एक पोस्ट चिमणराव कदम यांच्यासाठी...
By Admin | Published: December 18, 2014 02:39 PM2014-12-18T14:39:29+5:302014-12-18T14:39:29+5:30
चिमणराव कदम यांचे परवा निधन झाले आणि काँग्रेसमध्ये असलेले विरोधी पक्षाला साजेसे अभ्यासू आणि मुलुखमैदानी व्यक्तिमत्त्व संपले.
दीपक बिडकर,माध्यम सल्लागार -
चिमणराव कदम यांचे परवा निधन झाले आणि काँग्रेसमध्ये असलेले विरोधी पक्षाला साजेसे अभ्यासू आणि मुलुखमैदानी व्यक्तिमत्त्व संपले. अर्ध चंद्रकोर लावून, पांढरे धोप कपडे घालून सूर्याजीराव तथा चिमणराव कदम बाहेर पडले की, त्यांच्या तेज नजरेच्या आणि वाणीच्या पट्ट्यात शक्यतो आपण येऊ नये, अशी काळजी घ्यावी लागायची. फलटण मध्ये 'कार्यकर्ते कमी आणि विविध पक्षीय नेते जास्त' अशी अवस्था. त्या अवस्थेतून त्यांनी विधानसभेवर निवडून येत सभागृह गाजवले. १९८0 ते १९९५ पर्यंत हे वादळ राजकारणात घोंघावत होते. (एकदा सातारी राजकारण्यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्याविरुद्ध लढण्यासाठी थेट इंदिराजींच्या समोर दिल्लीत उभे केले आणि कदम यांनी त्यांना विनम्र नकार दिला, तो यशवंतराव यांच्या आदरापोटी! )
कृष्णा खोऱ्याचे पाणी पळवणारे नेते त्यांच्या शाब्दिक असुडांचे बळी ठरत. बारामतीचे शरद पवार आणि फलटणचे चिमणराव कदम यांचा लढा भिन्न व्यक्तिमत्त्व, भिन्न विचारसरणीचा होताच; पण बांधावरचादेखील होता. कृष्णा खोऱ्याचा आणि करारांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीत कसे संदर्भ मिळवले, हे चिमणराव रंगवून सांगत. टाटा इस्टेट गाडीत बसून-झोपून ते फलटण-मुंबई , फलटण-पुणे, फलटण -नागपूर असा प्रवास करायचे.
अर्थात अशी अभ्यास करायची काँग्रेसला सवय नव्हतीच. त्यामुळेच ते मुलुखमैदानी आणि मुलुखावेगळे ठरत. २००४ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिरीष चिटणीस आणि श्रीकांत कात्रे या मित्रांनी माझी आणि चिमणरावांची मोट बांधली, मला त्यांचे निवडणूक प्रसिद्धिप्रमुख केले आणि मुलुखमैदानी तोफेच्या तोंडी दिले !
लॅपटॉप, मोबाईल, डिजिटल कॅमेरा यातील काहीच त्या परिसरात नव्हते त्या वेळी (म्हणजे दहा वर्षांपूर्वी) लिहिलेले वृत्तांत पेपरच्या कार्यालयात पोहोचवणे हे रोजचे दिव्य होते. आपला प्रसिद्धिप्रमुख, माध्यम सल्लागार म्हणजे काय हे सुरुवातीला चार दिवस त्यांच्या पचनी पडले नाही. 'तुम्ही माझी भाषणे लिहून पेपरला पाठवणार म्हणजे 'टपाल्या'सारखे काम करणार' असे ते खास शैलीत हिणवत! त्यांची जहरी टीका ऐकून माणसे आत्महत्या कशी करीत नाहीत याचे आश्चर्य मला वाटे.
पण, नंतर एकाच गाडीत रोज आम्ही बरोबर राहून काम केल्यावर त्यांच्या ध्यानी 'माध्यम सल्लागार' हा प्रकार आला. आणि मुलुखमैदानी भाषणे झाल्यावर गाडीत बसल्यावर मृदू आवाजात ते मला भाषण कसे झाले ,याचा फिडबॅक घेत. एकाच डब्यातील भाजी-पोळी आम्ही दुपारी कोणत्यातरी झाडाच्या सावलीत खात असू. अतिशय आरोग्यकारक भाजी, पोळीचा डबा असे तो. दिवसभर वणवण फिरताना घसा खराब होऊ नये म्हणून पाण्याऐवजी कॉफी पीत असत ते. सर्व प्रचार यंत्रणा एक हाती सांभाळली त्यांनी! स्वत:च सकाळी ११ पर्यंत सर्वांना हाकून ते नियोजन करत आणि मग गाड्या प्रचाराला निघत.
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत होते, लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी होती. चिमणराव कदम यांची वाट नेहमीप्रमाणे कठीण होती. त्यात निवडणूक काळात उन्हाळा आणि दुष्काळ होता. चारा छावण्या ठिकठिकाणी पडल्या होत्या. आपली जनावरे पाणी असलेल्या पाहुण्यांकडे खुद्द चिमणरावांनी धाडून दिली होती. 'यशवंत परंपरा' चालवणे आणि लोकसभेत भांडून हक्काचे कृष्णा खोऱ्याचे पाणी सातारा दुष्काळी भागाला (दहिवडी-खटाव-माण-फलटण -खंडाळा ) मिळवून देणे हा त्यांचा नारा होता .
बुडत्या काँग्रेसमधून तेव्हा उंदरासारखे नेते बाहेर पळत होते, अशा वेळी ह्यमी उंदीर नाही, वाघ आहे, वेळप्रसंगी काँग्रेसचे बुडणारे अख्खे जहाज खेचायची ताकद माझ्या अंगात आहेह्ण असे ते डोळे फिरवून म्हणत आणि रोमांच उभे करीत. अगदी जिगरबाज माणूस. काँग्रेसच्या पचनी न पडलेला
आणि जिभेच्या पट्ट्याने सर्वांना घायाळ करीत स्वत:च घायाळ झालेला. चिमणरावांच्या पत्नी मात्र चिमणराव यांच्या भाषणाच्या बातम्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासारख्या लिहा, असे म्हणत! कदम यांचे उजवे हात असलेले सहकारी अच्युतराव खलाटे मात्र चिमणराव कदम यांच्या उलट स्वभावाचे. माणसे जोडणारे आणि मुलायम बोलणारे. त्यांनी मात्र २००४ निवडणूक संपली तरी संपर्क ठेवला. ही राजकारणातील जुनी पिढी, मागे पडली ती पडलीच .
आता सातारा वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या नेत्यांमुळे ओळखला जातो. मात्र, त्यातील एकही जण 'यशवंत परंपरा' चालविण्यासाठी मी निवडणूक लढवतोय, असे म्हणत नाही. सभ्यतेच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण एवढाच काय तो नियमाला अपवाद. काँग्रेसचे, साताऱ्याचे, यशवंतराव चव्हाण यांचे आणि चिमणराव कदम यांचे दुर्दैव हेच !