राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर सामाजिक स्वातंत्र्यात झाले पाहिजे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:54 AM2023-12-06T05:54:26+5:302023-12-06T05:55:18+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे पुन्हा स्मरण करण्याची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील सामाजिक क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारे एक महानायक होत. म. जोतिराव फुले यांनी सामाजिक समतेसाठी जो लढा उभारला होता तोच लढा पुढे गतिमान करताना बाबासाहेबांनी म. फुले यांच्याप्रमाणेच मनुस्मृती, वेद, उपनिषदे, प्रतिक्रांतिवादी धर्मग्रंथांवर घणाघाती हल्ले करून सामाजिक समतेचा पुरस्कार केला.
बाबासाहेब म्हणजे महान ज्ञानर्षी. ब्रिटिश पत्रकार बेवर्ले निकोल्स याने भारत देश जाणून घेण्यासाठी भारतभर भ्रमंती करताना म. गांधी, पंडित मदनमोहन मालवीय, बॅरिस्टर जीना ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेकांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केल्या. या चर्चेचा निष्कर्ष त्यांनी आपल्या ‘वर्डिक्ट ऑन इंडिया’ या ग्रंथात मांडताना म्हटले, ‘भारतातील सहा बुद्धिमान व्यक्तींत बाबासाहेबांचे स्थान अत्युच्च दर्जाचे आहे.’
बाबासाहेबांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, कायदा आदी विषयांत प्रावीण्य मिळवून ज्ञानवंत, तत्त्वज्ञ, प्रकांडपंडित म्हणून नावलौकिक मिळविला व आपल्या व्यासंगी बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताचे महान संविधान लिहून ते त्यांनी राष्ट्राला अर्पण केले. आपल्या प्रज्ञेचा उपयोग त्यांनी दलित-वंचित घटकांना मानवतेचे हक्क मिळवून देण्यासाठी करताना संविधानाद्वारे कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली व मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी घटनेत राखीव जागांची तरतूदही करून ठेवली. जातीचा राक्षस मारल्याशिवाय या देशात राजकीय व सामाजिक परिवर्तन होऊ शकणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते.
बाबासाहेब विभूतिपूजेचे निंदक होते. घटना समितीत दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी समारोपाचे भाषण करताना त्यांनी म्हटले, ‘भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की, इतर कोणत्याही देशातील राजकारणात अशी भक्ती वा विभूतिपूजा आढळत नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो; परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अधःपतनाचा व पर्यायाने हुकूमशाहीचा खात्रीलायक मार्ग होय.’
राष्ट्रीय भावनेपेक्षा धार्मिक भावना प्रबळ असणे राष्ट्राला घातक असते़ याची बाबासाहेबांना पूर्ण जाणीव होती, म्हणून त्यांनी राष्ट्र हे धर्मावर आधारित असणे ही गोष्ट धर्मनिरपेक्ष लोकशाहीस बाधा निर्माण करू शकते, असा इशारा देऊन ठेवला. बाबासाहेब सांगत होते, ‘भारत हे एक राष्ट्र आहे, या भ्रमातून जेवढ्या लवकर आपणास बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर आपण बाहेर पडले पाहिजे. कारण भारत हा जातीपातींनी एवढा लुळापांगळा झाला आहे की, तो एक राष्ट्र म्हणून उभा राहूच शकत नाही. भारतास जर एक राष्ट्र म्हणून उभे राहावयाचे असेल तर जातीपातीचा अंत झाला पाहिजे. राजकीय स्वातंत्र्याचे सामाजिक स्वातंत्र्यात रूपांतर झाले पाहिजे तरच भारताची लोकशाही टिकून भारत हे एक राष्ट्र म्हणून उभे राहू शकेल.’
बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला तो काही हिंदू धर्मावर सूड उगविण्यासाठी नव्हता तर धर्मांतराच्या चळवळीकडे ते एक प्रबोधनाची चळवळ म्हणून पाहत होते. बाबासाहेबांचा धम्मस्वीकार हा काही केवळ अस्पृश्यांच्या मुक्तीसाठीच नव्हता तर तो समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी होता. म्हणूनच त्यांनी भारतीय संविधानात धम्मातील अनेक मूल्यमय गोष्टींचा समावेश केला.
डॉ. बाबासाहेबांनी समाजजीवनात जातींमुळे वैरभाव, मत्सर निर्माण होऊन अलगतेची भावना रुजते व ती राष्ट्राच्या प्रगतीस खीळ घालते असा जो इशारा दिला होता त्याचा विदारक अनुभव आज येत आहे. आता जाती मोडण्याची नव्हे तर जाती बळकट करण्याची आंदोलने होत आहेत. जाती-जातींत शत्रुत्व वाढेल अशा भाषेचा सर्रास वापर होत आहे. बाबासाहेबांनी विभूतिपूजेला नकार दिला होता. पण आज मात्र सर्वत्र व्यक्तिस्तोमाचे राजकारण होत आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या समग्र सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे चिंतन-मनन पुन्हा पुन्हा होण्याची गरज आहे.
बी. व्ही. जोंधळे, आंबडेकरी चळवळीचे अभ्यासक