हे राजकारण देशविघातकच !
By admin | Published: April 1, 2016 04:12 AM2016-04-01T04:12:23+5:302016-04-01T04:12:23+5:30
पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा, ही गोष्ट बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते. भारत-पाक संबंधांंवरून देशात सतत जे वाद उद्भवत असतात, त्याना हे वर्णन चपखलपणे
पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा, ही गोष्ट बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते. भारत-पाक संबंधांंवरून देशात सतत जे वाद उद्भवत असतात, त्याना हे वर्णन चपखलपणे लागू पडते. त्यामुळेच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकच्या संयुक्त पथकाला भारतात येण्यास परवानगी देण्यात आल्याने जो वाद खेळला जात आहे, तो या उक्तीला धरूनच आहे. संयुक्त तपास पथक भारतात पाठवण्याची परवानगी पाकने मागितली आणि ती देण्यात आली; कारण त्या देशाला दहशतवादाच्या विरोधी कारवाई न करण्यासाठी कोणतेही कारण मिळू नये, अशी आमची भूमिका असल्याचा खुलासा सरकारी गोटातून करण्यात आला. इतकी सवलत देऊनही पाकने काहीही केले नाही, तर मग आपण त्या देशाला सरळ दोषी धरू शकू, असा मोदी सरकारचा पवित्रा आहे. उलट पाकमधून आलेल्या या पथकात ‘आयएसआय’चे दोघे अधिकारी आहेत आणि पाकची हीच लष्करी गुप्तहेर संघटना भारतात दहशतवादी पाठवत असते, तेव्हा त्यांनाच तपास करू देणे म्हणजे ‘चोरानेच स्वत: केलेल्या गुन्ह्याचा तपास’ करण्याचा हा प्रकार हास्यास्पद असल्याचा आरोप या सरकारी धोरणाला विरोध करणाऱ्यांनी केला आहे. म्हणूनच पाककडे बघण्याची नजर कोणती, हा मुद्दा महत्वाचा आहे आणि दुर्देवाने देशहिताच्या चष्म्यातून त्याकडे न बघता सत्तेच्या साठमारीतील पक्षीय हिताचा चष्मा लावूनच बघण्याचा प्रघात देशात पडला आहे. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २००९ साली इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथे पाकचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ‘बलुचिस्तानातील दहशतवादी कारवायासंबंधीची पाकची चिंता भारत लक्षात घेत आहे’, असा उल्लेख होता. त्यावरून भारतात केवढा गदारोळ माजला होता? भाजपाने टिकेचा किती व कसा भडीमार केला होता? आज तीच भाजपा सत्तेवर असताना, बलुचिस्तानात ‘रॉ’ या भारतीय गुप्तहेर संघटनेचा हेर पकडण्यात आल्याचे पाकने जाहीर केले आहे. साहजिकच अशा वेळी ‘आयएसआय’चे अधिकारी असलेले पाकचे तपास पथक भारतात कसे काय येऊ देता, असा सवाल काँगे्रस विचारीत आहे. काँग्रेसच्या जोडीला आता ‘आप’ हा दिल्लीत सत्ताधारी असलेला पक्षही उतरला आहे. अर्थात पंजाबात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे ‘आप’ने या वादात उडी घेतल्याचे लक्षात ठेवायची गरज आहे. पंजाबातील सत्ताधारी अकाली दल-भाजपा आघाडीला राजकीय घरघर लागली आहे. त्यामुळे पंजाबातीलच पठाणकोट येथील हल्ल्याबाबतच हे सगळे घडत असल्याने काँग्रेस व ‘आप’ या दोन्ही पक्षांना जोर चढला असला, तर ते सध्याच्या काळात स्वाभाविक मानल्या जाऊ लागलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला साजेसेच आहे. वास्तविक पाहाता असा राजकीय वाद खेळण्यापेक्षा पाकचे पथक भारतात येऊन गेल्यानंतर पठाणकोट हल्ल्याचा खरा सूत्रधार मसूद अझर पकडला जाईल का, हाच खरा चर्चेचा मुद्दा असायला हवा आणि या मुद्याचे उत्तर हे जवळपास तशी शक्यता नाही, असेच देणे भाग आहे. याचे कारण म्हणजे पाक लष्कराची गेल्या ६० वर्षांतील भारतविरोधी भूमिका आणि पाकमध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असले, तरी त्यात काडीइतकाही बदल होऊ न देण्याचा लष्कराचा आग्रह. भारतात तपास पथक पाठवत असतानाच पाक लष्कराने भारतीय ‘हेरा’ला पकडणे आणि नवाझ शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील प्रसिद्धी खात्याच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या ‘हेरा’ने दिलेल्या कबुलीजबाबाची चित्रफीत प्रदर्शित करणे, याचा अर्थ नवाझ शरीफ सरकारला हे करण्यास लष्कर भाग पाडत आहे, असाच लावला जायला हवा. पाकमधील सत्तेच्या समीकरणाचे हे वास्तव लक्षात न घेता एकीकडे भाबडेपणाने आणि दुसऱ्या बाजूला सत्तेच्या राजकारणातील प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचे हत्त्यार म्हणून पाकशी असलेल्या संबंधाकडे आपण पाहत राहू, तोपर्यंत असे वाद खेळले जातच राहणार आहेत. म्हणून मग संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे पाकचे अध्यक्ष असीफ अली झरदारी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट द्यायला आले आणि त्यांच्यासाठी सरकारने मेजवानी आयोजित केली, तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता की, ‘ सीमेवर जवानांचा शिरच्छेद केला जात असताना, भारत सरकार पाकच्या नेत्यांना बिर्याणी खिलवत आहे’. आजही मोदी सरकारातील मंत्री व भाजपा नेते ‘...जर पसंत नसेल, तर पाकला जा’, असे उघडपणे म्हणत असतात. सत्तेचे हे राजकारण देशविघातकच आहे. त्याचा फायदा पाकलाच अंतिमत: होत असतो, हे आतापर्यंत प्रत्येक वेळी सिद्ध झाले आहे. तेव्हा खरोखरच देशहित जपायचे असेल, तर हा सत्तेच्या राजकारणाचा खेळ ताबडतोब थांबवला जाणे गरजेचे आहे.