सत्ता डोक्यात जाणे
By admin | Published: March 2, 2016 02:48 AM2016-03-02T02:48:47+5:302016-03-02T02:48:47+5:30
शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन
शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन त्यांच्यावर हल्ले करणे हे जर सत्ता डोक्यात जाण्याचे लक्षण असेल तर मग आज केन्द्रात जे काही सुरु आहे ते पाहाता केन्द्र सरकारच्या तर सत्ता डोक्याच्याही वरतून वाहू लागली आहे असेच म्हणावे लागेल. पण पवार तसे म्हणत नाहीत. पण म्हणून ते जे काही बोलले त्याचे गांभीर्य कमी होत नाही. याचे साधे कारण म्हणजे त्यांचे बोल हे अनेकांगांनी अनुभवाचे बोल आहेत! सत्ता येते आणि जाते पण जेव्हा ती येते तेव्हा सत्ताधीशांनी आपले पाय जमिनीवरच ठेवायचे असतात असा योग्य सल्ला त्यांनी युतीला दिला आहे. हाच सल्ला त्यांनी त्यांचे पुतणे अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, लक्ष्मणराव ढोबळे आदि प्रभ्रृतीना दिला होता वा नाही हे कळायला मार्ग नाही. बहुधा दिलाच असणार पण ‘घर की मुर्गी दाल बराबर’ सारखा काही प्रकार झाला असावा. त्यामुळे असेही म्हणता येईल की आज पवारांनी युतीच्या लोकांचे नाव घेतले असले तरी त्यामागील अंतस्थ हेतू ‘लेकी बोले’ असाही असू शकेल. युतीच्या याआधीच्या सत्तेला राज्यातील जनता वैतागली होती आणि म्हणूनच तिने आघाडीला अनिच्छेने का होईना वरले होते. पवार आज युतीच्या लोकाना जो सल्ला देत आहेत तो त्यांनी आघाडीला दिला असता आणि चुकून दिला असल्यास आघाडीकरांनी तो मनावर घेतला असता तर कदाचित आज त्यांच्यावर युतीला असे उपदेशामृत पाजण्याची वेळच आली नसती. आपण दोषींना पाठीशी घालणार नाही असा वज्रनिर्धारही पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखविला आहे. आघाडी सरकारमधील त्यांचे एक मंत्री भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरातील मंगल कार्यात कोकणामध्ये केलेली उधळपट्टी पाहून पवारांच्या डोळ्यात म्हणे अश्रू उभे राहिले होते व त्यावर जाधवांनी म्हणे क्षमापना केली होती. त्याला फार दिवस झाले नाहीत. पण पवारांच्या डोळ्यातील अश्रू आणि आपणच मागितलेली क्षमा गुंडाळून ठेऊन याच भास्कररावांनी तोच प्रयोग नाशकात अगदी अलीकडे केला. राज्यातील दुष्काळ पाहून बहुधा त्यांनी अन्नदानाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी तर हा प्रयोग लावला नव्हता? असेल तसेही असेल. कारण कशालाही तात्विक मुलामा देण्यात राष्ट्रवादींचा हात कोण धरु शकतो?