पोर : शेजारणीचे आणि सवतीचे!

By admin | Published: February 13, 2015 12:23 AM2015-02-13T00:23:04+5:302015-02-13T00:23:04+5:30

देवेन्द्र फडणवीस म्हणजे अस्सल वऱ्हाडी खर्डा ! आल्या गुरूला उत्तर देणार. व्यावहारिक भाषेत, ठोशास ठोसा. जसा देह तशीच बोली म्हटले तरी चालेल

Poor: Neighborhood and Maternal aunt! | पोर : शेजारणीचे आणि सवतीचे!

पोर : शेजारणीचे आणि सवतीचे!

Next

देवेन्द्र फडणवीस म्हणजे अस्सल वऱ्हाडी खर्डा ! आल्या गुरूला उत्तर देणार. व्यावहारिक भाषेत, ठोशास ठोसा. जसा देह तशीच बोली म्हटले तरी चालेल. तसंही माणसानं ऐकून घ्यायचं; घ्यायचं म्हणजे तरी किती? बुद्धिबळाच्या पटावर राजा कोप-यात गेला की त्याला साधे प्यादेदेखील रंजीस आणू शकते. त्यामुळे राजाला कोपऱ्यात जाऊ द्यायचे नसते. देवेन्द्र बुद्धिबळपटू आहेत वा नाही, ज्ञात नाही. पण त्यांना हा बारकावा बरीक ठाऊक असावा असे दिसते. त्यामुळेच की काय, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठ्या गंमतीशीर उपमेचा वापर करताना एक प्रतिप्रश्न विचारला, दुसऱ्याच्या घरात पोर झाल्याचा किती आनंद साजरा कराल? याला संदर्भ अर्थातच राजधानीत भाजपाचा आणि विशेषत: पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा जो पाडाव झाला, त्यावर सेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केलेल्या काहीशा उन्मादीत प्रतिक्रियेशी संबंधित असल्याचे समस्त सूज्ञास ठाऊकच आहे. पण नेमके इथेच फडणवीस चुकले. त्यांच्या ध्यानी सेनेच्या या उन्मादयुक्त प्रतिक्रियेचे मर्मच आलेले दिसत नाही. दिल्लीत भाजपा हरली आणि आप जिंकली वा आपच्या पोटी अरविंंद केजरीवाल नामे करून नव्या मुख्यमंत्र्याचा जन्म झाला म्हणून ठाकऱ्यांना आनंद झाला, असे नाहीच मुळी. त्यांच्या आनंदाचे कारण वेगळेच आहे. सत्तेतील आपल्या सवतीला देशाच्या राजधानीत विजय नावाचे पोर झाले नाही, हा खरा त्यांना झालेल्या आनंदाचा गाभा आहे. असो. आनंद कशात मानायचा आणि कशात नाही, हे प्रत्येकाच्या स्वभाव आणि प्रकृती धर्मावर अवलंबून असते. त्यानुसार उद्धवराव यांना आनंद झाला. पण या आनंदाचे कारण त्यांना स्वयंप्रेरणेने गवसले असते, तर त्याचे सारे श्रेय आपसूक त्यांच्याचकडे गेले असते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. दिल्लीत भाजपाचा नव्हे, तर मोदींचा पाडाव झाला अशी जी काही प्रतिक्रिया अण्णा हजारे नामेकरुन एका नामवंताने व्यक्त केली, त्या प्रतिक्रियेचा आधार घेऊन आणि तिलाच ‘मम’ म्हणून उद्धव ठाकरे आनंदित होत्साते झाले आहेत. आता यात सवाल इतकाच की, ज्या नामवंताची आपल्या तीर्थरूपांनी ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ म्हणूनच सातत्याने हेटाळणी आणि निर्भर्त्सना केली, त्या अण्णा हजाऱ्यांच्या प्रतिक्रियेत चिरंजीवांना एखाद्या सुभाषिताचा साक्षात्कार व्हावा हे कसे? खरे तर हजाऱ्यांची खरी पोची तीर्थरूपांनीच ओळखली