राजकारण कलंकित करणारी निवडणूक!
By विजय दर्डा | Published: May 13, 2019 01:44 AM2019-05-13T01:44:04+5:302019-05-13T01:45:44+5:30
सत्तेच्या लढाईत परस्परांवर असे काही विखारी शब्दांचे वाग्बाण सोडले जात आहेत की, जणू शत्रूच लढाईच्या मैदानात उतरले आहेत!
दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाइश
रहे/ जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों!
सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा हा शेर सध्याच्या निवडणुकीस चपखलपणे लागू होतो. सत्तेच्या लढाईत परस्परांवर असे काही विखारी शब्दांचे वाग्बाण सोडले जात आहेत की, जणू शत्रूच लढाईच्या मैदानात उतरले आहेत! कौरव-पांडवांचे युद्ध सुरू असल्यासारखे वाटत आहे.
अशी निवडणूक मी लहानपणापासून कधीच पाहिली नाही, असे मला अत्यंत खेदाने व नाईलाजाने म्हणावे लागत आहे. पंडित नेहरूंच्या काळापासूनच्या सर्व निवडणुका मला आठवतात. १८ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत राजकारणातील अनेक चढ-उतार पाहिले, निवडणुकांचेही बारकाईने निरीक्षण केले, सत्तांतरे पाहिली व पंतप्रधानांचे पदावर येणे, सत्तेतून जाणेही पाहिले. या देशातील मतदारांची ताकदही मी पाहिली. मातब्बर दिग्गज नेत्यांना मतदारांनी चितपट केल्याचे पाहिले. तरीही आजवर मला लोकशाहीचा विजय होताना दिसला, समाज जिंकताना दिसला. आताच्या निवडणुकीने भारतीय राजकारणाला जेवढे कलंकित केले व समाजात कटुता घोळविली, तेवढी यापूर्वी मी कधीही पाहिली नव्हती!
माझे बाबुजी, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज होते. त्यामुळे मी बालपणापासून राजकारण जवळून पाहात आलो. नंतर संसदीय राजकारणात सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळाली. या सर्व टप्प्यांवर मला नेहमी राजकारणाचे पावित्र्य पाहायला मिळाले. मला चांगले आठवते की, १९६२ मध्ये लोकनायक बापूजी अणे नागविदर्भ आंदोलन समितीच्या पाठिंब्याने नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवीत होते. काँग्रेसचे उमेदवार होते रिखबचंद शर्मा. त्यांच्या प्रचारासाठी पं. जवाहरलाल नेहरू नागपूरला आले. सभेत त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करतानाच अणेसाहेबांचीही तोंडभरून स्तुती केली. अणेजी मलाही आदरणीय असल्याचे पंडित नेहरू म्हणाले. त्यावेळी निवडणुकीत असे पावित्र्य होते. नाती आणि व्यक्तिमत्त्वाचा आदर व मान राखला जायचा.
भारतीय लोकशाहीला मजबूत व पवित्र ठेवण्याचे श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंना जाते. त्या काळात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र काँग्रेसचाच बोलबाला होता. बलाढ्य विरोधक नावालाही नव्हते. तरीही विरोधी पक्ष अत्यंत गरजेचे आहेत. ते नसतील तर लोकशाहीला अर्थच उरणार नाही, असे नेहरूजींचे म्हणणे असायचे. विरोधी पक्षांचे सर्व मोठे नेते संसदेत येतील, अशी ते व्यवस्था करायचे. नेहरूंवर तिखट टीका करणारे हे नेते असायचे. मला आठवते की, हेम बारुआ नावाचे संसद सदस्य होते. त्यांनी एकदा नेहरूजींबद्दल अपशब्द वापरले होते. नेहरूजींच्या निधनानंतर एका ख्यातनाम संपादकांनी या बारुआंना विचारले की, तुम्ही पंडितजींच्या पार्थिवाला त्रिवार प्रणाम का केलात? त्यावर बारुआ यांनी सांगितले होते : पहिला प्रणाम देशाच्या महान स्वातंत्र्यसेनानीला, दुसरा लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा असलेल्या पंतप्रधानांना आणि तिसरा विशाल हृदयी माणसाला होता. मी नेहरूजींबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आठवडाभराने त्यांनी मला बोलावून कॉफी पाजली व म्हणाले, तुमचे भाषण खूपच तिखट होते, तेवढेच काव्यात्मकही होते! तेव्हा मी नेहरूंची माफीही मागितली नव्हती! हे हेम बारुआ आसामी भाषेतील उत्तम कवीही होते.
या संदर्भात अटलजींचा किस्सा आठवतो. ते पंतप्रधान म्हणून सत्तेवर आले. अचानक त्यांना संसदेच्या कॉरिडॉरमधील नेहरूजींचे पोट्रेट गायब झालेले दिसले. अटलजींना खूप वाईट वाटले. त्यांनी बोलून दाखविले की, लोकशाहीत सरकारे येतील व जातीलही, पण लोकशाही जिवंत राहायला हवी. आजवर जेवढे पंतप्रधान होऊन गेले, त्यांच्यामुळेच देश आहे तसा आहे. तरुण वयापासून जी तसबीर मी पाहात आलो, ती तेथे नसल्याचे पाहून माझ्या मनाला खूप यातना झाल्या. त्याच दिवशी सायंकाळपर्यंत नेहरूंचे पोट्रेट होते त्या जागेवर पुन्हा लावले गेले!
राजकीय पावित्र्य व विरोधकांचाही सन्मान करण्याच्या संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारख्याला आज देशातील वातावरण गलिच्छ झाल्याचे जाणवते. समाजात फूट पडल्याचे मी पाहतो. तुम्ही आमचे समर्थक असाल, तरच खरे देशप्रेमी आहात, अन्यथा तुमचे देशप्रेम शंकास्पद आहे, असा संदेश दिला जात असल्याचे दिसते. नेत्यांच्या जिभेवर संयमच राहिलेला नाही. या जगात नसलेल्या नेत्यालाही पद्धतशीर बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. धर्माच्या आधारे समाजाचे कप्पेबंद भाग पाडले जात आहेत. देशाच्या बहाद्दर सैनिकांच्या शौर्याचेही श्रेय लाटले जात आहे. यावर निवडणूक आयोगाने अंकुश ठेवायला हवा, पण आयोगाने खूपच निराश केले. आयोग गप्प बसल्यानेच सर्वांनाच मोकळे रान मिळाले आहे.
या निवडणुकीने समाजाचे तर तुकडे केलेच आहेत, पण राजकारणही मुळापासून हादरून टाकले आहे. राजकारणात मतभेद स्वाभाविक आहेत. ते असायलाही हवेत, पण मनभेद होता कामा नयेत. ज्याने समाज दुभंगेल, अशी कटुता राजकारणात असू नये. पुढील दोन आठवड्यांत निवडणुका संपतील, पण या विखारी प्रचाराने समाजमनावर जे घाव पडले आहेत, ते भरून निघायला न जाणो पुढचा किती काळ जायला लागेल!