राजकारण्यांची कथा आणि व्यथा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 08:55 PM2019-09-18T20:55:19+5:302019-09-18T20:56:33+5:30
स्व.बाबूजींची शिकवण ‘लोकमत’ने आचरणात आणली आणि राजकीय क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींना समाजासमोर आणले
मिलिंद कुलकर्णी
‘लोकमत’ने खान्देशातील राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याद्वारे अमीट छाप उमटविणाऱ्या ३९ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची जीवनकहाणी, कर्तुत्वाची गाथा ‘कॉफीटेबल बुक’च्या माध्यमातून समाजासमोर आणली. जळगावात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते या ‘आयकॉन्स’ना गौरविण्यात आले.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा नेहमी म्हणायचे की, समाजात घडणा-या वाईट गोष्टींवर जरुर हल्ला चढवा. पण सर्वत्रच केवळ अमंगल आहे, सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार आहे, असे मानून नकारार्थी लिखाण करु नका, चांगल्या गोष्टी प्रकाशात आणा.
स्व.बाबूजींची शिकवण ‘लोकमत’ने आचरणात आणली आणि राजकीय क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींना समाजासमोर आणले. त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर देखील राजकीय जीवनात संघर्ष करीत पुढे आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, महापौर सीमा भोळे, नगराध्यक्षा साधना महाजन या प्रमुख अतिथींची राजकीय कारकिर्द विस्मयकारी जशी आहे, तशी या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कष्ट, मेहनत आणि संघर्ष केला आहे.
मंत्री जयकुमार रावळ यांनी आपल्या भाषणात राजकीय व्यक्तींची व्यथा बोलून दाखवली. चित्रपटसृष्टीने राजकीय मंडळींची चुकीची प्रतिमा निर्माण केली आहे. राजकीय व्यक्ती म्हणजे वाईट, असे सातत्याने दाखविल्याने समाजालादेखील असेच वाटू लागते. समाजासाठी कार्य करीत असताना त्याचे कुटुंबाकडे, प्रकृतीकडे दुर्लक्ष होते, या बाजूकडे समाज म्हणून आपण लक्षात देखील घेत नाही.
रावसाहेब दानवे यांनी सांगितलेला प्रसंग तर राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे मासलेवाईक उदाहरण म्हणावे लागेल. मुलाच्या २३ व्या वाढदिवसाला पहिल्यांदा उपस्थित राहिलेले वडील, असा उल्लेख जेव्हा खेड्यात आयोजित वाढदिवस कार्यक्रमात मुलाने करुन दिला, तेव्हा मी अंतर्मुख झालो. समाजकारण, राजकारण करताना मुलांचे वाढदिवस, ते कोणत्या वर्गात आहे, त्यांची प्रगती कशी आहे, हे काहीही आम्हाला माहित नसते. स्वत: आजारी असलो तरी बघायला येणारे लोक प्रकृतीची विचारपूस करतात आणि लगेच कामाचा कागद पुढे करतात.
अमरीशभाई पटेल यांनीही राजकारण्यांना सरसकट आरोपीच्या पिंजºयात उभे करणे चुकीचे असल्याचे सांगितले. कुुटुंब मुंबईत राहत असून महिन्यातील २० दिवस आम्ही मतदारसंघात असतो, सर्वसामान्यांसारखे कुटुंबासोबत राहता येत नाही, हेही नमूद केले.
अरुणभाई गुजराथी यांनी मोलाचा सल्ला राजकारणात नव्याने प्रवेश करु इच्छिणाºया मंडळींना दिला. राजकारणात तेजी-मंदी ही चालू राहणार आहे. त्याचा परिणाम होऊ देऊ नका. पद नव्हे पत महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा.
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी खासदारकीच्या १३ महिन्याचा आढावा घेताना जनतेसोबत राहणे अतीशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या अडीअडचणीला धावून गेले तर त्यांच्या हृदयात जागा निश्चित राहते.
‘आयकॉन्स’च्या प्रकाशन कार्यक्रमातील दिग्गजांची भाषणे ऐकल्यावर राजकारण्यांची कथा आणि व्यथा अधिक ठळकपणे समोर आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि मेगाभरती, पक्षांतराच्या वातावरणात अनुभवी राजकारण्यांनी केलेल्या मंथनामुळे निश्चित समाजापुढे नवनीत आले आहे.
एखाद्या घटकाविषयी समाजमन आणि समाजमत तयार करताना दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहिजे, हे यानिमित्ताने ठळकपणे समोर आले. प्रकाशात असते तीच बाजू आपल्याला दिसते आणि आपण तीच खरी मानून चालतो. परंतु, अंधारातील बाजू, दु:खे आपल्याला लक्षातदेखील येत नाही. आणि असे मत बनविल्यास त्या घटकावर अन्याय केल्यासारखे होते.