तळ्यात-मळ्यात

By admin | Published: February 23, 2016 03:04 AM2016-02-23T03:04:41+5:302016-02-23T03:04:41+5:30

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद निवर्तले त्याला दीड महिना लोटून गेल्यानंतर आजही त्या राज्याला नवा मुख्यमंत्री मिळालेला नसल्याने तिथे राष्ट्रपती राजवट

In the pond | तळ्यात-मळ्यात

तळ्यात-मळ्यात

Next

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद निवर्तले त्याला दीड महिना लोटून गेल्यानंतर आजही त्या राज्याला नवा मुख्यमंत्री मिळालेला नसल्याने तिथे राष्ट्रपती राजवट सुरु आहे आणि त्याचे एकमात्र कारण म्हणजे मुफ्तींच्या कन्या व उत्तराधिकारी आणि त्यांच्या ‘पीडीपी’च्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचे सुरु असलेले तळ्यात-मळ्यात. विधानसभेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या विचित्र राजकीय स्थितीत मुफ्ती यांनी भाजपाबरोबर सत्तासोबत करण्याचा घेतलेला निर्णय तसा सोपा नव्हता. तरीही त्यांनी तो घेतला आणि एक अद्भूत समीकरण त्यातून उदयास आले. परवाच्या रविवारी मेहबुबा यांनी प्रथमच आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत जी जाहीर चर्चा केली, त्यावेळी बोलताना आपण मुफ्ती साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि मुफ्ती साहेब राजकारणात ‘यू टर्न’ घेणाऱ्यांंपैकी नव्हते असे विधान केले. त्यावरुन पीडीपी-भाजपा युतीचे सरकार तिथे पुढे चालू राहील अशी अटकळ बांधली गेली. माध्यमांनी तशी पृच्छादेखील केली. पण त्यावर मेहबुबा यांनी ‘काळच याचे उत्तर देईल’ असे अत्यंत संदिग्ध उत्तर दिले. पण केवळ एवढ्यावरुनच त्या युती पुढे सुरु ठेवण्याबाबत अनुकूल आहेत असा निष्कर्ष निघत नाही. त्यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली व मोदींनी गेल्या डिसेंबरात पाकिस्तानला अचानक भेट देऊन नवाझ शरीफ यांची जी सदिच्छा भेट घेतली, त्याबाबत मोदींचे अभिनंदन करताना माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना मात्र दहा वर्षात एकदाही पाकिस्तानला भेट देण्याचे ‘धाडस’ दाखविता आले नाही, असे दूषणदेखील प्रदान केले. मेहबुबा यांनी प्रथमच एका जाहीर कार्यक्रमात भाग घेतला, त्याच्या आदल्याच दिवशी भाजपाचे सरचिटणीस आणि पीडीपी-भाजपा युतीचे ‘शिल्पकार’ राम माधव त्यांना गोपनीयरीत्या भेटून गेले. ही गोपनीयता नंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी खुली केली, हे अलाहिदा. राजधानी दिल्लीतील जेएनयु प्रकरणी भाजपावर, पीडीपीशी सख्य केल्याबद्दल विरोधक जो हल्ला करीत आहेत त्या हल्ल्याने भाजपा अजिबातच विचलित झालेली नाही हे यातून दिसून येत असले तरी मेहबुबा मात्र वेगळ्या कारणांसाठी विचलित झालेल्या दिसतात. विशेषत: पीडीपी-भाजपा युतीच्या मुख्यमंत्री म्हणून मेहबुबा यांचा मुख्यमंत्री म्हणून सत्वर शपथविधी व्हावा अशी घाई काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोहोंना झाली आहे. त्याचे एकमात्र कारण म्हणजे भाजपाचा पूर्वेतिहास. हा पक्ष मुस्लीमविरोधी म्हणून त्या राज्यात ओळखला जातो आणि अशा पक्षाशी जो पक्ष युती करतो, त्याला जेव्हां केव्हां निवडणुका जाहीर होतील तेव्हां बदनाम करणे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोहोंना सोपे जाणार आहे. त्यातून सुमारे पाच दशके त्या राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिलेल्या मुफ्ती यांना जे साधले ते त्यांच्या कन्येला साधेलच याची खुद्द मेहबुबा यांनादेखील खात्री वाटत नसावी.

Web Title: In the pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.