धोक्यातील पूर्वांचल
By admin | Published: October 5, 2016 03:52 AM2016-10-05T03:52:23+5:302016-10-05T03:52:23+5:30
पाकव्याप्त काश्मीरात जाऊन भारतीय सेनेने केलेल्या सीमोल्लंघनाला सारा देश सलाम करीत असतानाच भारताच्या पूर्व सीमेवरच्या फौजफाट्याला पुरेशी रसद मिळते आहे
पाकव्याप्त काश्मीरात जाऊन भारतीय सेनेने केलेल्या सीमोल्लंघनाला सारा देश सलाम करीत असतानाच भारताच्या पूर्व सीमेवरच्या फौजफाट्याला पुरेशी रसद मिळते आहे वा नाही याकडेही तातडीने लक्ष देण्याची आज वेळ आहे. पश्चिमेसारखीच परिस्थिती उद्या पूर्व सीमेवर उद्भवली तर बलाढ्य चीनच्या सेनेचा सामना करण्याइतपत भारतीय सैन्यदलांची ‘तयारी’ आहे का? गेली काही वर्षे त्या भागातील विकासाचे आणि अशांततेचे प्रश्न धारदार बनत चालले आहेत. पूर्व सीमेकडे किती तातडीने व डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवे, याचे ताजे उदाहरण म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (लाइन आॅफ अॅक्चुअल कण्ट्रोल-एलएसी) आत ४५ किलोमीटर चिनी सैन्यानं टाकलेले तंबू. भारतीय भूभागात दाखल होत हा आपलाच भाग असल्याचा दावाही चिनी सैन्याने केला. अंजाव हा अरुणाचल प्रदेशातला अत्यंत छोटा जिल्हा. फक्त २२२ गावे आणि प्रतिकिलोमीटर तीनच माणसं इतकी घनता. घनदाट अरण्य. बॉर्डरपर्यंत जायचं तर रस्ते नाहीत, सैन्याची वाहनंही काही विशिष्ट अंतरच जाऊ शकतात. तिथून पुढे सैन्याचा पायीच प्रवास. पलीकडे डोक्यावर उभा चीन. तिकडे चिनी सरकारने थेट भारतीय सीमेपर्यंत बांधलेल्या हायवेवरुन चिनी सैन्य थेट भारतीय भूभागात येऊ शकते. या भागात लोकसंख्या अत्यंत विरळ असल्याने जंगलात कुठवर चिनी सैन्य आले हे कळायलाही काही दिवस उलटावे लागतात. यावेळी जेव्हा पेट्रोलिंगवर गेलेल्या भारतीय सैन्याला चिनी सैन्य दिसले तोपर्यंत त्यांनी तात्पुरते पूल, तात्पुरत्या राहुट्या उभ्या केल्या होत्या. मागे हटायला अर्थातच मनाईही केली. शेवटी दोन्ही देशांनी ध्वजबैठक बोलावली आणि हा प्रश्न तात्पुरता सोडवला. पूर्व सीमेवर एकीकडे अशी दादागिरी सुरु असतानाच आता अरुणाचल प्रदेश फ्रण्टीअर हायवेचे कामही सुरु आहे. चीन आणि बांगलादेशला जोडत हा हायवे भारत आणि म्यानमारमधून जाणार आहे. या हायवेमुळे अरुणाचलातल्या दुर्गम भागात रोजगार आणि पर्यटन वाढेल आणि चीनच्या कारवायांना आळा बसेल असा जाणकारांचा कयास आहे. ते होईल तेव्हा होईल, मात्र पूर्व सीमेकडे सरकारचे दुर्लक्ष होते आहे म्हणताना ‘भारतीय’ म्हणवून घेणाऱ्या बहुसंख्य सामान्य जनतेलाही अरुणाचल आणि चीनची सीमा नक्की कुठे आहे, हे सहजी सांगता यायचे नाही. पूर्व सीमेचे, तिथल्या माणसांचे हे तुटलेपण आणि त्याकडे भारतीय जनतेचे होणारे अक्षम्य दुरावलेपण, दुर्लक्ष्य हे चिनी घुसखोरीपेक्षाही घातक आहे हे नक्की!