'लगाव बत्ती' - ये तेरा घर... ये मेरा घर...
By सचिन जवळकोटे | Published: September 25, 2018 09:28 AM2018-09-25T09:28:40+5:302018-09-25T09:38:53+5:30
एकमेकांच्या तालुक्यात शिरू पाहणाऱ्या नेत्यांचं ‘पॉलिटिकल ग्लोबलायझेशन’
सोलापूरच्या देशमुख मालकांनी काल घोषणा केली की, ‘लोकसभेला बाहेरचा उमेदवार आम्हाला चालणार नाही,’ तेव्हा कुणीतरी हळूच खुसखुसलं, ‘मालकांचा मतदारसंघ उत्तरेत. ते मात्र राहतात ‘मध्य’मध्ये’. असो...त्यांचा रोख भलाही साबळेंकडे असेल, पण इथं जिल्ह्यात तरी नेमकं काय चाललंय? माढ्याच्या संजयमामांनी आता फक्त ‘करमाळकर’ एवढीच पदवी लावायची बाकी ठेवलीय. पंढरपूरचे उमेशपंतही म्हणे ‘मंगुड्याचं गाणं’ गाण्यासाठी उत्सुक बनलेत. अक्कलकोटचे सचिनदादा दक्षिण सोलापूरमधल्या सरपंचांना उचकाविण्यात रमलेत. थोडक्यात सांगायचं तर, सा-याच तालुक्यांचं पार ‘ग्लोबलायझेशन’ झालंय रावऽऽ.
तरुणांना वाव... तार्इंचं नाव !
सोलापुरात लोकसभेला कोण, हा एकच प्रश्न सध्या विचारला जातोय. भूतकाळ ध्यानात घेऊन भविष्यकाळाचा वेध घेण्यासाठी ‘सुपुत्र’ कामाला लागलेत. गेल्यावेळी कितीजण मिठाला जागले, याचाही शोध लागलाय. म्हणूनच की काय, ‘आपलं मीठ अळणी’ म्हणत बसण्यापेक्षा पुढं ‘मिठाचा खडा’ लागू नये म्हणून प्रत्येक घास चावून खाण्याची सवय लावून घेतलीय; पण लोकसभेला कोण, हा प्रश्न अनुत्तरीतच.. कारण ‘तरुणांना वाव’ या राहुलबाबांच्या नव्या घोषणेनुसार ऐनवेळी दिल्लीहून प्रणितीतार्इंचं नाव चर्चेत आलं तर काय करायचं?
कोणत्या पंतांचं समाधान ?
‘मंगुड्याचं गाणं’ आजकाल समद्यांना लईऽऽ आवडू लागलंय. पंढरीचे भारतनाना यापूर्वीच ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हणत मंगळवेढ्यात गेलेले. आता कुरुल गटातल्या शैलाताईही दामाजीपंतांचं दर्शन घेण्यासाठी तिकडं सतत जाऊ लागल्यात. ‘सिंचनाचं पाणी’ मंगळवेढेकरांना कधी मिळणार हे माहीत नाही...परंतु ‘सिंचनाचा पैसा’ पुढच्या वर्षी नक्कीच गवसणार, अशी आशा भगव्या कार्यकर्त्यांना वाटू लागलीय.. म्हणूनच अनेकजण म्हणे आत्तापासूनच गोडसे भावजींची ओळख वाढवू लागलेत.
असो. शैलातार्इंनी धनुष्याची प्रत्यंचा ताणल्यामुळे आवताडेदादांचे कार्यकर्ते चुळबूळ करू लागलेत; कारण तेही आता तयारीला लागलेत नां. म्हणूनच कारखाना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी ‘दहा रुपयांची साखर’ सभासदांना वाटली गेली.
चौका-चौकात बॅनरही झळकले. ‘साखर दहा रुपयांची...पण फ्लेक्स लाखोंचे !’ याची खुसफूसही जनतेत पिकली. अशा परिस्थितीत शैलातार्इंची एन्ट्री या गटाला बिल्कुल मानवली नाही. मात्र देवेंद्र पंतांसोबत आवताडे दादांची असणारी जवळीक कौतुकाची ठरलीय.
