पोलिटिकल लोचा
By दिलीप तिखिले | Published: May 5, 2018 12:33 AM2018-05-05T00:33:11+5:302018-05-05T00:33:11+5:30
आपल्या खोलीत कुठलेतरी पुस्तक वाचण्यात मग्न असलेला सर्किट त्या आवाजाने दचकलाच. खोलीत तर कुणीच नाही. आवाज कुठून येतो आणि आवाजही ओळखीचा वाटतो
सर्किट... बेटा कुठे आहेस तू.
आपल्या खोलीत कुठलेतरी पुस्तक वाचण्यात मग्न असलेला सर्किट त्या आवाजाने दचकलाच. खोलीत तर कुणीच नाही. आवाज कुठून येतो आणि आवाजही ओळखीचा वाटतो...! कोण आहे ?... म्हणण्याआधीच पुन्हा आवाज आला. बेटा डावीकडे कोपऱ्यात बघ! सर्किटने नजर वळविली आणि... सोफ्यावरून दोन हात वर उडालाच!
बापू, आ...प?
हो... बापूच होते ते. ‘लगे रहो...’मध्ये मुन्नाभाईला वेळोवेळी दर्शन देणारी तीच बापूंची मूर्ती. पण यावेळी बापूंच्या चेहºयावर नेहमीचे स्मितहास्य नसून चिंतेची छटा होती.
इकडे सर्किटची अवस्था भांबावलेलीच.
‘बापू आप...’ म्हणताना तोंडाचा वासलेला ‘आ...’ अजूनही तसाच होता.
मग बापूच म्हणाले...! बेटा सर्किट, आधी तो ‘आ’ बंद कर आणि मला सांग मुन्ना कुठे आहे?
सर्किट भानावर आला...गद्गद् होऊन म्हणाला, बापू धन्य झालो... ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये अख्खे तीन तास डोळे फाडून बघत होतो, पण एकदाही दर्शन झाले नाही. आणि आज अचानक... व्वा मजा आया...!
मुन्ना कुठाय?- बापूंची पुन्हा विचारणा.
सर्किट : बापू आप सिरियस लग रहे हो... कोई लफडा... किसी की हड्डी तोडना है? या कोई मकान खाली करवाना है?
बापू : सर्किट, ये हिंसा की बात मत कर. मुझे मुन्नासे बात करना है.
सर्किट : मुन्ना, बोले तो संजूबाबा... वो तो गुजरात मे शुटिंगपर है.
बापू : गुजरातेत..? मग बरोबर आहे. म्हणूनच त्याचा मोबाईल नंबर नॉट रिचेबल येत होता आणि व्हॉटस्-अॅपवर पाठविलेले मॅसेजही बाऊन्स होत होते.
बापूंच्या तोंडून हे ऐकून सर्किटने पुन्हा आ वासला.
सर्किट : बापू, अपुन के भेजे मे तो कुछ नही जा रहा. ये आपके पास मोबाईल, व्हाटस्-अॅप कहाँ से आया आणि...मला एक समजत नाही, तुम्ही कुणालाही, कुठेही आणि केव्हाही भेटू शकता. मग मुन्नाला डायरेक्ट न भेटता माझ्याकडे कसे आलात?
बापू : सांगतो बाबा...मी कुणालाही, कुठेही भेटू शकतो. पण गुजरात सोडून.
सर्किट : गुजरात क्यू नही ? वो तो आपका नेटिव्ह स्टेट है.
बापू : नाही बेटा. तेथे आता दुसरा ‘महात्मा’ आहे. त्याला गांधी व्हायचे आहे. पटेल, आंबेडकर यांना तर त्यांनी त्याब्यात घेतलेच. आता मलाही हायजॉक करू पाहत आहेत. काँग्रेसपासून तोडू पाहत आहेत. उपोषण, सत्याग्रह, दलितोद्धार हे माझे लक्ष्य होते. त्यांच्या गांधी बनण्याला माझी हरकत नाही पण, सकाळी भरपेट नाश्ता करून काही तासाचे उपोषण करणे, दलितांच्या घरी जाऊन हॉटेलचं मागवून जेवण करणे हा गांधीवाद नाही हे त्यांना मुन्नाखारख्याने सांगण्याची गरज आहे.
सर्किट : बापू... एक बात कहूं...हे सब पोलिटिकल लोच्या है. अभी इलेक्शन आ रहा है नां!
बापू : बरं ते जाऊ दे. आता राहिली तुझी मोबाईल, व्हॉटस्-अॅपबाबतची शंका. तर मित्रा, वर सर्वकाही उपलब्ध आहे. नारदमुनीकडे इंटरनेट आहे. तिन्ही जगाला ते त्यानेच बातम्या पुरवितात. महाभारतातल्या संजयकडे सॅटेलाईट सेवा होती. मग मोबाईल तर क्षुल्लक आहे. नाही पटत. मग जा, बीजेपीच्या कोणत्याही नेत्याला विचार. एवढे बोलून बापू ‘मिस्टर इंडिया’ झाले.