राजकारण्यांना विनोदाचे का वावडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 03:45 AM2017-11-01T03:45:45+5:302017-11-01T03:46:05+5:30
सार्वजनिक क्षेत्रात वावरणा-यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. किंबहुना अनेकदा राजकीय नेते खेळीमेळीत ते स्वीकारतातही. हास्य-विनोद हे राजकारण निकोप बनवीत असते आणि राजकारण्यांना अजातशत्रू.
सार्वजनिक क्षेत्रात वावरणा-यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. किंबहुना अनेकदा राजकीय नेते खेळीमेळीत ते स्वीकारतातही. हास्य-विनोद हे राजकारण निकोप बनवीत असते आणि राजकारण्यांना अजातशत्रू. पण राजकारणातील विनोदच संपला तर ते एकारलेपणाकडे जाईल.
आजकाल सामाजिक आणि राजकीय स्तरावर अभद्र भाषेचा वापर प्रचंड वाढला आहे. विशेषत: राजकारण्यांकडून होणारी वक्तव्ये ऐकल्यावर तर ‘यांच्या जिभेला हाड नाही का? असेच म्हणावे लागते. त्यांच्या या अशा अमर्यादित वाचाळपणामुळे बरेचदा राष्टÑीय पदांची प्रतिष्ठाही धुळीस मिळते. पण त्याच्याशी यांना काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही.
वाचाळवीरांची ही फौज जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडे आहे. अलीकडच्या काळात राजकारण्यांकडून होणाºया आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे भारताचे राजकारण फार चिखलमय झाले आहे, असे म्हटल्यास ते चूक ठरू नये. दुसरीकडे या वाढत्या मानसिक प्रदूषणासोबतच लोकांची सहनशीलताही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आश्चर्य याचे वाटते की लोक दुसºयांवर टीका करताना कुठलीही मर्यादा पाळत नाहीत परंतु त्यांच्यावर जराशी कुणी टीका केली की मात्र यांच्या अंगाचा तीळपापड होतो. सत्तेसोबत आपल्याला काहीही बोलण्याचा परवानाच मिळाला असल्याच्या अविर्भावात काही नेते वावरताना दिसतात. जगप्रसिद्ध ताजमहालबद्दल भाजपाच्या काही नेत्यांनी नुकतीच केलेली वक्तव्ये हे त्याचेच उदाहरण. तर अशा या कमालीच्या गढूळ वातावरणात कुणी साधा विनोदही केला तरी तोसुद्धा सकारात्मक घेतला जाण्याची शक्यता कमीच. आता हेच बघा ना! एका विनोदवीराने दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल काय केली; त्याचा एवढा गहजब झाला की त्या बिच्चाºया कलाकाराचा तो कार्यक्रम प्रसारितच होऊ शकला नाही. विशेष म्हणजे या कलाकाराने यापूर्वी राहुल गांधींचीही नक्कल केली होती. आपल्या नेत्याची नक्कल केल्याने मोदींच्या काही तथाकथित समर्थकांच्या भावना म्हणे खूप दुखावल्या गेल्या. खरे तर एखादी बडी असामी किंवा नेत्यावर विनोद अथवा व्यंग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भारतात ही परंपरा फार जुनी आहे. राजेमहाराजांच्या काळातही त्यांच्या दरबारात असे विनोदवीर राहात असत. वेळप्रसंगी ते आपल्या महाराजांचीसुद्धा फिरकी घेत असत. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयींचेच बघा ना! कलाकारांनी त्यांच्या कविता वाचनाच्या खास शैलीची नक्कल अनेकदा केली. पण त्यांनी कधी ते मनावर घेतले नाही. खुद्द मोदींनासुद्धा त्यांची नक्कल करणे आवडले नसेल असे नाही. लोकशाही व्यवस्थेत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रात वावरणाºयांना लोकांच्या या टीकेचा सामना करावा लागतो. किंबहुना अनेकदा राजकीय नेतेसुद्धा खेळीमेळीत ते स्वीकारतातही. हास्य-विनोद हे राजकारण निकोप बनवीत असते आणि राजकारण्यांना अजातशत्रू. पण राजकारणातील विनोदच संपला तर ते एकारलेपणाकडे जाईल. त्यामुळे आमचे नेते अशा टीकांना अथवा व्यंगांना घाबरत असतील किंवा त्यावर संतापत असतील तर या लोकशाही व्यवस्थेला कुठेतरी खिंडार पडत आहे असेच म्हणावे लागेल.