धुलिकण नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:29 AM2018-05-07T00:29:41+5:302018-05-07T00:29:41+5:30
कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचे दूषण या शहराला लागले आहे.
पूर्वी कुठल्याही कथेची सुरुवात ‘एक आटपाट नगर होते..’ अशी बहुदा होत असे. आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा उल्लेखही असाच काहीसा करावा लागतोय. कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचे दूषण या शहराला लागले आहे. येथील धुलिकणांनी मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर, देशातील सतरावे तर जगात ६२ व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी ख्याती या नगरीला प्राप्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात हे ‘प्रदूषित’ वास्तव समोर आले. विदर्भातील चंद्रपूरचेही नाव त्यात आहे. १०८ देशांमधील चार हजार लोकवस्तींचा अभ्यास केल्यावर त्यातील ८५९ शहरांची प्रदूषणाची पातळी तपासण्यात आली होती. या देशात जवळपास ३४ लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषणामुळे झाल्याचे या अहवालात नमूद आहे. प्रदूषित शहरांमध्ये आघाडी ही काही भूषणावह नाही. ‘रस्ते तुम्हाला आॅक्सिजन देणार आहेत काय?’असा सवाल मागे राष्टÑीय हरित लवादाने एका प्रकरणात उपस्थित केला होता. झाडांच्या वाढत्या कत्तलींची पार्श्वभूमी त्याला होती. पण थोड्या वेगळ्या कारणाने नागपूरसंदर्भातही सध्या हाच प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. येथील रस्त्यावर वाढलेली वाहनांची अवाढव्य संख्या, त्यात रस्ते आणि मेट्रोचे मोठ्या प्रमाणात सुरु असलेले बांधकाम यामुळे हवेतील धुलिकण प्रचंड वाढले आहेत. आणि हे धुलिकण म्हणजे वायू प्रदूषणातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहेत. वातावरणातील या प्रदूषणामुळे लोकांना मोकळा श्वास घेणेसुद्धा दुरापस्त झाले आहे. मनुष्याला प्राणवायू देणारी हवाच मृत्युदायी बनल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. विकासकामांचा सपाटा लावला असताना प्रदूषण नियंत्रणासाठी मात्र अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत. किंबहुना शहरांकडे आवश्यक उत्पन्न व साधनसामग्री नाही. कारण आपण अजूनही स्वयंसिद्ध नाही आणि निधी असलाही तरी शहर सौंदर्यीकरण आणि प्रदूषणमुक्तीला त्यात प्राधान्य नाही,असेच म्हणावे लागेल. म्हणायला प्रदूषण नियंत्रण मंडळे आहेत पण ती किती उपयुक्त ठरताहेत,हे कोडेच आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारे हे प्रदूषण बघता निकट भविष्यात नागपूरकरांवर आॅक्सिजन सिलिंडरसोबत घेऊन वावरण्याची वेळ आल्यास त्यात आश्चर्य काहीच नाही.