खड्ड्यांवरून खडाजंगी
By admin | Published: July 21, 2016 01:45 AM2016-07-21T01:45:23+5:302016-07-21T01:45:23+5:30
शहरातील डांबरी रस्ते एकाच पावसात उखडले आहेत. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.
नागपूर : शहरातील डांबरी रस्ते एकाच पावसात उखडले आहेत. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कंत्राटदारांची नाकेबंदी करून रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशी करावी. त्यात दोषी आढळल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करावेत. सोबतच दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करीत महापालिकेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारच्या सर्वसाधारण खडाजंगी केली. एकूणच आजच्या सभेत ‘खड्डे पे चर्चा’ हाच विषय ऐरणीवर होता. श्रीमंत राजे रघुजीराव भोसले सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती.
शहरातील रस्त्यांवरील गिट्टी व डांबर बाहेर पडून मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. तसेच धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत सभागृहात सदस्यांनी हा विषय आक्रमक पणे लावून धरला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, किशोर गजभिये, किशोर डोरले, प्रशांत धवड, अरुण डवरे, राजू नागुलवार, अलका दलाल, सुरेश जग्याशी आदींनी खड्ड्याच्या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. प्रफुल्ल गुडधे यांनी हा विषय सभागृहात चर्चेसाठी आणला.
कंत्राटदार वर्षानुवर्षे शहरातील रस्त्यांच्या डांबरीक रणाचे काम करीत आहेत. परंतु रस्त्यांचे काम करताना डांबर दिसत नाही. स्थायी समितीच्या माध्यमातून या कामांना मंजुरी दिली जाते. परंतु सदस्यांना तांत्रिक ज्ञान नसते. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची असल्याचे विकास ठाकरे यांनी निदर्शनास आणले. कंत्राटदार रिंग बनवून रस्त्यांची कामे घेतात.
कंत्राटदारांना अधिकाऱ्यांचे अभय नागपूर : कंत्राटदारांना अधिकाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याचा आरोप करीत नाकेबंदी करून त्यांना काळ्या यादीत टाका. रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवरील गिट्टी व डांबर उखडले आहे. कामाला वर्ष होण्यापूर्वीच शहरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. दोषींची यादी लांबलचक आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. यावर प्रभावी उपायोजना करण्याची मागणी प्रफुल्ल गुडधे यांनी केली.
बोगस गुणवत्ता प्रमाणपत्र देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा
१५ टक्केहून अधिक वा कमी दराच्या निविदा भरता येत नाही. परंतु अशा निविदा मंजूर केल्या जातात. अवैध रोड कटींग, केबल कंपन्यांनी केलेले खोदकाम यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्ते नादुरुस्त होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. संजय बोंडे यांनी दोषी कंत्राटदारांना निलंबित करून महापालिकेत कोणतेही काम देऊ नये, अशी सूचना केली. किशोर गजभिये यांनी रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच बोगस गुणवत्ता प्रमाणपत्र देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. शहरातील पावसाळी नाल्या व सिवरेज यंत्रणा निर्माण केल्यास रस्ते नादुरुस्त होणार नाही, अशी सूचना अरुण डवरे यांनी केली. राजू नागुलवार यांनी डांबर कमी प्रमाणात वापरल्याने रस्ते खराब होत असल्याचे सांगितले. रस्त्यांमुळे नगरसेवक व महापालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचे किशोर डोरले म्हणाले. तर कंत्राटदारांना कमी दराने रस्त्यांची कामे देऊ नका, अशी सूचना प्रशांत धवड यांनी केली.(प्रतिनिधी)