कधी व कां मिळाले’ याचा अभ्यास म्हणजे राजकारण अशी केली आहे. मिळाले त्यावर समाधानी होऊन थांबतात ते चळवळी कसे करतील आणि न मिळाल्यामुळे जे चळवळीत उतरतील ते सामाजिक तरी कसे होतील?
फेसबुक, टष्ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या कुणालाही वापरता येणाºया आताच्या व्यक्तिगत वाहिन्या नुसत्या पाहिल्या तरी आताच्या राजकारणाच्या हाती लागलेल्या सवंग व विस्कळीत लोकमताची गुरुकिल्ली दिसू लागते. अमेरिकनांची अशी मानसिकता अभ्यासूनच रशियाच्या तंत्रज्ञांनी २०१६ च्या निवडणुकीत हिलरी क्लिंटनच्या पराभवाची आणि डोनाल्ड ट्रम्पच्या निवडीची तयारी केली. त्यासाठी फेसबुक, यूट्यूब, टिष्ट्वटर व संगणकावर सहज उपलब्ध होणाºया सामाजिक मानसिकतेचे हवे तसे विश्लेषण करून त्यांनी तिचा उपयोग केला. आता जगभरातील निवडणुकांच्या निकालाचे अंदाज वर्तविणारे आकडेबाज शास्त्रज्ञ याच माहितीची गोळाबेरीज व विश्लेषण करून त्यांना हव्या त्या पक्षांना व नेत्यांना मदत करताना दिसतील. मार्क झुकेरबर्गने व फेसबुकने जमा केलेली व्यक्तिगत मानसिकतेची अशी गोळाबेरीजच या आकडेशास्त्र्यांनी त्यांना पोसणाºया पक्षांना पुरविली. तिचा हवा तसा वापर करून लोकमानसाला वळण देण्याचे तंत्रही आता विकसित झाले आहे. नेते बदलतात, वर्ग बदलतात, जातींमध्ये मतांतरे घडून येतात, धर्मांचे अतिरेकीपण वाढते, कालपर्यंत एका रंगाचे असलेले वर्ग त्यांचे रंग बदलताना दिसतात आणि पक्षांची रूपेही बदलत जातात.
समाजात समाधानी कोण आणि त्याच्या समाधानाची कारणे कोणती? असमाधानी कोण आणि त्यांची वेगळी गरज कोणती? समृद्ध कोण आणि त्याहूनही त्यात समाधानी असणारे कोण? कोण नुसत्याच कविता करतात, कोण नुसतीच नेत्यांची वाहवा करतात, लोक कुणाच्या नावाने बोटे मोडतात आणि कुणाच्या आरत्या ओवाळतात, या प्रश्नांची उत्तरे माणसांच्या मूल्यनिष्ठा व त्यांच्या जन्मनिष्ठांची ओळख पटवितात. त्यातले निष्ठावान कोण आणि फलार्थी कोण हे सांगतात. समाजाची अशी आकडेवारी त्याच्या मानसिकतेसह हाती आली की मग तीत पक्षांचे व पुढाºयांचे रंगच तेवढे भरायचे असतात. कुणाला काय द्यायचे, कुणाला कुठे दुखवायचे, कुणाचे समाधान करायचे आणि कुणाचे असमाधान काही काळ जगवायचे, हे समजले की निवडणुकांचे जाहीरनामे तयार करता येतात. प्रचाराची व्याख्याने सजविता येतात. कोणत्या पुढाºयाला केव्हा पुढे करायचे आणि कुणाला कुठे मागे ठेवायचे हे ठरविता येते. मग निवडणूकतज्ज्ञ येतात आणि ते नेत्यांना राजकीय मार्गदर्शन करू लागतात. अशावेळी राज्यकर्ते नेते असतात की ते संगणकतज्ज्ञ?
निष्ठा गेल्या आणि चळवळींची तीव्रता संपली. मग समाधानाचे खोटेच का असेना राजकारण सुरू झाले. मार्क्स म्हणाला मध्यम वर्ग त्याच्या शोषणातही सुखी असतो. कारण त्याच्याहून जास्तीचे शोषित व दरिद्री असणारे त्याला दिसत असतात. शिवाय शोषणातही तो संपन्न असतो. निवडणुकीतील राजकीय व सामाजिक भूमिका पातळ झाल्या आणि नफा-नुकसानीची मानसिकता प्रबळ झाली की याहून वेगळे काही व्हायचेही नसते. आपल्या सामाजिक चळवळींचे आजचे दुबळेपण या वास्तवात आहे काय?
(संपादक, नागपूर)

Web Title: Political business of changing public opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.