प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कारवाई हवीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:02 AM2019-12-05T02:02:52+5:302019-12-05T02:03:20+5:30

साऱ्या जगाचे जणू चैतन्य लोपून ते अनाथ झाले. पण भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मात्र गोडसे याला देशभक्त ठरवून त्याचा गौरव केला.

Pragya Singh Thakur needs action! | प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कारवाई हवीच!

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कारवाई हवीच!

Next

- पवन के. वर्मा (राजकीय विश्लेषक)

नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्ली येथे महात्मा गांधी यांच्यावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. काही सेकंदांतच जगातील सर्वांत महान असा शांततेचा दूत निष्प्राण होऊन धरणीवर कोसळला. त्या भयानक गुन्ह्याने सारे जग थरारून गेले आणि जगाची सद्सद्विवेकबुद्धी हादरून गेली. साऱ्या जगाचे जणू चैतन्य लोपून ते अनाथ झाले. पण भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मात्र गोडसे याला देशभक्त ठरवून त्याचा गौरव केला. त्यांनी हे विचार एकदा नाही, तर दोनदा व्यक्त केले आणि दुसऱ्यांदा तर त्यांनी हे विचार लोकसभेच्या सभागृहात व्यक्त केले.

त्या जे काही म्हणाल्या त्याची नोंद लोकसभेच्या कामकाजात झाली आहे. अध्यक्षांनी त्यांचे हे वक्तव्य कामकाजातून जरी काढून टाकले असले तरी, साºया सभागृहाने त्यांचे विचार ऐकले आहेत. आपले बोलणे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले, असा खुलासा त्यांनी जरी केला असला तरी त्यामुळे कुणाचेच समाधान झालेले नाही. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह इतकेच नव्हेतर, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी साध्वींच्या वक्तव्याविषयी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. इतकेच नव्हेतर, संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीमधून त्यांची हकालपट्टीही करण्यात आली आहे. पक्ष त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांचे नाव एका दहशतवादी कृत्यात नोंदले गेले असून, त्यात त्या आरोपी आहेत म्हणून त्यांनी नोंदविलेले मत महत्त्वाचे आहे असे नाही, तर त्या ज्या विचारसरणीचा पुरस्कार करतात त्यामुळे त्यांचे विधान धोकादायक ठरले आहे. गोडसे याचा उल्लेख देशभक्त असा करण्यामागे कोणती हिंसक, विद्वेषपूर्ण, जातीयवादी आणि दुष्ट विचारसरणी कारणीभूत ठरली असेल? भाजपने या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. कारण प्रज्ञासिंह ठाकूर ज्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात, त्याचे समर्थन करणारे अनेक जण त्यांच्या पक्षात आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेत ते मत व्यक्त केल्यावर काही भाजप खासदारांनीही त्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. एक जण म्हणाला, गोडसे चुकीच्या मार्गाने गेला असला तरी देशभक्तीने प्रेरित होता! यापूर्वी साक्षी महाराजांसारखे लोकही नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ समोर आले होते!

तेव्हा या विषयावर भाजपने आपले मत स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. ठाकूर यांचे म्हणणे चुकीचे होते, असे जर त्या पक्षाला ठामपणे वाटत असेल तर त्याने साध्वीवर तत्काळ कारवाई करायला हवी. त्यांचे प्रकरण सभागृहाच्या नैतिकता समितीकडे सोपवायला हवे आणि समितीच्या शिफारशींच्या आधारे साध्वींचे संसद सदस्यत्व रद्द करायला हवे. त्यांचा माफीनामा लिहून घेऊन प्रकरण थांबविणे योग्य होणार नाही. उलट पक्षाने त्यांची पक्षातूनही हकालपट्टी करायला हवी. त्यामुळे पक्षामध्ये अशी द्वेषपूर्ण विचारसरणी मान्य केली जाणार नाही, असा संदेश संपूर्ण संघटनेत दिला जाईल.

आजवर भाजपने विभाजनवादी तत्त्वांना आणि त्यांच्याकडून व्यक्त होणाºया उद्धट वक्तव्यांना पुरेशी मोकळीक दिली आहे. काही महिन्यांपूर्वी आणखी एका साध्वीने, साध्वी निरंजन ज्योती यांनी रामजादे आणि हरामजादे या तºहेचे वक्तव्य केले होते. त्या वेळीसुद्धा त्यांचा माफीनामा पुरेसा ठरला होता. पण अशा कोणत्याच माफीनाम्यामुळे जातीयतेचे जे विष समाजात भिनवले जात आहे, त्याचा सामना केला जाऊ शकत नाही.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पहिल्यांदा जेव्हा गोडसे याचा उल्लेख देशभक्त असा केला तेव्हा त्याविषयी मोदींनी खेद व्यक्त करताना म्हटले, ‘गांधीजींविषयी किंवा नथुराम गोडसे याच्याविषयी जे विचार व्यक्त करण्यात आले ते अत्यंत वाईट होते आणि समाजासाठी चुकीचे होते. त्याबद्दल साध्वींनी माफी मागितली आहे. पण मी त्यांना पूर्णपणे माफ करू शकत नाही.’ याचा अर्थ साध्वींनी जे वक्तव्य पहिल्यांदा केले ते माफ करण्याची मोदींची तयारी नव्हती. पण या वेळी साध्वींनी त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती केली आहे आणि तीसुद्धा लोकसभेच्या मान्यताप्राप्त व्यासपीठावर. मग त्याबद्दल मोदींची प्रतिक्रिया काय असायला हवी होती? त्यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या पहिल्यांदा केलेल्या वक्तव्याबद्दल उद्वेग व्यक्त केला होता आणि तरीही त्याकडे दुुर्लक्ष करून साध्वींनी आपले निषेधार्ह वक्तव्य पुन्हा केले असताना साध्वींना त्याबद्दल योग्य तो धडा शिकविण्याची पंतप्रधानांची जबाबदारी नव्हती का?

सध्या संपूर्ण देश महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करताना साध्वी ठाकूर यांनी अशी कृती करणे सयुक्तिक होती का? कारण सरकारतर्फे ही जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. गांधीजींचा वारसा आणि त्यांच्या विचाराची प्रसंगोचितता याविषयी बांधिलकी बाळगण्याची गरज प्रतिपादली जात आहे. त्या प्रयत्नांच्या आघाडीवर स्वत: पंतप्रधान आहेत.

एक राष्ट्र या नात्याने भारताने अशा द्वेषमूलक विचार, संकुचितपणा आणि हिंसक भूमिकेपासून दूर राहण्यातच त्या राष्ट्राचे टिकून राहणे अवलंबून असणार आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर योग्य कारवाई केली नाही, तर द्वेषाचा प्रसार करणाºया शक्तींना बळ मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा पंतप्रधानांनी आपल्या निषेधाला कृतीची जोड द्यायला हवी. अन्यथा ज्या गोष्टी ते माफ करू शकत नाहीत, त्या गोष्टीत सूट देण्याची त्यांची तयारी आहे, असा समज जनमानसात रूढ होईल.

 

Web Title: Pragya Singh Thakur needs action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.