होती. कोणतेही विशिष्ट लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता, एखाद्याने अगदी निरुद्देशाने आपला गाव सोडावा आणि भटकंती करीत रहावे, अशासारखाच हजारे यांचा आजवरचा प्रवास. त्यांच्या अस्सल ग्रामीण व्यवहाराला किंवा फार फार तर व्यवहार चातुर्याला भुलून केजरीवाल, बेदी, भूषणद्वय आदि मंडळींनी देशाच्या नकाशावरील राळेगणसिद्धी नावाचा बिंदू शोधून काढला. त्यात उभयतांची सोय होती. अण्णांना शिकले सवरलेले आणि साहेबाच्या भाषेत चुटुचुटु बोलणारे लोक आपल्या परिघात हवे होते आणि या लोकाना हजारे यांच्या महाराष्ट्र शासनमान्य आणि पुरस्कृत वर्तुळात शिरून प्रकाशझोतात न्हाऊन निघायचे होते. तो कार्यभाग सचैल साधून झाल्यावर यातील एकेकाने अण्णांचे बोट सोडायला सुरुवात केली आणि आपापल्या राहुट्या उभारून स्वत्व दाखवून देण्यास प्रारंभ केला. ‘अण्णाजींनी’ बरीच आदळआपट करून बघितली, स्वत:ला पाशमुक्त करून घेतले. आपल्या पट्टशिष्यांनी राजकारणाच्या दलदलीत आपणहून प्रवेश केला म्हणून त्यांच्याशी अबोला धरला. आशीर्वाद मागण्यासाठी त्यांच्या पुढ्यात जोडले गेलेले हातही झिडकारून लावले. आणि अचानक अरविंद वा किरण कोणीही दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी बसले तरी आपलाच शिष्य या मानाच्या पदावर बसेल, अशी प्रतिक्रियादेखील व्यक्त करून मोकळे झाले. तेव्हां अशा मान्यवराच्या प्रतिक्रियेला किंमत द्यायची ती किती? पण सवाल किंमत देण्या वा न देण्याचा नव्हताच. सवाल जेजे आपणासी सोयीचे तेते स्वीकारूनी मोकळे व्हावे, असा होता. विभक्त होत नाहीत वा झाले नाहीत म्हणून राज्यात सध्या युतीचे राज्य आहे, असे म्हणायचे. आपण जर ती केली नाही तर कुणीतरी तिसरा किंवा तिसरी टपून बसलीच आहे, हा विचार करूनच सेनेने भाजपासंगे पाट लावायची तयारी वा नामुष्की पत्करली. पंधरा वर्षांच्या निर्जळी उपवासानंतर आणखी पाच वर्षे तो करीत रहायचे व पाच वर्षानंतरही पुन्हा तो सुटेल वा नाही याची धाकधूक बाळगत रहायचे, त्यापेक्षा घ्या आत्ताच त्याची सांगता करून हाच विचार सेनेने केला. म्हणजे एकप्रकारे मनावर दगड ठेवूनच उपवासाची सांगता केली. अशा स्थितीत उपवास सोडायला, मोदकांचे ताट न मिळता साधी भाजी-भाकरीच मिळाली, अशा तक्रार करीत राहण्यात काय हंशील? ‘जे वाढले, ते गिळा’! म्हणजे मुदलात काय की, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशासारखीच गत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. हा मार व्यक्त करण्यासाठी आपले शब्द वापरण्यात कमालीचा धोका. तो पत्करण्यापेक्षा कुणा तिऱ्हाईताचे शब्द वापरले तर बरे. मग हा तिऱ्हाईत भले अण्णा तर अण्णा! तेव्हां देवेन्द्रजी, पुन्हा समजून घ्या, आनंद पोर शेजाऱ्याला झाल्याचा नाहीच मुळी, तो सवतीला ते झालं नाही, याचाच अधिक आहे, अगदी अवर्णनीय!

Web Title: Poor: Neighborhood and Maternal aunt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.