एक्झिट पोलच्या दाव्यांची पोल‘खोल’

By admin | Published: October 20, 2014 05:58 AM2014-10-20T05:58:25+5:302014-10-20T05:58:25+5:30

निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत

Pollock's claims of exit polls | एक्झिट पोलच्या दाव्यांची पोल‘खोल’

एक्झिट पोलच्या दाव्यांची पोल‘खोल’

Next


निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत. त्यामुळे अशा चाचण्यांच्या शास्त्रीय आधारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.
१५ आॅक्टोबरच्या मतदानाला ४८ तास बाकी असेपर्यंतच निवडणूकपूर्व अंदाज वर्तविता येतील, असे बंधन निवडणूक आयोगाने घालून दिले होते. मतदान सायंकाळी ६ वाजता संपल्यानंतर तासाभरातच एक्झिट पोलची आकडेवारी विविध टीव्ही चॅनेल्सवर झळकू लागली आणि त्यावर लगेच दावे-प्रतिदावेही सुरू झाले. मतदान संपताच निकाल सांगितल्याच्या आवेशात एक्झिट पोल कसे दिले जात आहेत, अशी विचारणा लगोलग सोशल मीडियातून सुरू झाली होती. भाजपाच्या समर्थकांनी एक्झिट पोलचे समर्थन करीत फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅपवर प्रतिहल्ले चढविले. आता निकालाने सगळे काही स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात अचूक अंदाज वर्तविल्याचा टेंभा मिरविणाऱ्या चाणक्यने भाजपाला १५१ आणि शिवसेनेला ७१ जागा दाखविल्या होत्या. सर्वांत खात्रीशीर एक्झिट पोल असे त्याचे कौतुकही करण्यात आले होते. तथापि, तो सपशेल चुकला. अर्थात हे भाकीत आपल्याकडेच चुकते असे नाही. २००४च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही ते चुकले होते आणि त्याची जगभर चर्चा झाली होती. मतदान करून बाहेर पडता पडता मतदारांचा कौल घेण्याचा प्रयत्न यात केला जातो. या वेळी कोणत्याही एक्झिट पोलचे सर्व पक्षांचे आकडे तंतोतंत खरे
निघाले नाहीत, पण काही त्याच्या आसपास पोहोचले़
पाश्चात्त्य देशांमध्ये एक्झिट पोल घेताना जेवढी दक्षता बाळगली जाते आणि बारकावे टिपण्याचा प्रयत्न होतो तेवढी शास्रशुद्ध पद्धत आपल्याकडे आजही अवलंबिण्यात आलेली नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये बरेचदा तफावत दिसून येते. निवडणूकपूर्व चाचणी किंवा एक्झिट पोलचे काम करणाऱ्या एजन्सी एखाद्या पक्षाची बाजू घेण्यासाठी त्यांना सोईची आकडेवारी देतात, असाही आपल्याकडे मोठा आक्षेप आहे. काही एजन्सींनी आर्थिक देवाणघेवाणीच्या मोबदल्यात अनुकूल आकडेवारी देण्याची तयारी दर्शविली होती, असे एका स्टिंग आॅपरेशनमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी समोर आले होते. भारतातील अशा बहुतेक चाचण्या या मोठ्या मीडिया हाउसच्या माध्यमातून करण्यात येतात आणि या हाउसच्या राजकीय सलगीबाबत उलटसुलट चर्चा होत आली आहे.
कमी मतदारसंख्या असलेल्या लहान देशांमध्ये एक्झिट पोलची आकडेवारी खरी निघू शकते. मात्र, भारतासारख्या विशालकाय देशात हे प्रचंड किचकट असे काम असते. भाषिक, धार्मिक आणि जातीय वैविध्य असलेल्या मतदारांचा अंदाज एकाच कसोटीवर मोजणे कठीण होऊन बसते.

Web Title: Pollock's claims of exit polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.