BLOG: 'सुपरकाॅप' असण्याची बेदरकार नशा, राजकीय शिक्का अन् सचिन वाझे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:55 AM2021-03-11T08:55:42+5:302021-03-11T09:53:58+5:30
गुन्हेगारीचा बीमोड करण्याच्या उद्देशातून एन्काउंटर स्पेशालिस्ट उदयाला आले असले तरी कालांतराने हे सुपरकॉप पोलीस दलाची डोकेदुखी ठरले.
- संदीप प्रधान
‘सत्या’ चित्रपटात पोलीस आयुक्त आमोद शुक्ला हे इन्स्पेक्टर खांडिलकर यांना सांगतात की, गुन्हेगारी टोळ्यांचे जे गुंड आपापसात लढून मरतायत त्यांना मरू दे, बाकीच्यांना आपण संपवू. १९८० व १९९० या दोन दशकांमध्ये मुंबई वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांमुळे धगधगती होती. रोज कुठे ना कुठे गोळीबार होऊन गुन्हेगारी टोळ्यांमधील गुंड परस्परांना संपवत होते. केवळ गुंड नव्हे तर कामगार नेते, बिल्डर, कंत्राटदार, व्यावसायिक, बॉलिवूडचे कलाकार-निर्माते इतकेच काय; पण उद्योगपती यांचेही खंडणी, वैमनस्य यातून खून पडू लागले.
काहींनी गुन्हेगारी टोळ्यांना खंडणी देऊन स्वत:चा जीव वाचवला. परंतु कालांतराने भूक वाढली, मग आपला जीव वाचवण्याकरिता पोलिसांकडे जाण्याऐवजी काहींनी विरुद्ध असलेल्या गुन्हेगारी टोळीचे संरक्षण घेतले. त्यामुळे तात्पुरते संरक्षण मिळाले. परंतु कालांतराने दोन्ही टोळ्या पैशाकरिता हात धुवून मागे लागल्या. या व अशा असंख्य घटनांनंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्या संपवण्याकरिता एन्काऊंटरचे हत्यार परजले. मन्या सुर्वे या गुंडाचे १९८२ साली एन्काउंटर करण्यात आले. १९९१ साली लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घुसून ए. ए. खान या अधिकाऱ्याने माया डोळस याच्यासह सात गुंडांना कंठस्नान घातले होते. सुरुवातीला गुन्हेगारी रोखण्याकरिता एन्काउंटर ही गरज वाटली. मात्र तो गुन्हेगारीचा बीमोड करण्याचा एकमेव व यशस्वी मार्ग नाही हेही पोलिसांना कळून चुकले.
मुंबई पोलीस दलातील असेच एक सुपरकॉप सचिन वाझे हे सध्या नव्या वादात गुरफटले आहेत. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीपाशी जिलेटीनच्या कांड्या व धमकीचे पत्र असलेली एक मोटार मागील महिन्यात सापडली. ही मोटार ज्या मनसुख हिरेन या ठाण्यातील रहिवाशाची होती त्यांचा अलीकडेच संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा वाझे तेथे हजर होते व तेव्हापासून त्यांच्याभोवती संशयाचे भूत फेर धरून नाचू लागले. आता तर हिरेन यांच्या पत्नीने थेट वाझे यांच्यावर आरोप केल्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. अखेर त्यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
गुन्हेगारीचा बीमोड करण्याच्या उद्देशातून एन्काउंटर स्पेशालिस्ट उदयाला आले असले तरी कालांतराने हे सुपरकॉप पोलीस दलाची डोकेदुखी ठरले. प्रदीप शर्मा असो की दया नायक अथवा विजय साळसकर असो की रवींद्र आंग्रे हे अधिकारी कालांतराने प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर आणि सोशल कॉन्टॅक्ट या सर्व बाबतीत इतके वजनदार झाले की, अनेकदा पोलीस आयुक्तांनाही त्यांचा हेवा वाटावा. एकेकाळी गुन्हेगारी टोळ्या विरोधी टोळीच्या शार्पशूटरना ठोकण्याकरिता स्वत: शार्पशूटर पोसत होत्या. कालांतराने जेव्हा एन्काउंटर स्पेशालिस्ट हे समाजात आदराचे व कौतुकाचा विषय झाले तेव्हा काही गुन्हेगारी टोळ्यांनी काही विशिष्ट एन्काउंटर स्पेशालिस्टशी संधान बांधले.
गुन्हेगारी टोळ्यांनी केवळ विरोधी गँगमधील कोणता नामचिन गुंड कुठे आहे, याची टीप देणे सुरू केले. लागलीच हे एन्काउंटर स्पेशालिस्ट तेथे जाऊन त्या गुंडाला जेरबंद करीत. हवी असलेली माहिती गोळा केल्यावर मध्यरात्री बनावट चकमकी करून त्याला ठार करीत. एक काळ असा होता की, काही मोजके पत्रकार हे या एन्काउंटर स्पेशालिस्टच्या गळ्यातील ताईत बनल्याने अमुक एक गुंडाचा एन्काउंटर होणार अशी बातमी लिहून ते घरी निघून जात व एन्काउंटर झाल्यावर संकेत मिळताच बातमी प्रसिद्ध करण्यास सांगत. या बदल्यात त्या गुंड टोळ्यांकडून मोठी माया एन्काउंटर स्पेशालिस्टनी गोळा केली. दया नायक यांनी त्यांच्या शाळेला नव्वदच्या दशकात दिलेली एक कोटी रुपयांची देणगी गाजली होती.
बहुतांश एन्काउंटर स्पेशालिस्ट शेकडो कोटी रुपयांचे धनी झाले. पेज थ्री पार्ट्यांमध्ये त्यांची उठबस होऊ लागली. जीममध्ये व्यायाम करतानाच्या त्यांच्या छायाचित्रांसह मुलाखती इंग्रजी पेपरात प्रसिद्ध झाल्या, काहींनी आपल्यावर चित्रपट काढले. एका विशिष्ट काळात गृह खात्यावर या एन्काउन्टर स्पेशालिस्टची इतकी पकड होती की, मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार हे आम्हीच ठरवणार, अशी शेखी ते पत्रकारांकडे मिरवत होते.
बिल्डर, बॉलिवूड, कंत्राटदार आदींच्या वादाच्या सुपाऱ्या घेऊन त्यात मध्यस्थी करण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली होती. कालांतराने गँगस्टर्स बांधकाम, बॉलिवूड व्यावसायिक झाल्याने गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया थांबल्या. ख्वाजा युनुस प्रकरणात अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट दलातून हद्दपार झाले. वाझे यांनाही त्याच प्रकरणाची झळ बसली. पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यावर किंवा हद्दपार व्हावे लागल्याने वाझेंसह अनेकांनी राजकीय पक्षात आसरा घेतला. हे राजकीय शिक्के आता त्यांची डोकेदुखी झाले आहेत.