...लातूरप्रमाणेच सोलापूरलाही द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:03 AM2018-04-20T00:03:19+5:302018-04-20T00:03:19+5:30

२०१६ साली तंत्र व शिक्षण विभागाने सोलापूरचे शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात खलिता जारी केला होता.

polytechnic college for Solapur | ...लातूरप्रमाणेच सोलापूरलाही द्या!

...लातूरप्रमाणेच सोलापूरलाही द्या!

Next

लातूरला तंत्रनिकेतनसोबतच अभियांत्रिकी महाविद्यालय देताय. मग आम्हालाही त्याच न्यायाने द्या ! सोलापूरकरांच्या या भावनेने चांगलीच उचल खाल्ली असून, ‘विनोदभाऊ, सोलापूरवरचा रुसवा सोडा...’ असा सूर उमटत आहे.
तंत्रनिकेतनसह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीसाठी उभ्या राहिलेल्या चळवळीतील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना काहीबाही लिहिलेले मेसेज धाडले. त्यावरूनच विनोदभाऊ सोलापूरवर रुसले! २०१६ साली तंत्र व शिक्षण विभागाने सोलापूरचे शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात खलिता जारी केला होता. त्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी ‘ तंत्रनिकेतन बचाव’ मोहीम हाती घेतली.
खरे तर, १९५६ पासून ‘जीपीएस’ या नावाने सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवाचा एक अविभाज्य भाग बनलेली संस्था बंद होणार म्हटल्यावर ती वाचविण्याचा प्रयत्न होणे साहजिकच होते. तंत्र व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सर्वांचा पाठपुरावा सुरू झाला. त्याच पाठपुराव्याचा एक भाग म्हणून मंत्र्यांना मेसेज पाठविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात काही अभिरुचीहीन व शिष्टाचाराला न शोभणाऱ्या भाषेतील मेसेजचाही समावेश होता. तिथेच बिनसले! संघ संस्कारांच्या मुशीतून उदयास आलेले विनोदभाऊ त्यामुळे विचलित झाले.
त्यावेळी विनोदभाऊ सोलापूरकरांवर रुसल्याची सर्वांचीच धारणा झाली. आता त्या रुसव्याची आठवण व्हायलाही कारण घडले आहे. विनोदभाऊंनी सोलापूरवरील रुसवा सोडावा, अशी तमाम सोलापूरकरांची इच्छा आहे. लातूरच्या संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या मागणीवरून लातूरचे तंत्रनिकेतन बंद करू नये तसेच नवे अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू करावे, अशा आशयाचे आदेश खुद्द विनोदभाऊंनी प्रधान सचिवांना दिले आहेत. त्याच आदेशाचा धागा पकडून लातूरप्रमाणेच सोलापूरचेही तंत्रनिकेतन कायमस्वरूपी सुरू ठेवून नवे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयही सोलापूर जिल्ह्याला द्यावे, अशी मागणी सोलापूर तंत्रनिकेतन बचाव कृती समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष विष्णू राठी, उपाध्यक्ष अंकुश आसबे, समन्वयक मनोजकुमार गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, दत्ता मुळे, चेतन चौधरी, मिलिंद भोसले, प्रा. अशोक काजळे, गणेश डोंगरे, दत्ता चव्हाण, समद हुसेन शेख, गजानन जमदाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचीही तशीच मागणी आहे. ४३ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याच्या मागणीची दखल घेणे ही काळाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर देशात टेक्स्टाईल आणि गारमेंट हब म्हणून पुढे येत असलेल्या या जिल्ह्यात यंत्रमाग व विडी कामगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता कौशल्य विकास उपक्रमात आहे. गणवेश निर्मिती, साखर उद्योग यांसह जिल्ह्याच्या सर्व चांगल्या बाबींचे मार्केटिंग करण्याची मोहीम राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतलेली आहे. त्याला पूरक अशीच भूमिका पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचीही दिसते. त्याच कारणाने आता ‘विनोदभाऊ, रुसवा सोडा आणि सोलापूरकरांना तंत्रनिकेतनसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय द्या’ असेच सोलापूर जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील व्यक्ती म्हणू लागल्या आहेत !

- राजा माने
​​​​​​​raja.mane@lokmat.com

 

Web Title: polytechnic college for Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.