राजकारणी उठले प्राण्यांच्या जीवावर!
By अतुल कुलकर्णी | Published: April 9, 2018 01:24 AM2018-04-09T01:24:56+5:302018-04-09T01:24:56+5:30
साप, मुंगूस, लांडगे, कोल्हे, गांडूळ, उंदीर, कुत्रे, मांजर तमाम प्राण्यांना मनुष्यजातीचा प्रचंड राग यावा अशा घटना गेल्या आठवड्यात घडल्या.
साप, मुंगूस, लांडगे, कोल्हे, गांडूळ, उंदीर, कुत्रे, मांजर तमाम प्राण्यांना मनुष्यजातीचा प्रचंड राग यावा अशा घटना गेल्या आठवड्यात घडल्या. कुणी कुणाला गांडूळाची उपमा दिली तर कुणी कुणाला सापाची, लांडग्याची, कुत्र्यांची उपमा दिलीय. कुणी स्वकियांना उंदीर म्हणाले तर कुणी विरोधकांना मांजरांची उपमा दिली. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. विचारांची लढाई विचारांनी लढावी याचे बाळकडू ज्या भूमीने समस्त जगाला दिले त्याच मातीत स्वत:च्या स्वार्थासाठी नेते मंडळी मुक्या प्राण्यांना वापरू लागली आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या विरोधातील स्वस्वार्थासाठी सुरू झालेली लढाई पाहून विचारी माणूस जातीचा प्राणी मात्र अस्वस्थ झाला आहे. बिचाऱ्या प्राण्यांनी यांचे असे काय घोडे मारले होते... असेही म्हणायची सोय राहिलेली नाही कारण घोड्यांना अजूनतरी कुणी त्यांच्या राजकीय लढाईत ओढलेले नाही.
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका विकासाच्या मुद्यावर भाजपाने लढवल्या. विकास होणार, अच्छे दिन येणार, या आनंदाने भारून धर्म, पंथ, जात बाजूला सारून देशातील अठरापगड जातीच्या कोट्यवधी जनतेने देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार निवडून दिले. लोकसभेचा चार वर्षांचा आणि विधानसभेचा साडेतीन वर्षांचा काळ लोटून गेला. मात्र विकासावर मतं मागणारे हे सरकार आणि त्यातील नेते अचानक कुणाच्याही अध्यात मध्यात नसणाºया प्राण्यांवर घसरले. लांडगा धूर्त, साप डंख मारतो, किंवा कुत्रा चावतो या प्रथमदर्शनी गुणांकडे पाहून त्यांची उपमा मानवजातीच्या प्राण्यांना दिली गेली पण ती देणाºयांनी सोयीस्करपणे प्राण्यांच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्षच केले. अगदी विकास आणि अच्छे दिनाकडे केले तसेच.
आपल्याकडे सांगण्यासारखे काही नसले की माणसं चिडतात किंवा विषयाशी संबंध नसणाºया गोष्टी पुढे करतात, रागराग करतात, तापटपणे बोलतात, असा एक समज आहे. अर्थात हा समज कुत्री, मांजर, कोल्हे, साप, कोल्हे, गांडूळ यांना आपल्या भाषणात आणणाºयांना लागू होतोच असे नाही.
अच्छे दिन आले की नाही माहिती नाही पण लोकांची अच्छी करमणूक यानिमित्ताने सुरू झाली आहे. जी यापुढेही होत राहील. राष्टÑवादीने शिवसेनेला गांडूळाची उपमा देताच शिवसेनेनेसुद्धा स्वभावधर्माप्रमाणे हा विषय थेट औलादीपर्यंत नेला. यासाठी लोकांनी भाजपा शिवसेनेला निवडून दिले होते का? आधीचे सरकार वाईट होते, त्यांनी चुकीची कामं केली, त्यांनी जनतेला गृहीत धरणे सुरू केले. त्यामुळे वैतागलेल्या जनतेने भाजपवाले नवीन आहेत, ते चांगलं काहीतरी करतील, अच्छे दिन आणतील या विश्वासाने हाताची साथ सोडून कमळ हातात धरले होते.
आज राज्यात तीन वर्षानंतरदेखील भाजपाचे मंत्री तुम्ही असे केले होते, आम्ही तर फक्त एवढेच केले अशी तुलना रोज कोणत्या ना कोणत्या विषयात करू लागले आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीने जे केले त्याची शिक्षा त्यांना मिळाली. त्यांची सत्ता गेली, पण आता भाजपा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काय चांगले केले, कोणती विकासाची कामे केली हे सांगायला हवे, सांगण्यासारखे खूप काही असेल तर त्यावर भाषणांचा भर असायला हवा की निष्कारण कुत्री, मुंगूस, साप अशी प्राणी भाषणात आणावीत? विरोधक तर सरकार पाडण्याचे प्रयत्न करणारच, पण तुम्ही विकासाचे राजकारण करण्याचे सोडून गारुड्यांचा खेळ का करताय...? कदाचित भाजपावाले खासगीत आमचे काही खरे नाही म्हणतात, त्यातून तर हे असे होत नसावे?