मृत्यूनंतरचं राजकारण ! द अनटोल्ड स्टोरी.. 

By सचिन जवळकोटे | Published: May 23, 2021 09:37 AM2021-05-23T09:37:55+5:302021-05-23T09:38:33+5:30

लगाव बत्ती...

Politics after death! The Untold Story .. | मृत्यूनंतरचं राजकारण ! द अनटोल्ड स्टोरी.. 

मृत्यूनंतरचं राजकारण ! द अनटोल्ड स्टोरी.. 

Next

- सचिन जवळकोटे


एका कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतरचं राजकारण सोलापुरात जोरात रंगू लागलं, तेव्हा मात्र कॉमन पब्लिक चाट पडलं. हे प्रकरण एवढं पराकोटीला पोहोचलं की, रोज एक नवा ‘मॅटर’ समोर येऊ लागला. कार्यकर्ता गेल्याच्या दु:खापेक्षाही दबाव तंत्राची खेळी पाहून सोलापूरकर दचकू लागला. गर्दीच्या व्हिडिओ इतकाच आपापल्या नेत्यांच्या हेतूवर संशय घेणारा मेसेजही सर्वत्र जोरात व्हायरल झाला.


अधिकाऱ्यांचा ‘प्लॅन बी’ तयार..

सोलापूरचा ‘म्हेत्रे’ हा तसा स्चत:च्याच समाजात रमणारा साधा कार्यकर्ता. ‘जनवात्सल्य’ परिवाराच्या विश्वासातला, एवढीच राजकारणातली वेगळी ओळख. वर्षातल्या साऱ्या सार्वजनिक उत्सवांच्या वर्गण्या देण्यात ते नेहमीच आघाडीवर. त्यामुळं समाजातल्या नव्या पोरांमध्येही लाडके. मध्यंतरी ते ‘पॉझिटिव्ह’ निघाले, बरेही झाले; मात्र त्यांनी या आजाराचं भलतंच टेन्शन घेतलं. हाय खाल्ली. रंगभवनजवळच्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा भरती केलं गेलं; मात्र याच ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास सोडला.
-  हे कळताच परिसरातले कार्यकर्ते दवाखान्याबाहेर जमू लागले. एका कट्टर सहकाऱ्यानं दु:खावेगात काचेवर डोकं मारुन घेतलं. काच फुटली. डोकंही रक्तबंबाळ झालं. बाहेर गलका वाढू लागला. तेव्हा समाजातल्या काही मेंबरांनी कशीबशी गर्दी पांगवली. 
n दुसऱ्या दिवशी सकाळी घरासमोरून त्याची अंत्ययात्रा निघाली.यावेळी प्रचंड गर्दी जमली. ध्यानीमनी नसताना एवढा मोठा जमाव पाहून ‘खाकी’ही दचकली. सुरुवातीला साऱ्यांना हटविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला, परंतु तेव्हा काहीजण अंगावर गेले. हुल्लडबाजी झाली. शिट्ट्या वाजल्या. हुर्रेऽऽचा आवाज अख्ख्या वस्तीत घुमला. हा गोंधळ पाहून ही अंत्ययात्रा होती की मिरवणूक, हेच अनेकांना समजलं नाही. ‘खाकी’ गपगुमान बाजूला सरकली; मात्र अधिकाऱ्यांच्या डोक्यात दुसऱ्या दिवशीचा ‘प्लॅन बी’ परफेक्ट तयार होता. कायदा हातात घेणाऱ्यांना ‘खाकी हिसका’ दाखवायला ‘हतबल काठी’ आसुसलेली होती.

 
- अंत्ययात्रा संपली. जमाव पांगला. तोपर्यंत महामारीतल्या महागर्दीचे कैक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. अंधार पडल्यानंतर मग एकेकाला उचलायला सुरुवात झाली. केवळ जमावबंदीचा गुन्हा दाखल करून ठाणे अंमलदाराची डायरी थांबलीच नाही. कैक गंभीर कलमं लावताना थकलीच नाही. आता मात्र परिसरात हलकल्लोळ माजला. मेंबरांचे मोबाईल खणखणू लागले; परंतु खुद्द त्यांचीच नावं कलमांसोबत रंगू लागल्यानं तेही हादरले. विडी घरकुलातून ‘मास्तर’ही थेट पोलीस ठाण्यात आले.


-  दरम्यान पर्याय निघाला. व्हिडिओतल्या ‘त्या’ टवाळखोर तरुणांची ओळख पटवून देण्याची जबाबदारी काही मेंबरांवर टाकली गेली. त्यांनी नावं पुरवली तर ते या ‘मॅटर’मधून सुटतील, असंही ठरलं. मग काय.. बुडत्या माकडीणीनं डोक्यावरच्या पिल्लाला पायाखाली घेतलं. धडाधड नावं निष्पन्न झाली.  ‘मास्तरां’नी आपल्या ‘हणमंतू’ कॉम्रेडजवळ दहा हजारही दिले. ‘आत’मधल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी रक्कम तशी लय किरकोळ होती; पण ‘मास्तर’च आपल्या मदतीला आले हा मेसेज अख्ख्या समाजात फिरला.


