येथेही राजकारणच
By Admin | Published: February 15, 2016 03:33 AM2016-02-15T03:33:39+5:302016-02-15T03:33:39+5:30
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) ही संस्था प्रथमपासूनच डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या प्रभावाखाली असल्याचे सर्वज्ञात असले
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) ही संस्था प्रथमपासूनच डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या प्रभावाखाली असल्याचे सर्वज्ञात असले, तरी ही संस्था आता देशद्रोह्यांच्याही प्रभावाखाली आली आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला असून, दुर्दैवाने हा गंभीर विषयदेखील राजकारणाने व्यापून टाकला आहे. गेल्या मंगळवारपासून तेथील खदखदणे सुरू झाले. डाव्यांच्या प्रभावाखालील विद्यार्थी संघटनेने त्या दिवशी तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमात अफझल गुरू यांस गुप्तपणे ठोठावण्यात आलेल्या फाशीचा निषेध केला जाणार होता. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या संचालकांनी अनुमती नाकारल्यानंतर आयोजक विद्यार्थी बेमुदत उपोषणास बसले. या उपोषणकर्त्यांचा विरोध करण्यासाठी अभाविप ही उजव्या विचाराची विद्यार्थी संघटना मैदानात उतरली. दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये समेट घडवून आणण्याचा संचालकांचा प्रयत्न सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी एका चर्चासत्राच्या वेळी अफझल गुरू याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली. रालोआच्या याआधीच्या सत्ताकाळात संसदेवर जो अतिरेकी हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून अफझल गुरूला देहदंडाची शिक्षा सुनावली गेली होती आणि तिची अंमलबजावणी संपुआच्या काळात झाली होती. विद्यापीठाच्या आवारात झालेल्या या प्रकाराची चौकशी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली पण दुसऱ्या दिवशी, गुरुवारी, भाजपाचे खासदार महेश गिरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला आणि शुक्रवारी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यालाही अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवला. त्यानंतर आणि दरम्यानच्या काळात भारताविरुद्ध काही घोषणा दिल्या गेल्या व काश्मीर तसेच केरळ या राज्यांना भारतापासून अलग करण्याच्या घोषणांचाही म्हणे त्यात समावेश होता. तशातच एक ट्विट उजेडात आले, ज्यात पाकिस्तानी बांधवांनी जेएनयूमधील पाकिस्तानप्रेमी विद्यार्थ्यांच्या मदतीस यावे असे आवाहन केले गेले होते. या संपूर्ण प्रकाराची चौकशी होईल तेव्हा नेमके काय झाले याचा उलगडा होईलच. पण देशद्रोही म्हणून अफझल गुरू किंवा याकूब मेमन यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्यांना झालेल्या फाशीचा निषेध करणे जर देशद्रोहच ठरत नसेल तर देशद्रोह आणि देशप्रेम यांच्या व्याख्याच नव्याने कराव्या लागतील. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल होताच काश्मिरातील फुटीरतावादी जहाल नेते सैयद अली शाह गिलानी (तब्येत अत्यंत खस्ता असतानाही) यांनी एक पत्रक जारी केले आणि गुरूच्या फाशीच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई केली गेली तर त्याची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण काश्मीर खोऱ्यात उमटेल अशी चक्क धमकीच देऊन टाकली. गिलानी यांची पार्श्वभूमी लक्षात घेता जेएनयूमधील कथित क्रांतिकारी डाव्यांना देशप्रेमीच वाटत असतील तर सारी चर्चा येथेच खुंटते.