राजकारण बदलू लागले आहे...

By admin | Published: October 21, 2014 02:39 AM2014-10-21T02:39:24+5:302014-10-21T02:39:24+5:30

विकासाची परिभाषा करताना धर्म आणि जातीचे राजकारण करता येणार नाही. दोन राज्यांच्या निवडणुका परवा झाल्या.

Politics is changing ... | राजकारण बदलू लागले आहे...

राजकारण बदलू लागले आहे...

Next

पुण्यप्रसून वाजपेयी (टिव्ही पत्रकार) - 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीचे राजकारण करीत आहेत, ते पाहता केंद्रातले राजकारण असो, की प्रादेशिक पक्षाची अस्मिता असो, दोघांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. पारंपरिक राजकारण आता कालबाह्य झाले आहे. दोघांनाही बदलावे लागेल. जुनी मानसिकता टाकून द्यावी लागेल. गेल्या वर्षाचे राजकारण वेगळ्या धाटणीचे राहिले. पराभवानंतरही राजकारणाचे डावपेच बदलत नव्हते. नेहमीच कुणी जिंकू शकत नाही. जय-पराजय चालणारच, असा विचार पूर्वी होत असे. कधी काँग्रेस, तर कधी भाजपा, तर कधी आणखी कुणी. पण देशाची सत्ता स्वबळावर जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींनी राजकारणाचा चेहराच बदलून टाकला आहे. गाव, शेतकरी, कामगारांपासून कॉर्पोरेट क्षेत्र आणि उद्योगघराण्यांपर्यंत सर्वांना त्यांनी ‘मेक इन इंडिया’ने जोडण्याची भाषा केली. तिकडे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकांत सभांवर सभा करून बदलत्या राजकारणाचे संकेत दिले. पूर्वी देशाचा पंतप्रधान राज्याच्या निवडणुकीत एवढा रस घेत नव्हता. मोदींनी प्रचंड रस घेतला. स्वत:ची निवडणूक आहे, असे मानून फिरले. सत्तेच्या गुर्मीत राहून चालणार नाही. तुम्हाला लोकांच्या संपर्कात राहावे लागेल, हा या बदलत्या राजकारणाचा संदेश आहे.
देशाची धोरणं जाहीर करायची, सरकारने केलेली कामे सांगायची, हा मंत्र आता चालणार नाही. धोरणे ठरवताना लोकांना विश्वासात घ्यावे लागेल. विकासाची परिभाषा करताना धर्म आणि जातीचे राजकारण करता येणार नाही. दोन राज्यांच्या निवडणुका परवा झाल्या. काय दिसले, या निवडणुकीत? मतदार पुढाऱ्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, तर दुसरीकडे मोदी मतदारांशी थेट संवाद साधू पाहात आहेत. काँग्रेसची अडचण वेगळी आहे. धर्मनिरपेक्षतेचे कार्ड काँग्रेस आता खेळू शकत नाही. प्रादेशिक पक्ष आता जातीय समीकरणांच्या जोरावर व्होट बँक बनवू शकत नाहीत. केवळ आघाडी करून सत्ता मिळू शकत नाही. देशाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती समजून घेऊन राजकारण केले तरच सत्ता मिळू शकते, असे दिवस आता आले आहेत. मोदी यांचे भाषण काळजीपूर्वक ऐका. त्यांनी आपल्या भाषणात मंडल-कमंडलचे राजकारण बदलणाऱ्या आर्थिक सुधारणांनाच टार्गेट केले आहे. २० वर्षांच्या राजकारणानंतर सरकारने केलेले घोटाळे आणि भ्रष्टाचार यांनाच सर्वात जास्त महत्त्व आले. मोदींनी लोकांच्या मनातला आक्रोश बरोबर पकडला. मोदींबद्दल लोकांना विश्वास वाटू लागला. राजकारणाचे डावपेच इथपासूनच बदलणे सुरू झाले. काँग्रेसच नव्हे; तर शरद पवार असोत, की चौटाला, उद्धव ठाकरे असोत, की उत्तर प्रदेश-बिहारचा नेता. दोन पिढ्या बदलल्या. पण, यांच्या राजकारणात काहीही बदल झाला नाही. नव्या पिढीच्या मतदारांना जोडण्यात मोदींना यश येत आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.
