‘महाराष्ट्र भूषण’ मागचं राजकारण

By admin | Published: August 19, 2015 10:33 PM2015-08-19T22:33:41+5:302015-08-19T22:33:41+5:30

राजकीय मंडळी चतुर असतात आणि आपल्याला राजकारणाशी काही देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्या समाजातील भल्याभल्यांनाही ते आपल्या दावणीला सहज बांधून घेतात

The politics behind 'Maharashtra Bhushan' | ‘महाराष्ट्र भूषण’ मागचं राजकारण

‘महाराष्ट्र भूषण’ मागचं राजकारण

Next

प्रकाश बाळ (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
राजकीय मंडळी चतुर असतात आणि आपल्याला राजकारणाशी काही देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्या समाजातील भल्याभल्यांनाही ते आपल्या दावणीला सहज बांधून घेतात, तेही स्वत: अगदी नामानिराळे राहून आणि तत्वाचा मुद्दा समाज व्यवहारात निर्माण झाल्याचा आव आणत.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या निमित्तानं जे वादंग निर्माण झालं, ते राजकारण्यांच्या या चातुर्याचं ताजं बोलकं उदाहरण आहे, तसंच समाजातील बुद्धिवंतांच्या उथळपणाचं. शिवाजी हे महाराष्ट्राचं दैवत आणि आपल्या समाजात दैवतीकरणाची प्रबळ असलेली प्रवृत्ती, या दोन गोष्टींचा राजकारणी वापर करून घेत आहेत.
शिवाजीचा काळ मध्ययुगीन. आपलं राज्य प्रस्थापित करताना त्याचा लढा मोगल व इतर मुस्लिम राज्यकर्त्यांशी होणंही अपरिहार्य होतं. पण शिवाजीला स्वकीयांच्या विरोधातही तितकाच प्रखर संघर्ष करावा लागला. या शिवाजीच्या कारकिर्दीचं वर्णन जो तो आपापल्या मगदुराप्रमाणं करणार. पुरंदरे यांनी ते ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ हिंदू राजा असं केलं आणि मुस्लिम राज्यकर्त्यांना कंठस्नान घालताना शिवाजीनं दाखवलेल्या मर्दुमकीचं रंगतदार वर्णन केलं. हे वर्णन महाराष्ट्रानं अगदी गेल्या दोन तीन दशकांपर्यंत प्रमाण मानलं. म्हणूनच पुरंदरे यांच्या ‘शिवचरित्रा’ला केवळ हिंदुत्ववाद्यांनीच नाही, तर काँग्रेसी व पुरोगामी विचारधारेतील नेत्यांनीही उचलून धरलं.
शिवाजीच्या कार्यकाळाचं पर्यायी वर्णन पुढं येण्यास सुरूवात झाली, ती ऐंशीच्या दशकात. समाजजीवनात नव्यानं वर येऊ लागलेल्या मध्यम जातींना-बहुजनांना-त्यांच्यासाठीच्या प्रतिकांची गरज भासू लागल्यावर. शिवाजी हे महाराष्ट्राचं दैवत असल्यानं त्याच्याकडं ‘बहुजन’ दृष्टिकोनातून बघण्याची सुरूवात ही अशी झाली. खरं तर मध्ययुग हा इतिहासाची भरपूर साधनं असलेला काळ. त्यामुळं शिवाजीच्या कार्यकाळाचा वस्तुनिष्ठ इतिहास लिहावयाचा असल्यास साधनांची कमतरता पडता कामा नये. पण आज वाद घालणाऱ्या दोन्ही बाजूंच्या ‘इतिहासकारां’ना शिवाजीचं ‘मिथक’ तयार करण्यात जास्त रस होता व आहे; कारण त्या आधारे शिवाजीला ‘प्रतिक’ म्हणून वापरून घेणं सोपं व सोईचं होतं व आजही आहे. म्हणूनच १९७२ साली नरहर कुरूंदकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लेख लिहिताना ‘शिवाजीचं वस्तुनिष्ट चरित्र महाराष्ट्रात लिहिलं जाणं अशक्य आहे’, असं म्हटलं होतं.
