संवादाचा गळा घोटला जात आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 11:21 AM2021-12-23T11:21:38+5:302021-12-23T11:22:17+5:30

संवाद म्हटला की मतभेद आलेच; पण सध्या मात्र पूर्वनिश्चित वैरभावच अधिक दिसतो. त्यातून संवादाची शक्यता धूसर होते!

political situation in country and the dialogue is being choked | संवादाचा गळा घोटला जात आहे, कारण...

संवादाचा गळा घोटला जात आहे, कारण...

Next

पवन वर्मा

भाजप आणि रास्व संघाच्या काळात सर्वाधिक धोक्यात आलेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सुसंस्कृत वादविवाद, शास्त्रार्थ ही होय!  बौद्धिक मंथनातून सत्य बाहेर येते या अंगभूत विश्वासामुळे वादसंवाद हा प्राय: उत्स्फूर्त असतो. आधी निर्णय ठरवून केलेली ती क्रिया नसते. भारतीय परंपरेत सत्य एक सैद्धांतिक प्रतिपादन असू शकेल; पण त्यात ठामपणा येण्यासाठी बौद्धिक चलनवलन असले पाहिजे. आज आपल्या सार्वजनिक बोलण्यात ठिसूळपणा अधिक आलेला दिसतो, त्याची कारणे शोधताना  या मुद्याचा विचार केला पाहिजे. ख्रिस्तपूर्व २०० वर्षे किवा त्याआधी भरतमुनी होऊन गेले. या भरतमुनींनी नाट्यशास्त्राच्या ३६ प्रकरणांत ६ हजार श्लोक लिहिले आहेत. एकीकडे हे नाट्यशास्त्र कलाविषयक मार्गदर्शन करते. एखाद्या कार्यपुस्तिकेसारखा तो महत्त्वाचा ग्रंथ आहे; पण त्याचवेळी सौंदर्यशास्त्र, रस, अनुभव, कलावंत आणि आस्वादक दोघांचा कलात्मक अनुभव याचे अध्यात्मही हा ग्रंथ सांगतो, हे विशेष.

१७१२ मध्ये जोसेफ ॲडिसन या पत्रकाराने ‘स्पेक्टॅटर’ नियतकालिकात ‘कल्पनेचे सुख’ हा निबंध लिहिला तेव्हापासून सौंदर्यशास्त्र हाही तत्त्वज्ञानाचा भाग मानला जाऊ लागला. वास्तविक भारतात मात्र शतकभर आधी कलात्मक अनुभवाच्या बाबतीत अत्यंत विकसित, आधुनिक संकल्पना मांडली गेली होती. जगात इतरत्र लोक खूपच मागासलेले होते असे म्हणावे लागेल. आपल्याकडेही सांस्कृतिक ठेकेदारांना ती संकल्पना अर्थातच माहिती नव्हती.
भरताच्या मते ‘रस’ म्हणजे कलावस्तू, तिचा निर्मिक आणि आस्वाद घेणारा यांच्यातल्या बौद्धिक संवादातून होणारी निष्पत्ती. एखादी गोष्ट आवडत नाही असा भाव मनी बाळगून आस्वाद घेऊ गेले, तर असा संवाद होऊ शकत नाही. सध्या पूर्वनिश्चित वैरभाव अधिक दिसतो आहे. संवादाच्या शक्यतेचा गळा त्यामुळे घोटला जातो. बौद्धिक लवचिकतेच्या जागी एकतर्फी निर्णय येतो. कलेचे मूल्यमापन मग तिच्या अंगच्या गुणांऐवजी बाह्य हेतू साधण्याच्या क्षमतेवर होऊ लागते.

