प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:10 AM2018-01-05T00:10:52+5:302018-01-05T00:12:43+5:30
नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे.
- प्रा. संदीप ताटेवार
नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. भगवंताच्या नामस्मरणाने हृदयावर कसे सकारात्मक परिणाम होतात याबाबत काही संशोधन लेखसुद्धा आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. मनापासून विठ्ठल शब्द उच्चारल्याने अनाहृत चक्रावर म्हणजेच हृदयावर याचा परिणाम होतो व हृदयाच्या ऊर्जेत वाढ होते असे चाचण्यात सिद्ध झाले आहे. भगवंताच्या नामस्मरणाच्या स्पंदनात शक्ती आहे व त्याच्या नामस्मरणाने विघ्न दूर होतात ही मान्यता अध्यात्मामध्ये बºयाच संत महात्म्यांनी मांडली आहे. म्हणूनंच संत कान्होपात्राने असाच अनुभव विशद केला आहे. ते म्हणतात,
नामे दोष जळती । नामे प्राण उद्धरती ।।
हे ते आले अनुभवा । सत्य जीवा प्रत्यया ।।
म्हणजेच नामस्मरणाने मानवी जीवनातील दोष नाहीसे होतात व जीवनाचा उध्दार होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी।
भगवंताच्या नामस्मरणाने मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढीस लागतात, मन सशक्त होते व दु:खावर मात करण्याची शक्ती नामस्मरणानीच येत असते. नामस्मरण हे मनापासून करणे आवश्यक आहे. त्यामागे श्रद्धा, निष्ठा, लीनता, अनन्यता, अखंडता आवश्यक असते. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ।।
म्हणजेच प्रभातसमयी रामाचे चिंतन करावे. केवळ शांत मनाने रामाचे नाव घेतल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. श्री गोंदवलेकर महाराजांनी तर भक्ती मार्गासाठी फक्त नामस्मरणाचा उपाय सांगितला आहे. आज वैद्यकीय शास्त्राने सुद्धा नामस्मरणाचे महत्त्व मान्य केले आहे. संत तुकाराम महाराजसुद्धा नामस्मरणाचे श्रेठत्व सांगतात की, मुखाने सतत नामस्मरण केल्याने मोक्ष हा मिळतोच. सर्व युगात भगवंताचे नामस्मरण करण्यात आले आहे. भक्त प्रल्हादाने विष्णूचे, हनुमंताने रामाचे केलेले नामस्मरण हे आदर्श उदाहरण आहे तेव्हा कलियुगात आपण सर्वजण मन:पूर्वक भगवंताचे नियमित नामस्मरण करू या !