पंतांच्या माध्यमातून मंगळवेढ्यात ‘कमळ’ फुलवायची संधी साधता येईल, याचेही आडाखे बांधले जाऊ लागलेत. पण काय सांगावंऽऽ अजून एका पंतांच्या नावामुळे समीकरणं बदलू लागलीत. पंढरीच्या उमेश पंतांची चर्चा खाजगीत सुरू झालीय. अशातच प्रशांत पंतांचे दौरेही सुरू झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. आता तुम्हीच सांगा, अशा वेगवेगळ्या पंतांची नावं कानावर आदळली तर मंगळवेढ्यातल्या कार्यकर्त्यांना ‘समाधान’ मिळणार का रावऽऽ?
वो दो थे... और तुम आठ-आठ !
जिल्ह्यात सध्या शिंदे सरकारांचं घराणं फुल्ल फॉर्मात. बबनदादा विधानसभेत. संजयमामा झेडपीत. थोरले रणजितभैय्या कारखान्यात. धाकटे विक्रमदादा पंचायत समितीत. दादा शांत-संयमी. मामा मात्र आक्रमक. त्यांच्या कर्तृत्वाला सीना नदीची सीमा कमी पडू लागली; म्हणूनच पुन्हा एकदा स्वारी करमाळ्याच्या उजनी खो-याकडं निघाली. बाजार समितीतही एक सोडून दोन उमेदवार निवडून आणले. ‘कितने आदमी थे ? वो दो थे...और तुम आठ-आठ. फिरभी सभापती नही बना पाये.’ हा संवाद घुमू लागला. आता बोला...करमाळ्याच्या राजकारणात गब्बर कोण अन् ठाकूर कोण? हां...हां...हां...
गेल्यावेळचा वचपा काढण्यासाठी रश्मीताई मोठ्या चिद्दीनं पुढं सरसावल्यात. अवघा टापू पिंजून काढताहेत. जयवंतरावही कामाला लागलेत. आता सा-यांनाच उत्सुकता संजयमामांच्या भूमिकेची. बाजार समितीत ते कुणाला पाठिंबा देणार? हा पण शत्रू, तो पण शत्रू ? गोची.. प्रचंड गोची.
मामांच्या गटाची ही दोलायमान अवस्था पाहून तिकडं अकलूजकर मात्र मनातल्या मनात हसत असावेत. विजयदादाही म्हणत असावेत, ‘गेली कित्येक दशकं करमाळ्याचं राजकारण जिथं आम्हाला समजलं नाही. नीट हॅन्डल करता आलं नाही, तिथं तुम्ही तर लईच कोवळेऽऽ की हो..’
अक्कलकोट ते मुंबई
व्हाया कुंभारी
सोलापुरात ‘कमळ’वाल्यांची सत्ता असली तरी ‘हात’वाल्यांचं मस्त चाललंय.. कारण दोन देशमुखांच्या साठमारीत विरोधकांचं चांगलंच फावलंय. बापूंच्या माणसांना कुजविण्यासाठी मालकांचा गट ताकद लावतोय, तर मालकांची जिरविण्यासाठी बापूंचा गट कामाला लागतोय.
आता, कुंभारीचंच उदाहरण घ्या की.. तिथल्या सरपंचाला अक्कलकोटच्या सचिनदादांनी पार्टीत आणलं; पण याचा सर्वाधिक राग म्हणे ‘हात’वाल्यांपेक्षा मालकांनाच आला. तत्काळ सिद्धाराम अण्णांपर्यंत मेसेज गेला. अशातच फोडणीत तेल टाकायला दिलीप मालकही मोठ्या उत्साहानं तयार होतेच.
मग काय.. सरपंचावर अविश्वास ठराव आणला गेला. पाहता-पाहता मंजूरही झाला. त्यानंतर मार्केट यार्डातल्या केबिनमध्ये दोन्ही मालकांनी खुशीत टाळ्यावर टाळ्या दिल्या. सचिनदादांनी मात्र बापूंकडं केविलवाणं बघत कपाळावर ‘हात’ मारून घेतला. म्हणा की जोरात आता.. जय कमळ...