शरदरावांची वारस सुप्रिया सुळे असोत, की अजित पवार यांना बदलावे लागेल. हरियाणात तिसऱ्या पिढीचे अभय आणि अजय चौटाला आणि चौथ्या पिढीचे दुष्यंत आणि दिग्विजय चौटाला यांनाही राजकारणाची पद्धत बदलावी लागेल. घराण्याचे महात्म्य त्यांच्या कामी येणार नाही. पवार आणि देवीलाल दोघांनीही ६०च्या दशकात राजकारणाला सुरुवात केली, त्यानंतर मतदारांच्या तीन पिढ्या आल्या. मतदार बदलले, पण राजकारण करायचा खाक्या बदलला नाही. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातून राजकारणाला सुरुवात केली. उसाच्या शेतीसाठी हा भाग ओळखला जातो. पवारांच्या या बालेकिल्ल्यात यंदा पहिल्यांदा पवारांचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. याचे कारण असे, की, केंद्रात कृषिमंत्री असतानाही गेल्या पाच वर्षांत पवारांनी या भागात ढुंकूनही पाहिले नाही. उसाच्या भावाचा प्रश्न असो, की उसासाठी पाण्याची आवश्यकता असो किंवा विजेची टंचाई असो, पवारांनी पाच वर्षांत कोणाकडे विचारपूस केली नाही. आपली राजकीय उंची किती मोठी आहे, हे महाराष्ट्राला दाखवण्यातच पवारांनी स्वत:ला धन्य मानले. मोदींनी या वेळी पवारांच्या या नाजूक नसेवर प्रहार केला. थेट बारामतीत जाऊन पवारांच्या सौदेबाजीच्या राजकारणावर घणाघाती प्रहार केले. याच शैलीने मोदींनी हरियाणात चौटालांनाही वाटेला लावले. जाट आणि अहिर समाजाची तिथे दादागिरी राहायची. खाप, पंचायत आणि जातीय समीकरणांच्या आधारे आता हरियाणाचे राजकारण चालणार नाही, असा बंदोबस्त मोदींनी केला आहे. या दोन्ही राज्यांत सर्व राजकीय पक्षांच्या लेखी मोदी खलनायक आहेत. पण, मतदारांच्या नजरेत नायक आहेत. पवार आणि चौटाला यांच्या राजकारणाला लोक कंटाळले होते. मोदींच्या रूपाने लोकांना माध्यम मिळाले.
सत्तेत येऊन मोदींना आता अवघे १४० दिवस झाले आहेत. या काळात मोदींनी घोषणांचा सपाटा लावला आहे. काळा पैसा, गंगा नदीचे शुद्धीकरण, न्यायाधीशांच्या नियुक्त्या, जनधन योजना, ई-गव्हर्नन्स, स्कील इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आदर्श गाव, स्वच्छ भारत आणि श्रमेव जयते... समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. सारी व्यवस्थाच सडली आहे. मोदी तिला सुधारू पाहात आहेत. त्यानिमित्ताने राजकारणही साधत आहेत. मोदींच्या प्रत्येक घोषणेचा तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करा. काँग्रेस सरकारच्या नाकर्तेपणावर त्यांनी आपल्या घोषणेतून प्रकाश टाकला. अर्थात या घोषणांमध्ये किती दम आहे, हा एक प्रश्नच आहे. कामगारांसाठी मोदींनी ‘श्रमेव जयते’चा नारा दिला तेव्हा प्रत्येकाला आश्चर्य वाटले. संघ परिवारातल्या भारतीय मजदूर संघाने यावर नेमका प्रश्न उपस्थित केला...कामगारांशिवाय श्रमेव जयतेला काय अर्थ आहे. पण, मोदी घोषणांवर घोषणा करीत सुटले आहेत. त्यांच्या अंमलबजावाणीचे काय? ज्या संघाने मोदींना घोड्यावर बसवले तो संघ मोदींना विरोधही करतो आहे. मोदींना आव्हान देणाराच कुणी नाही.

Web Title: Politics is changing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.