सर्वंकष धोरणांचा सकारात्मक ‘असर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:20 AM2019-01-18T06:20:11+5:302019-01-18T06:20:20+5:30

‘शिक्षण’ क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक शिक्षक हा शिकविण्याचे काम प्रामाणिपणेच करत असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

Positive 'impact' of global policies | सर्वंकष धोरणांचा सकारात्मक ‘असर’

सर्वंकष धोरणांचा सकारात्मक ‘असर’

Next

शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राशी समाजातील प्रत्येक घटकाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध येत असतो. तसेच ‘शिक्षण’ या विषयावर कोणतीही व्यक्ती आपली मते मांडत असते. हे सामाजिक वातावरण व त्यात होणाऱ्या शिक्षणविषयक चर्चांचा नकळत परिणाम शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर होत असतो. त्यानुसार चार वर्षांपूर्वीचे शैक्षणिकदृष्ट्या ‘सामाजिक’ वातावरण नकारात्मक होते. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर नकारात्मक ताशेरे ओढले जात होते, प्रथम संस्थेद्वारे प्रकाशित होणारा शैक्षणिक ‘असर’ अहवाल शिक्षणातील ढासळलेल्या गुणवत्तेचे चित्रण करणारा होता. हे सर्व चित्र स्वीकारून शालेय मंत्री म्हणून त्यातील प्रत्येक घटकावर काम करण्यास मी सुरुवात केली.


‘शिक्षण’ क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक शिक्षक हा शिकविण्याचे काम प्रामाणिपणेच करत असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शिक्षक परिषदांच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये हा विश्वास निर्माण केला व त्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे शिक्षक सकारात्मक झाला व शिक्षण क्षेत्रात ‘शिक्षक परिषदांच्या’ माध्यमातून एक चैतन्य निर्माण झाले. शिक्षक या घटकाबरोबरीनेच महत्त्वाचा घटक म्हणजेच ‘विद्यार्थी’. शिक्षण विभाग हा या दोन घटकांसाठी कार्यरत असतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक निर्णय हा विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवूनच झाला पाहिजे, यावर मी ठाम होतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरात गुणवत्तापूर्ण वाढ करण्यासाठी व शिक्षकांना अध्ययन-अध्यापनात मार्गदर्शन करण्यासाठी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या अध्यादेशाची निर्मिती करण्यात आली.


शिक्षणातील गुणवत्तेवर भाष्य करणारा महाराष्ट्रातील २८ पानी हा असा पहिलाच अध्यादेश आहे. या अध्यादेशामुळे राज्यात खºया अर्थाने शैक्षणिक चळवळीस सुरुवात झाली. प्रत्येक मूल शिकू शकते हा विश्वास निर्माण झाला आणि १०० टक्के मुलांना शिकवलेच पाहिजे या जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांना एक मार्गदर्शक दिशा मिळाली. आज तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा वेळेस दृश्यस्वरूपात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील भाग पाहिला तर त्यांच्या अध्यापनात वाढ होते हे लक्षात आले. त्यासाठी मोबाइल हे एक शैक्षणिक साधन असा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशामुळे जवळपास ६५,००० शाळा मोबाइल, संगणक अशा साधनांच्या मदतीने डिजिटल झाल्या व जवळपास १ लाख शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले.
शिक्षक व विद्यार्थी या दोन घटकांच्या बरोबरीने महत्त्वाचा घटक म्हणजे अधिकारी. या अधिकाºयांच्या मदतीने शालेय स्तरावरील गुणवत्तेची तपासणी केली जाते. या अधिकाºयांमध्ये शिक्षणविषयक संकल्पनांची जाणीव समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. शाळाभेटी कशा करायच्या याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे अधिकारी-शिक्षक-पालक-शालेय व्यवस्थापन समितीमधील सदस्य हे गुणवत्तेची भाषा बोलू लागले.


अर्थात असे असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव आहे. १०० टक्के विद्यार्थी शिकले पाहिजेत, यासाठी अजून प्रयत्न करायचे आहेत. पण महाराष्ट्रात दिग्गजांनी निर्माण केलेला वारसा समर्थपणे पुढे नेण्यास नियोजनबद्ध पावले आम्ही टाकली आहेत व त्यास यश येत आहे, याचे पूर्ण समाधान मला आहे.

- विनोद तावडे । शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

Web Title: Positive 'impact' of global policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा