प्रग्यान झोपला, आदित्य जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:21 AM2023-09-04T07:21:35+5:302023-09-04T07:21:45+5:30

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी ...

Pragyan sleeps, Aditya wakes up | प्रग्यान झोपला, आदित्य जागा

प्रग्यान झोपला, आदित्य जागा

googlenewsNext

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी थोपटून झोपविण्यात आले, त्याच दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ हे यान रवाना केले. अंतराळात तीन महिने प्रवास करून १५ लाख किलोमीटर अंतरावरील लॅग्रांज-१ नावाच्या विस्मयकारक टापूत हे यान १२५ दिवसांनी पोहोचेल. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५ कोटी किलोमीटर असल्याने तिथूनही सूर्य खूप लांब आहेच. तरीही या टापूचे फायदे हे आहेत की पृथ्वी व सूर्य या दोहोंची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना या बिंदूवर निरस्त करीत असल्याने कोणतीही वस्तू स्थिर राहील. शिवाय, सूर्याच्या निरीक्षणात ग्रहण किंवा अन्य अडथळे येणार नाहीत. सूर्य कधीच आदित्य एल-१ च्या नजरेआड होणार नाही. सूर्याच्या तापमानातील चढ-उतार, सौरवारे व वादळे, चुंबकीय लहरी आदींचा अभ्यास या यानावरील सात उपकरणे पुढची पाच-दहा वर्षे करीत राहील.

विशेषत: पृथ्वीवर नैसर्गिक संकटे आणणाऱ्या, हवामानावर बरे-वाईट परिणाम घडविणाऱ्या सौरवादळांची आगाऊ सूचना काही तास तरी आधी मिळेल. कारण, प्रकाशवर्षांच्या गणिताने एल-१ टापूपासून पृथ्वीचे अंतर अवघे पाच प्रकाश सेकंद आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे सोहो यान तिथे आदित्यची प्रतीक्षा करीत असेल. ही छोटी वेधशाळा तिथे १९९६ पासून कार्यरत आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ घेऊन निघालेल्या पीएसलव्ही अग्निबाण उड्डाणाच्या निमित्ताने इस्रोच्या या गगनभरारीच्या तपशिलात भरपूर चर्चा झाली आहे. त्यांची पुनरुक्ती करण्यापेक्षा इतकेच म्हणता येईल, की ब्रह्मांडाच्या पोकळीत कोट्यवधी किलोमीटर अंतरावर पोहोचण्याचे तंत्र व विज्ञान भारताने पूर्णपणे आत्मसात केेल्याबद्दल हे शिक्कामोर्तब आहे. प्रारंभी भारत त्यात थोडा मागे होता; परंतु, चंद्रयान-३ च्या रूपाने इतरांना जमले नाही ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रमला उतरवून ती पिछाडी भारताने सव्याज भरून काढली. त्या यशाने आत्मविश्वास व उत्साह कैकपटीने वाढलेल्या शास्त्र-तंत्रज्ञांनी सूर्यावरील मोहिमेचा मुहूर्त काढला.

आता, चंद्रयान-३ व आदित्य एल-१ या दोन यशस्वी मोहिमांचा वेगळ्या अंगाने विचार करायला हवा. विशेषत: ग्रहदशा किंवा त्यासारख्या अवैज्ञानिक गोष्टींमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांच्या दृष्टिकाेनात बदल होईल, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा लागोपाठच्या यशस्वी मोहिमांचा एक अप्रत्यक्ष फायदाही हाच असतो. जगातील प्रगत, विकसित राष्ट्रांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींचा वैज्ञानिक विचार करण्याची जी स्थिती दिसते, तिच्यामागे अशा अंतराळ किंवा सागरी मोहिमांचे मोठे योगदान आहे. विशेषत: युरोप खंडातील देशादेशांत शतकानुशतके सागरी मोहिमांची एक स्पर्धाच होती. पिढ्यांमागे पिढ्या अशा मोहिमांवर निघालेल्या जगाने पाहिल्या. त्यातून महासागराचा, निसर्गाचा अभ्यास वाढला. एकेका राष्ट्राच्या जगाच्या काेनाकोपऱ्यात वसाहती झाल्या. तिथल्या नोकऱ्यांच्या निमित्ताने शिक्षणाची दिशा बदलली. आधुनिक जगाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. तिला पुढे औद्योगिक क्रांतीचे बळ मिळाले. उद्योगांमधील रोजगाराच्या निमित्ताने विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. रशिया व अमेरिकेमधील शीतयुद्धादरम्यान या दोन्ही देशांत अंतराळ मोहिमांची स्पर्धा दिसली. सोव्हिएत युनियनने सुरुवातीला अमेरिकेला मागे टाकले.

अमेरिका इरेला पेटला आणि अंतराळ विज्ञानाबद्दल जगभर कौतुकमिश्रीत कुतूहल तयार झाले. पारतंत्र्याच्या बेड्या परिश्रमाने तोडलेल्या आणि स्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच भूक व दारिद्र्याचा सामना करणाऱ्या भारतासारख्या गरीब देशालाही या क्षेत्रात उतरावे लागले. सुरुवातीच्या काळात केवळ अवकाश मोहिमाच नव्हे तर संरक्षण सिद्धतेसह सगळ्याच क्षेत्रात रशिया भारताचा साथीदार होता. आता भारत या दोन्ही, तसेच जपान, चीन व युरोपीय संघ या महासत्तांना आव्हान देत आहे. चंद्र व सूर्याकडील मोहिमांनी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता या क्षेत्रात अधिक प्रमाणात रोजगार तयार होतील, नवी दालने खुली होतील. त्या संधींवर स्वार होण्यासाठी नवी पिढी त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण घेऊ लागेल. आपोआप ती वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला लागेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे एकूणच भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल. आदित्यला शुभेच्छा देताना अशी अपेक्षा नजीकच्या भविष्यकाळात ठेवायला हरकत नाही.

Web Title: Pragyan sleeps, Aditya wakes up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.