वैफल्याचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 03:42 AM2016-03-23T03:42:45+5:302016-03-23T03:42:45+5:30
शिंगणापूरच्या शनी मंदिरात चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची परवानगी मिळावी, या महिलांच्या मागणीवर उभ्या महाराष्ट्रात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून गदारोळ उठला आहे
शिंगणापूरच्या शनी मंदिरात चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची परवानगी मिळावी, या महिलांच्या मागणीवर उभ्या महाराष्ट्रात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून गदारोळ उठला आहे. मागणी कोणाची हा प्रश्न अलहिदा. ती बरोबर की चूक ते विविध धर्ममार्तंडांनी धर्मशास्त्रांचा आधार घेत पुराणातील दाखले देत कथन केले. शनी मंदिराच्या विश्वस्तांनी महिलांना परवानगी देणार नाही, अशी भूमिका घेत स्त्री-दाक्षिण्य दाखवत अध्यक्षपदी महिलेला विराजमान करून पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी, समानतेचा आदर्श ठेवणारी भूमिका घेत नवा पायंडा पाडला. इकडे या घडामोडी चालू असताना यासाठी आग्रही असलेल्या महिलांना शिंगणापुरात येण्यापासून रोखले. येथे प्रशासनाला बळाचा वापर करावा लागला. या शनी दर्शनाचा सोशल मीडियावर एवढा कहर झाला की, शनी देवालाच महिलांची साडेसाती सुरू झाली असे विनोद पसरायला लागले. लोकांना चघळायला नवे विषय मिळाल्याने हा विषय बाजूला पडल्यासारखा दिसतो.
शनी मंदिराच्या दर्शनाच्या वादाची आठवण होण्याचे कारण हिंगोलीतील घटना. गेल्या आठवड्यात हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांसोबत हातणीचे काम करणाऱ्या महिलांना कामावरून बंद करण्यात आले. या महिला मजुरी करणाऱ्या, कायद्याचे कोणतेही संरक्षण नसणाऱ्या. हातणी म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाची साफसफाई करताना त्या धान्य चोरतात असा त्यांच्यावर आरोप आहे. उभी हयात याच कामात घातलेल्या या महिलांना आता काम नाही आणि त्यांचे पोट या कामावरच अवलंबून आहे.
हातणीचे काम हे हमालाचा सहायक म्हणून करावे लागते. हमालांनी ढीग घालून ठेवलेल्या धान्यातील कचरा, खडा-गोटा काढून ते स्वच्छ करण्याचे काम महिला करतात. या हातणीसाठी हमालाला क्विंटलमागे चार रुपये मिळतात. या चार रुपयातून हमाल या महिलांना मजुरी देतात. या महिला शेतकऱ्याकडे धान्य मागतात असाही आरोप आहे. या फक्त धान्य स्वच्छ करण्याचे काम करीत नाहीत, तर व्यापाऱ्यांचे दुकान स्वच्छ करणे, दुकानदार सांगेल ती कामे म्हणजे चहा सांगणे, धान्याची मोकाट गुरांपासून राखण करणे, अशी सांगकामी कामे करावी लागतात आणि त्याचा मोबदला मिळत नाही. शेतकऱ्याच्या मालातून लिलावापूर्वी याचा मोबदला दिला जातो. तोही किलो/दोन किलो धान्य. म्हणजे सर्वात जास्त काम करून सर्वात कमी मोबदला मिळणारा हा मोंढ्यातील घटक आहे. तरी बाजार समितीने यांना परवाना दिलेला नाही. खरे तर तो द्यायला पाहिजे.
हा प्रश्न दुर्लक्षित; पण तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण जे कारण देऊन यांना कामावरून कमी केले ते हास्यास्पद म्हणावे लागेल. बाजार समित्या या तर राज्यभर राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. राजकारण खेळण्यासाठी जेवढे काही करावे लागते ते येथे केले जाते. यांच्या कामातील अनियमितता, भ्रष्टाचार यावर किती बोलावे. त्यांच्या तुलनेत महिलांवर होणारा आरोप म्हणजे शेतकऱ्यांना धान्य मागतात. तो त्या आणि शेतकरी यांच्या आपसातील देण्याघेण्याचा प्रकार असताना बाजार समितीने कारवाई करणे कितपत योग्य? पुरोगामी महाराष्ट्रात महिलांच्या प्रश्नावर एकत्र येऊन दाद मागणाऱ्या संघटनांना या कष्टकरी महिलांच्या व्यथा कळू नयेत? हमाल मापाडी संघटनासुद्धा अजून गप्प का, याचेही कोडे उलगडत नाही. याचाच अर्थ कोणता प्रश्न गाजवायचा याचाही अजेंडा ठरतो का, अशी शंका निर्माण होते. म्हणूनच प्रारंभी शनी दर्शनाचा दाखला द्यावा लागला. या महिला असंघटित कामगार असल्याने कोणीच त्यांचा वाली नाही का? कारण प्रशासनानेदेखील अजून पाऊल उचलले नाही. शनीची साडेसातीही साडेसात वर्षांची असते असे म्हणतात; पण अशा असंघटित महिला कामगारांच्या नशिबी जन्मभराची साडेसाती लागली आहे ती कोण सोडविणार?
- सुधीर महाजन