या दोन दिवसात ‘ताई’ सोलापुरात नव्हत्या. खरंतर मोबाईलवरून संपर्क साधण्याचं त्यांचं काम चालू होतं; मात्र ज्यांना गेल्या दोन निवडणुकीत आपण फुल सपोर्ट दिला,तेच आता आपल्या संकटकाळात मदतीला नाहीत, असा मेसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. फेसबुकवर फिरलं. व्हॉट्‌सॲपचं स्टेटसही रंगलं. ‘हात’वाले अस्वस्थ झाले. वातावरणातलं गांभीर्य लक्षात येताच  ‘ताई’ तत्काळ सोलापुरात धडकल्या. ‘म्हेत्रें’चा तिसरा विधी सुरू असताना थेट स्मशानभूमीत ‘फॅमिली’ला जाऊन भेटल्या. त्यानंतर त्यांनी ‘सीपीं’शी संपर्क साधला. मात्र ‘कायदा मोडणाऱ्यांची गय नाही’ असं स्पष्टपणे सांगितलं गेलं.


ज्यांनी देशाचं सर्वोच्च ‘होम मिनिस्टर’पद भूषविलं, त्यांच्याच कन्येला सोलापूरचे ऑफिसर ऐकेनात, ही कार्यकर्त्यांसाठी चमत्कारिकच गोष्ट होती. मग थेट राज्याच्या ‘होम मिनिस्टरां’ना फोन केला गेला; मात्र तिकडूनही म्हणे सोलापुरात अधिकाऱ्यांना काही निरोप गेलाच नाही. उचलाउचली तर उलट जोरात सुरू झाली. अखेर ‘ताईं’च्या पीएनं अगोदर वकील दिला. या साऱ्यांच्या जामिनासाठी तयारी केली गेली.
‘महामारी’च्या बॅकग्राऊंडवर जामीनही मिळाला. मात्र आता उद्या सोमवारी या साऱ्यांना उतारा द्यायचाय. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री थकलेल्या शरीराला कसाबसा ‘उतारा’ घेणाऱ्या या मंडळींकडे कुठला आलाय सात-बारा ? अशावेळीही ‘मास्तरां’नी हळूच सांगून ठेवलंय, ‘ताईंनी दिले नाहीत तर माझ्याकडे या. माझ्या इस्टेटीचा मी मिळवून देतो उतारा.’
अशा गोष्टीत  ‘मास्तर’ लय माहीर. त्याला ‘हातवाले’ही आजपावेतो पुरून उरलेले. मात्र यंदाचा प्रसंग बाका. सत्ताधारी असूनही इथलं प्रशासन आपलं ऐकत नाही, हा धक्का ‘हात’वाल्यांसाठी जिव्हारी लागलेला. म्हणूनच ‘ताई’ आता थेट ‘सीएम’कडे निघाल्यात. ‘संतप्त’ ताई आता ‘अस्वस्थ’ बनल्यात; कारण प्रश्न केवळ एका मृत्यूचा नाही. प्रश्न केवळ आत अडकलेल्या कार्यकर्त्यांचा नाही. प्रश्न आता ‘आमदारकी’च्या ‘पॉवर’चा. इथले ऑफिसर राजकीय दबावापोटीही कारवाई करत असल्याचा आरोप खुद्द ‘ताईं’नी केलाय. एखाद्या आमदारानं थेट आयपीएस अधिकाऱ्यांच्या हेतूवर शंका घेण्याची महाराष्ट्रातली ही दुसरी वेळ. ‘परमबीरसिंग अन्‌ शुक्ला’ प्रकरण ताजंच. मात्र सोलापूरचे ‘शिंदे’ अन्‌ ‘कडूकर’ हे दोन्ही अधिकारी शुद्ध मराठी. त्यामुळं यांच्यात कुठल्या अँगलनं ‘सिंग’ अन्‌ ‘शुक्ला’ दिसले, याचाही शोध बिच्चारे सोलापूरकर घेताहेत. कदाचित ‘ताईं’चा रोख ‘भरणें’कडेही असू शकतो. आधीच ‘उजनी’च्या पाण्यात बुडत चाललेल्या ‘मामां’च्या डोक्यावर आता हे एक नवीन टोपलं. लगाव बत्ती..


बाई’ काय अन्‌ ‘ताई’ काय.. 

राहता राहिला विषय सोलापुरातील लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेचा. महापालिकेत आजपावेतो एकही चांगला अन्‌ खमक्या अधिकारी टिकू दिला गेला नाही, हा इतिहास. तहानलेल्या सोलापूरकरांसाठी पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर ‘अजितदादा’ महत्त्वाची मिटींग बोलावितात, तेव्हा तिथंही अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करण्यातच आपल्या ‘महापौरबाई’ अधिक रस दाखवितात. पूर्वभागातल्या मंगल कार्यालयात बेकायदेशीर जमलेल्या शेकडो वऱ्हाडींवर कारवाई करू नका, असा फोनही याच ‘महापौरबाई’ पोलिसांना करतात. यात सोलापूरकरांच्या भल्याचा विषय नसतो. कायद्याच्या ‘रिस्पेक्ट’चाही नसतो. असो. ‘बाई’ काय अन्‌ ‘ताई’ काय.. विषय इथल्या लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेचा असतो.

लगाव बत्ती..

Web Title: Politics after death! The Untold Story ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.