आजचा अग्रलेख: श्वास घुसमटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 08:10 AM2023-03-17T08:10:25+5:302023-03-17T08:11:38+5:30
भारतातील निम्मी जनता हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या आजाराला बळी पडू शकते, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
श्वास चालू आहे, तोवर जीवन आहे, असे आपण सतत म्हणतो. हाच श्वास घेताना प्रदूषित हवा शरीरात जात असेल तर तो घुसमटणार आहे. अनेक आजाराने गाठणार आहे. ते होऊ नये, असे वाटत असेल तर हवा स्वच्छ हवी. केंद्र सरकार २०१९ पासून १०२ शहरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबवीत आहे. हवेतील प्रदूषणामध्ये वीस ते तीस टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वास्तविक यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. अन्यथा भारतातील निम्मी जनता हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या आजाराला बळी पडू शकते, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
तसा एक अहवाल दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. यातील धक्कादायक बाब म्हणजे भारतातील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरातील दहा प्रदूषित देशांमध्ये भारताचा आठवा क्रमांक असला तरी पहिल्या सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांमध्ये चौदा शहरे भारतातील आहेत. भारताच्या उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील राज्यातील सर्व शहरे आहेत. देशाची राजधानी नवी दिल्ली आणि दिल्ली या दोन्ही शहरांचा पहिला क्रमांक आहे. दिल्लीशेजारच्या नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गुडगाव या चार शहरातदेखील हवेचे सर्वाधिक प्रदूषण आहे.
चौदापैकी पाच शहरे बिहारमधील आहेत. प्रत्येकी तीन शहरे हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. राजस्थानातील भिवाडी शहराचाही समावेश आहे. जागतिक पातळीवर दिल्लीचा चौथा क्रमांक लागतो. मुंबई १३७, कोलकाता ९९ व्या तर बंगळुरू ४४० व्या क्रमांकावर आहे. महानगरामध्ये तुलनेने चेन्नई शहरातील हवा सर्वात स्वच्छ आहे. या अहवालावर हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या आधारे गुणवत्ता तपासली गेली आहे. शिवाय पीएम २.५ आणि पीएम दहा याचा आधार घेतला आहे. हवेतील पार्टिक्युलेट मॅटरचे (पीएम) आकारमान पाहून हवेची गुणवत्ता तपासली जाते. सुमारे तीस हजार कर्मचाऱ्यांच्या साह्याने जगभरातील १३१ देशातून माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये ७ हजार ३०० शहरातील हवा तपासण्यात आली आहे. आकडेवारीचे जंजाळ बाजूला ठेवून जरी विचार केला तरी आपल्या देशातील शहरांची अवस्था खूपच वाईट आहे.
विशेषतः उत्तर भारतातील शहरांमध्ये होणारी गर्दी, स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष, मृत पाण्यातून निर्माण होणारी घाण, औद्योगिक वसाहतीतून होणारे प्रदूषण, कोळसा जाळून होणारी वीजनिर्मिती आणि शेतातून निर्माण झालेला कचरा जाळून निर्माण झालेल्या कार्बनमुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते आहे. वाहतुकीसाठी ज्या प्रमाणात आपण पेट्रोल-डिझेल आणि कोळसा जाळतो, त्यातून सर्वाधिक सुमारे तीस टक्के प्रदूषण होत असते. या सर्वांवर उपाय करण्यासाठी भारतात तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा दूरवरची खेडी सुरक्षित राहतील; पण रोजगार देणारी शहरे श्वास घेण्यास योग्य राहणार नाहीत. परिणामी अनेक आजारांना सामोरे जावे लागेल, अशा प्रदूषित शहरांमध्ये अस्थमा, कर्करोग, हृदयविकार आणि मधुमेहाचे आजार असणाऱ्या व्यक्तींना राहणे कठीण होत आहे, असा निष्कर्ष आहे. याचबरोबर लहान मुलांची श्वसनक्षमता आणि हृदयाची वाढ पुरेशी होत नाही, हा निष्कर्ष तर धक्कादायक आहे. भारताबरोबरच शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातदेखील प्रदूषण अधिक आहे. पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या लाहोरचा प्रथम क्रमांक लागतो.
जगातील सर्वाधिक हवा प्रदूषित असलेले शहर अशी लाहोरची ओळख झालेली आहे. भारताच्या सीमेपासून जवळ असल्याने त्याचा परिणाम आपल्या देशातही जाणवणार आहे. जंगल पेटविणे, शेतातील कचरा पेटवून देणे, आदी प्रकार तातडीने रोखले पाहिजेत. शहरातील वाहतूक अधिक निसर्गप्रेमी करायला हवी. वाहनांची गर्दी रोखण्यासाठी तातडीने लक्ष घातले पाहिजे. या अहवालानुसार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शहरांची हवा अधिक वेगाने प्रदूषित होत आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक धोका वाहनांतून बाहेर पडणाऱ्या कार्बनचा आहे. महाराष्ट्रातील वाहन संख्यावाढीचा वेग भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आणि इतर प्रदेशांच्या तुलनेतही अधिक आहे. ही संख्या कमी केली नाही तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी शहरे माणसाला राहण्यासाठी असुरक्षित होतील. प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच सर्वांनी यात सहभाग घेऊन स्वच्छ हवेची विधायक चळवळ उभारावी लागेल तरच आपल्याला श्वास मोकळा मिळेल, अन्यथा तो घुसमटत राहील!
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"