दृश्यकलेतील कोरोनानंतरचे अर्थजगत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:15 AM2020-06-10T02:15:53+5:302020-06-10T02:15:59+5:30

भारतात कोरोना विषाणू संक्रमित होऊ नये म्हणून २४ मार्च ते ३१ मेपर्यंत चार टप्प्यांत लॉकडाऊन केले गेले.

The post-corona semantic world of visual arts | दृश्यकलेतील कोरोनानंतरचे अर्थजगत

दृश्यकलेतील कोरोनानंतरचे अर्थजगत

Next

प्रा. बाळासाहेब पाटील

कोविड १९मुळे जगभरातील माणूस व त्याने निर्माण केलेले जग हादरून गेले आहे. सृष्टीतील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा मनुष्यप्राणी प्रचंड भयाने ग्रासला आहे. ते केवळ आरोग्याशी संबंधित नसून, त्याच्या दैनंदिन जगण्यातील हरतºहेच्या व्यवहाराचे आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक व्यवस्था कोरोनामुळे असुरक्षित झाल्या आहेत, तर व्यापार, अर्थ, उद्योग, मनोरंजन व शिक्षण अशी अनेक क्षेत्रे अस्वस्थ आणि काहीअंशी ढासळताना दिसत आहेत. तरीही कोरोनाच्या महामारीत माणूस जगण्याची प्रबळ इच्छा बाळगून लढतो आहे, जगतो आहे.

भारतात कोरोना विषाणू संक्रमित होऊ नये म्हणून २४ मार्च ते ३१ मेपर्यंत चार टप्प्यांत लॉकडाऊन केले गेले. पाचवा टप्पा १ ते ३० जून असला तरी यामध्ये अनेक बाबतींतील निर्बंध उठविले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव तूर्तास पूर्ण हद्दपार होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुढील काळात कोरोनासोबत जगण्याची सवय लावावी लागेल. दैनंदिनीही बदलावी लागेल. कोरोनाची झळ दृश्यकला क्षेत्रालाही बसणार आहे. फरक इतकाच की, इतर क्षेत्रांची विविध माध्यमांमध्ये जशी चर्चा होते, तशी या क्षेत्राची फारशी होणार नाही. कारण हे क्षेत्र सामान्य माणसाला बरेच अनभिज्ञ आहे; शिवाय या क्षेत्राचा प्रभाव फार मोठ्या समुदायावर नाही. वास्तविक, चित्र-शिल्पकला क्षेत्राला यापूर्वीच अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. २००८ ची आर्थिक मंदी व त्यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या नोटाबंदीमुळे दृश्यकला क्षेत्रातील आर्थिक व्यवहार बऱ्याच प्रमाणात मंदावले आहेत आणि आता तर कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे पुढचा काळ कसा असेल, त्याचा केवळ अंदाज केलेला बरा.
साधारण २० मार्च २०२० पासून देशातील कलादालने (आर्ट गॅलºया), वस्तुसंग्रहालये, कला महाविद्यालये कोरोनामुळे बंद आहेत. ती अजून किती दिवस बंद राहतील, हे निश्चित सांगता येत नाही. लॉकडाऊन संपले तरी कोरोना तसाच राहणार आहे, त्यामुळे आर्ट गॅलºया सुरू केल्या तरी त्यामध्ये काही महिने तरी प्रदर्शन होण्याची शक्यता धूसरच आहे. गॅलऱ्यांमध्ये दोन ते तीन वर्षे कोणी फिरकेल असे आज तरी वाटत नाही; शिवाय परदेशी पर्यटक भारतात येण्याची व ते गॅलºयांत फिरकण्याची शक्यताही कमी आहे. आर्ट लव्हर, बायर, क्युरेटर हेही या काळात गॅलºयांकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही वर्षे तरी कलाकारांसाठी कलाप्रदर्शन ही मोठी जोखीम असेल.