वस्तुत: त्या त्या काळातील घटनांची व त्याच्या आजूबाजूंच्या तपशिलाची इतिहासकार आपल्या दृष्टिकोनाप्रमाणं संगती लावत असतो. एखाद दुसरा इतिहासकार त्याच्या दृष्टिकोनानुसार या घटनांची व त्या भोवतीच्या तपशीलाचं वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करू शकतो. या संदर्भात प्रख्यात इतिहासकार इरफान हबीब यांनी अलीकडंच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. हबीब म्हणतात की, ‘आर. सी. मुजूमदार हे जमातवादी दृष्टिकोनातून इतिहासाकडं बघत असत. पण ते इतिहासकार होते आणि ते ज्या काळाबद्दल लिहीत, त्या संदर्भातील घटना व तपशील यांचं ते आपल्या जमातवादी दृष्टिकोनातून विश्लेषण करीत. पण तो इतिहास होता. उलट आज हिंदुत्ववादी जे काही करू पाहत आहेत, ते इतिहासाचं पुनर्लेखन नाही, ते इतिहासाचं ‘कादंबरीकरण’ (फिक्शनलायझेन) आहे. म्हणूनच वेदकालीन ‘सरस्वती’चा शोध आजच्या हरयाणात घेतला जातो आणि त्याच्यासाठी भारत सरकारचं पुरातत्व खातं विशेष पुस्तिकाही काढतं’. याच मुलाखतीत हबीब यांनी, ताजमहाल व इतर ऐतिहासिक स्थानं ही मुळात हिंदूंची कशी होती, हे दाखवून देणारं विश्लेषण करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी मुजुमदार यांनी, ‘तोे इतिहास नसल्यानं’ कशी फेटाळून लावली होती, हेही सांगितलं आहे.
म्हणूनच पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र हा इतिहास नसून ती ‘कादंबरी’ आहे. जशी माधवराव पेशवे यांच्यावर रणजित देसाई यांनी ‘स्वामी’ ही कादंबरी लिहिली. पुरंदरे यांचं ‘जाणता राजा’ हे ‘नाटक’ नसून, ती खरी ‘ग्रेट पुरंदरे सर्कस’ आहे. दुसरीकडं शिवाजीच्या कार्यकाळाकडं ‘बहुजन’ दृष्टिकोनातून बघणाऱ्यांपैकी बहुतेकांनी इतिहास न लिहिता ‘कादंंबरी’ लिहिण्यावरच भर दिला आहे; कारण त्यांनाही खरा शिवाजी लोकांपुढं यायला नको आहे.
मग खरा शिवाजी कसा होता?
....तर तो काळाच्या पुढंं बघणारा राजा होता. त्या काळातील सरंजामी चौकटीच्या बाहेरची प्रशासकीय व महसुलाची पद्धत त्यानं बसवली. न्यायदानात निरपेक्षता आणली. युद्धासाठी व्यूहरचना व रणनीती आवश्यक असल्याची त्याला जाण होती. म्हणून शिवाजी मोठा होता. मात्र शिवाजी हा मध्ययुगीन राजा होता. त्या काळाच्या संदर्भातील ज्या काही बऱ्या-वाईट चालीरिती होत्या, त्या एक राजा असलेल्या शिवाजीच्या व्यक्तिमत्वातही असणं अपेक्षीतच आहे. पण हे स्वीकारायची आपली तयारी नाही; कारण आपण शिवाजीचं दैवत बनवलं आहे. आणि समाजातील दैवतीकरणाच्या प्रवृत्तीचा राजकारणातील उद्दिष्टांसाठी वापर करण्याच्या परंपरेनुसार हिंदुत्ववादी त्यांच्या मुस्लिम विरोधी भूमिकेसाठी शिवाजीला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ व मुस्लिमांचा कर्दनकाळ बनवत आहेत आणि दुसरीकडं ऐंशीच्या दशकात नवब्राह्मणेतर विचारांची मांंडणी करून बहुजन राजकारणाला गती आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी शिवाजीला वापरण्याचा चंग बांधला आहे.
शरद पवार यांच्या राजकारणातील ऐंशीच्या दशकापासूनचे चढउतार आणि या नवब्राह्मणेतर विचारांचा प्रसार यांचा एकत्रित लेखाजोखा घेतल्यास, ‘मराठा एकत्रीकरणा’साठी त्याचा कसा उपयोग करून घेतला जात होता व आहे, हेही दिसून येईल.
अर्थातच आजच्या काळात खरोखरच शिवाजी असता, तर त्याच्यासारख्या न्यायनिष्ठुर राजानं, हा वाद खेळणाऱ्या दोन्ही बाजूंच्या किती लोकांना रयतेचा छळ केला म्हणून टकमक टोकांवरून ढकलण्याची शिक्षा दिली असती, याचाही लेखाजोखा घेणं मनोरंजक ठरेल. फक्त तो इतिहास असणार नाही, ती कादंबरी असेल. या वादात पडलेल्या दोन्ही बाजूंच्या बहुतांश बुद्धिवंतांना हे राजकारण ‘कळत’ नाही आणि उरलेल्याना ते ‘कळूनही वळत’ नाही.
साहजिकच हा वाद रंगवत ठेवून आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य करून घेण्याची संधी राजकारण्यांना मिळत आहे.

Web Title: The politics behind 'Maharashtra Bhushan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.