संवाद नसता तर भारतीय संस्कृती आज जशी आहे तशी नसती. आपण क्षणभर थांबून विचार केला तर असे दिसेल की, हिंदुत्वाचे तिन्ही मूळ आधार ग्रंथ हे प्राय: संवाद आहेत. उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रावरील टीका हे तिन्ही संवाद असून, विरोधी मतांचा विचार त्यात समाविष्ट आहे.  आदि शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्यात झालेला वादसंवाद हिंदुत्वाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावतो. शंकराचार्यांनी ज्ञानमार्गाचा, तर मंडनमिश्रने कर्मकांडाचा पुरस्कार केला. वैचारिकदृष्ट्या ही दोन टोके होती; परंतु समोरासमोर बसून मतभेदांवर चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. शंकराचार्यांनी मंडनचा हिंसेने नव्हे, तर वादात पराभव केला. फार थोड्यांना ही गोष्ट माहीत असेल की कर्नाटकात बिज्जाल राज्यातील कल्याण नगरात एक अनुभव मंडप उभारण्यात आला होता. सर्व सामाजिक, आर्थिक स्तरातले लोक तेथे जमून अध्यात्मावर, सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर खुली चर्चा करीत. आक्का म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या महादेवीने याच मंडपात  महान लिंगायत संस्थापक बसवण्णा आणि अल्लामा प्रभूंशी भक्तीवर चर्चा केली होती.

संवाद म्हटला की मतभेद आलेच आणि सुसंस्कृत बोलण्यातून सूर जुळवून घेता येतात यावर विश्वास हवा. म्हणूनच हिंदू तत्वज्ञान एक नव्हे, तर सहा तत्त्वज्ञानांची मांडणी आहे. वेदांनाच खोटे ठरविणाऱ्या ऐहिकवादी चार्वाकालाही हिंदू परंपरेत जागा मिळाली. 

रामायण, महाभारत ही आपली महाकाव्ये तर संवादाने भरून वाहताना दिसतात. ‘युधिष्ठिर आणि द्रौपदी’ या माझ्या पुस्तकात मी युधिष्ठिर आणि यक्ष यांच्यातला संवाद दिला आहे. यक्ष विचारतो ‘हे आर्य, या जगात आश्चर्यकारक असे काय आहे?’ युधिष्ठिर उत्तरतो ‘लाखो लोक येतात आणि जातात.. हे सारे पाहात जिवंत असणारे मात्र मानतात आपण अमर्त्य आहोत. यापरते आश्चर्य ते कोणते?’ 

संवादाची सवय कमी होत जाते तसा ज्ञानाला मोठा धक्का पोहोचतो. माहिती दडविण्याकडे कल वाढतो. वरवरच्या खंडनावर भर दिला जातो. समग्रतेऐवजी तात्पुरत्या डागडुजीवर भागविले जाते. हा मार्ग आपल्या ऋषीमुनींनी झिडकारला आहे. विष्णूधर्मोत्तरात राजा आणि साधूमधला हा उद्बोधक संवाद येतो. राजाला कलेचे मर्म जाणून घ्यायचे आहे. साधू म्हणतो, त्यासाठी आधी नृत्यकलेचा सिद्धांत जाणून घे!- राजा ते मान्य करतो तर त्याला चित्रकला शिकायला सांगितले जाते. तो तेहीकरायला तयार होतो; पण त्याला संगीताचा अभ्यास करायला सांगितले जाते.

मुद्दा इतकाच की कर्कशता आणि संकुचितपणा अर्थपूर्ण संवादाला मारक आहेत. थोर मुगल राजा अकबर सूफी संप्रदायाच्या चिश्ती परंपरेचा अनुयायी होता. ‘दिन ए इलाही’ या त्यानेच तयार केलेल्या व्यासपीठावर खुल्या धार्मिक चर्चांचा तो भोक्ता होता. सर्वधर्म एक तर खरे आहेत किंवा भ्रामक असे तो म्हणायचा, तसेच वेदांत आणि सूफिझम यांचे सांगणे एकच आहे हे त्याचे मत त्याच्या उदारमतवादाची साक्ष देते; परंतु त्याचा हा धार्मिक उदारमतवाद ताकदवान कट्टरपंथीय उलेमांनी अव्हेरला. त्याला पाखंडी घोषित करून त्याच्याविरुद्ध फतवे काढले. 

शेवटी हिंदुत्व असो वा इस्लाम, मतांध लोक संवादाचे शत्रू असतात.  सनातन हिंदू धर्मात मात्र सदैव सर्वसमावेशकता असल्याचे दिसेल. शास्त्रार्थ, सुसंस्कृत वादविवाद हे हिंदूधर्माचे व्यवच्छेदक लक्षण होते. तेच आपण नष्ट करणार असू तर आपल्या संस्कृतीचा आधारच काढून घेतल्यासारखे होईल.

Web Title: political situation in country and the dialogue is being choked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.