असे असले तरी आर्ट गॅलºयांचा काळ हा कलाप्रदर्शने करण्याकडेच राहील; कारण आगाऊ पैसे घेऊन त्यांनी जवळपास वर्षभराचे अगोदर बुकिंग केलेले असते. त्यामुळे एक-दोन वर्षे गॅलरीसाठी कोणी विचारणा केली नाही तरी गॅलरी मालकांना त्याचा फारसा फटका बसणार नाही. बरेच खासगी गॅलरी मालक अगोदरच गलेलठ्ठ झालेत, तर काहींनी यापूर्वीच गॅलºया बंद केल्या आहेत. मात्र, जे कलावंत केवळ चित्रनिर्मिती व प्रदर्शनावर अवलंबून आहेत, त्यांच्यावर या परिस्थितीचा विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतात कोरोनामुळे दृश्यकला क्षेत्र अडचणीत येईल यात काही जाणकारांना फारसे तथ्य वाटत नाही. मुळात या क्षेत्राला भारतात मोठी भरभराट नव्हती. अपवाद होता फक्त १९९५ ते २००८ या कालखंडाचा. या काळात कलाकृतींची विक्री बºयापैकी होत होती व किंमतही चांगली मिळत होती. याच दशकात एम. एफ. हुसेन व त्यांची चित्रे सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या कलाकृतींच्या किमती लाखोंच्या घरात पोहोचल्या आणि भारतीय चित्रकलेला चांगले दिवस यायला सुरुवात झाली; पण ही लाट २००८ नंतरच्या आर्थिक मंदीत ओसरली.
येथील कलाकारांची अवस्था कायम शेतकºयांसारखी राहिली आहे. चांगले पिकवूनही त्यांच्या हाताला काहीच लागत नसते. नैसर्गिक आपत्ती वा शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही, तर सर्वकाही मातीमोल होते. तद्वत या कलाव्यवहाराचेही काहीसे असेच आहे. एखादे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी त्या कलाकाराला तीन ते चार वर्षे खपावे लागते. सुरुवात आर्थिक तरतुदीपासून सुरू होते. रंगसाहित्य, फ्रेमिंग, प्रसिद्धी, वाहतूक अशा सर्व बाबतीत त्याला एकाकी झगडावे लागते. याकरिता लागणारा वेळ, श्रम व पैसा महत्त्वाचा असतो. कलाकृतींचा विषय, आशय आणि आविष्कार हा आणखी वेगळा व डोक्याला ताण देणारा आहे. (खरे तर हा निर्मितीचा काळ खूप आनंदाचा आणि सर्जनशीलतेचा असतो.) या सर्व जुळवाजुळवीत कलाकाराचे सर्व कुटुंब सफर होत असते. इतके करूनही चांगली विक्री झाली नाही, तर तीन ते चार वर्षांची मेहनत झालेला खर्च अंगावर पडतो आणि आर्थिक परतफेडीच्या ताणतणावातच तो कलाकार प्रवाहाबाहेर फेकला जातो.

‘कोविड-१९’चा प्रादुर्भाव व त्याचा परिणाम उद्योग- व्यवसायावर दूरगामी होणार आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालही बेताचीच असेल. अशा आर्थिक दुष्टचक्रात येथील नेहमीचा ग्राहक तूर्तास तरी कलाकृतीत पैसा गुंतवेल असे वाटत नाही. एखाद्याने गुंतविले तरी पूर्वीच्या भावाने तो कलाकृती घेईल, असे नाही. तो स्वत:च अडचणीत असेल, तर नव्या अडचणींना कशाला आमंत्रण देईल! अशा काळात नामवंत कलाकारांच्या दर्जेदार कलाकृती कमी किमतीत कशा मिळतील यासाठी तो प्रयत्नशील राहील. परंतु, नवोदित कलाकारांच्या कलाकृतीवर पैसा लावून जोखीम पत्करणार नाही. देशात कलाकृतीच्या विक्रीसाठी केंद्रबिंदू असणाºया आर्ट गॅलºया मुख्यत: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलोर अशा तत्सम शहरांत आहेत आणि नेमक्या याच शहरात कोरोना घट्ट पाय रोवून उभा आहे. त्यामुळे कितीही ‘सॅनिटाईज’ केलेल्या आर्ट गॅलºयांतील कला व्यवहारांवर कोरोनाचा असर हा होणारच आहे.


( लेखक चित्रकार, कलाभ्यासक आहेत )

Web Title: The post-corona semantic world of visual arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.