विकासवाटेवरील वाचाळवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:20 AM2018-05-02T05:20:11+5:302018-05-02T05:20:11+5:30

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे

Prabalveer on development | विकासवाटेवरील वाचाळवीर

विकासवाटेवरील वाचाळवीर

Next

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे. मुळात मोदी सत्तारूढ झाले तेंव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झाली होती. लोकसभेतील दिग्विजयानंतरही मोदी-शहा जोडगोळीच्या विजयरथाचे वारू चौफेर उधळत होते; त्यामुळे २०१९लासुद्धा मोदीच अशी बतावणी खुद्द विरोधी बाकांवरील नेते करीत. गुजरातमधील निवडणुकीत भाजपाची दमछाक उडाली आणि देशातील राजकीय चित्रच बदलून गेले. एकीकडे एकवटणारे विरोधक आणि दुसरीकडे सरकारविरोधी असंतोषाचे सूर यामुळे मोदी-शहा जोडगोळीही सावध झाली आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेत नव्याने डावपेच आखण्याची पंतप्रधानांची मनीषा भाजपा आणि संघ परिवारातील नेत्यांच्या निर्बुद्ध मुक्ताफळांनी उधळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच तोंडाला आवर घाला, माध्यमांना मसाला पुरवू नका, अशी तंबीच मोदींनी दिली. परंतु, चार वर्षे ज्यांनी बेलगामपणे आपल्या जिभेचा दांडपट्टा फिरविला त्यांना अचानक स्वत:ला सावरणे अवघड झाले आहे. या तोंडपाटीलकीला तसेच खास कारण आहे. डायना हेडनपेक्षा ऐश्वर्याचे सौंदर्य जास्त भारतीय आहे, नारदमुनी म्हणजे त्या काळचे गुगल, पुराणातली विमाने, गणपतीची सर्जरी वगैरे भाषा पहिल्यांदाच बोलली गेली असे नाही. इतकी वर्षे उजव्या चळवळीतील मंडळी हीच भाषा बोलत आले आहेत. सत्तेच्या परिघाबाहेर होते तोपर्यंत या गोष्टी लपून राहिल्या. भारतीयत्व, आहार, विहार, भाषा, पेहराव, स्वातंत्र्यलढा अशा अनेक बाबतींत उजव्यांची समज बाळबोध ठरते. वर्षानुवर्षे जो अर्धवट विचार पकडून ठेवला, ज्या भ्रामक समजांवरच विचारविश्व उभारले ते असे लगेच कसे नाकारणार? नारदाला गुगल व महाभारतातील संजयरूपी टीव्हीचा संस्कार कसा पुसायचा? वर्तमानात देशी बनावटीचे एकही विमान बनविणे शक्य नसताना पुराणकाळातील हवाई प्रवासाचा अभिनिवेश कसा टाळायचा? मोदींनी भाजपा नेत्यांना जीभ आवरण्याचा सल्ला दिला तरी तो मानवणार कसा? गायीच्या शेणामुळे किरणोत्सर्ग रोखला जातो म्हणून मोबाइलला कायम शेण लावणारे अखिल भारतीय नेते आजही संघ परिवारात आहेत. नियमित बौद्धिक व चिंतन शिबिरात रमणाऱ्यांची ही अवस्था कशाने झाली, याचा प्रामाणिक खल भाजपा, संघ आणि एकूणच उजव्या चळवळीला करावा लागणार आहे. तोपर्यंत मोदींच्या विकासवाटेवरील वाचाळवीरांचे अडथळे सनातन मानावे लागतील.

Web Title: Prabalveer on development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.