प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक हटके नेता...
By यदू जोशी | Published: April 1, 2024 12:17 PM2024-04-01T12:17:37+5:302024-04-01T12:18:55+5:30
Prakash Ambedkar: मोठ्या राजकीय पक्षांतील नेत्यांचे मोठे होणे यात त्यांचे अन् पक्षाचेही योगदान असते; पण जेव्हा एखादा नेता अशा बड्या पक्षाच्या सावलीपेक्षा स्वत:ची वाट तयार करतो, पक्षाला आणि स्वत:लाही टिकवत पुढे जातो तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित होते.
- यदु जोशी
मोठ्या राजकीय पक्षांतील नेत्यांचे मोठे होणे यात त्यांचे अन् पक्षाचेही योगदान असते; पण जेव्हा एखादा नेता अशा बड्या पक्षाच्या सावलीपेक्षा स्वत:ची वाट तयार करतो, पक्षाला आणि स्वत:लाही टिकवत पुढे जातो तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. आपली सावली आपणच तयार करणारे असेच एक नेते आहेत, ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू हा समृद्ध वारसा त्यांच्याकडे आहेच; पण तेवढ्या पुण्याईवर न जगता त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकर सोडून सगळे मोठे नेते या ना त्या पक्षाच्या छत्रीखाली गेले. आंबेडकर यांनी ‘अकेले के दम पे’ आधी भारिप, मग बौद्ध महासभा, भारिप-बहुजन महासंघ आणि नंतर वंचित बहुजन आघाडी असे स्वत:चे पक्ष पुढे नेले. विद्वत्ता, वाचन, वक्तृत्व, जगभरातील घडामोडींचा सखोल अभ्यास हे त्यांचे गुणविशेष. इथियोपियापासून इसापूरपर्यंतचे सगळे संदर्भ त्यांना तोंडपाठ. तात्त्विक वादात ते भल्याभल्यांना हरवू शकतात. कोणाबद्दल गॉसिपिंग करणे, खिल्ली उडवणे हे त्यांच्या स्वभावात नाही. त्यांचा मुलगा सुजातही परिपक्व नेत्याप्रमाणे तयार होत आहे. पत्नी अंजलीताई या सतत पक्षकार्यात व्यग्र असतात.
केवळ बौद्ध समाजाला घेऊन पुढे जाणारा रिपब्लिकन पक्ष टिकणार नाही हे लक्षात घेत त्यांनी दलित-बहुजन अशी मोट बांधली आणि अकोला पॅटर्न दिला; पण स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार निवडून आणण्यात त्यांना सर्वदूर यश आले नाही. आज तर अकोला जिल्ह्यातही त्यांचा आमदार नाही. ऑगस्ट १९८० मध्ये तत्कालीन स्थानिक रिपब्लिकन नेत्यांनी त्यांची सभा अकोल्यात घेतली आणि तेथून पुढे ते अकोल्याचेच झाले. अकोला जिल्हा परिषद आज त्यांच्याकडे आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आणि त्याचवेळी भाजपच्याही विरोधातील राजकारण करणारे आंबेडकर मतविभाजन करतात आणि त्याचा फायदा भाजपला होतो. एका अर्थाने ते भाजपची टीम बी आहेत असा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला; अर्थात त्यासाठीचे काही पुरावेदेखील आहेतच, पण त्याची तमा न बाळगता ते दोघांपासून अंतर ठेवत राहिलेे; मात्र भाजपची बी टीम असल्याच्या प्रचाराचा त्यांना फटका बसला. ते बरेचसे अनप्रेडिक्टेबल आहेत. महाविकास आघाडीशी चर्चेदरम्यान याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाच आहे. ते कधी कम्युनिस्टांबरोबर गेले, कधी काँग्रेससोबत तर कधी एमआयएमसोबतदेखील. भाजपच्या इशाऱ्यावर त्यांचे राजकारण चालते हा आरोपही नेहमीच होतो; मात्र भाजप-मोदींचा पराभव हेच मुख्य लक्ष्य असल्याचे सांगत आता ॲड.आंबेडकर दंड थोपटून उभे राहिले आहेत.
शक्तिशाली भाजप आणि त्यांना आव्हान देणारी महाविकास आघाडी या दोन्हींना आंबेडकरांची धास्ती कुठे ना कुठे नक्कीच वाटते. ते वेगळे लढावेत असे भाजपला मनोमन वाटणे अन् ते आपल्यासोबत यावेत म्हणून महाविकास आघाडी अजूनही आतूर असणे हीच त्यांची ताकद आहे.
गेल्या काही निवडणुकांत आंबेडकर यांना व्यक्तीश: सातत्याने पराभव पत्करावा लागला आहे. स्वत: निवडून येण्याबरोबरच पक्षाचे यश विस्तारणाचे मोठे आव्हान आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर असेल.