प्रकाश आंबेडकरांचा ‘ओबीसी’ जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:24 AM2018-02-01T00:24:53+5:302018-02-01T00:27:00+5:30

अकोल्यात २९ जानेवारी रोजी आयोजित ओबीसी मेळाव्यात, सामाजिक अभियांत्रिकीच्या मार्गावर कायम असल्याचे संकेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिले. परंपरागत समर्थकांना आणखी भक्कमपणे आपल्या बाजूने उभे करतानाच, ओबीसी दुरावणार नाहीत, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत.

 Prakash Ambedkar's 'OBC' Jagar! | प्रकाश आंबेडकरांचा ‘ओबीसी’ जागर !

प्रकाश आंबेडकरांचा ‘ओबीसी’ जागर !

Next

- राजेश शेगोकार

कोरेगाव-भीमा प्रकरणात आक्रमक भूमिका घेत, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी उभ्या महाराष्टÑाचे लक्ष वेधले. त्यांच्या आवाहनानुसार राज्यभरात कडकडीत बंद पाळल्या गेला. काही ठिकाणी हिंसक वळणही लागले. त्या आंदोलनामुळे दलित चळवळीचे नेते म्हणून अ‍ॅड. आंबेडकरांच्या नावावर , पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले; परंतु आंदोलनाची तीव्रता पाहता, बहुजन समाज अ‍ॅड. आंबेडकरांपासून दूर जाईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. या पाशर््वभूमीवर, गत सोमवारी अकोल्यात ओबीसी मेळावा घेऊन, सामाजिक अभियांत्रिकीचा ‘अकोला पॅटर्न’ भक्कम करण्याचा प्रयत्न अ‍ॅड. आंबेडकरांनी केला.
हक्काच्या दलित मतपेढीला ओबीसी मतांची जोड देत, सत्ता सोपान गाठण्याचा यशस्वी प्रयोग, अकोला जिल्ह्यात अ‍ॅड. आंबेडकरांनी केला. ‘अकोला पॅटर्न’ नावाने ओळखल्या जाणाºया या प्रयोगाचे अपत्य म्हणजे भारिप-बहुजन महासंघ! या प्रयोगाने १९९० ते २००४ या कालावधीत सुवर्णकाळ अनुभवला. आंबेडकर या नावामुळे दलित समाजावर असलेली पकड आणि सोबतीला अठरापगड जातींची बांधलेली मोट, यामुळे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा, अशा प्रत्येक राजकीय पटलावर यश लाभले. गेल्या काही वर्षात मात्र अ‍ॅड. आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला थोडी घरघर लागली. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर १९९९ नंतर सलग तीनदा लोकसभेच्या अकोला मतदारसंघात पराभूत झाले. अकोला जिल्हा परिषद अजूनही त्यांच्या ताब्यात असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघात यश लाभले. आता पुन्हा एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पाशर््वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
कोरेगाव-भीमा प्रकरण ही अ‍ॅड. आंबेडकरांच्या नव्या डावाची नांदी होती. परंपरागत मतपेढी मजबूत करतानाच, ओबीसी समाज दुरावणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. विकासाच्या मुद्यावर भाजपाला आलेले अपयश, दलितांवरील वाढते हल्ले व अत्याचार, ओबीसींना मिळालेल्या २७ टक्के आरक्षणाचे खरे स्वरूप, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ५४० कोटींवरून केवळ ५८ कोटींवर आणण्याचा प्रकार, वाढता धार्मिक उन्माद, रा. स्व. संघाचा छुपा ‘अजेंडा’ अशा मुद्यांचा दारूगोळा घेऊन, अ‍ॅड. आंबेडकरांनी रणशिंग फुंकले आहे.
दुसरीकडे भाजपाच्या विरोधात असलेल्या गैर राजकीय मंचांवरही त्यांचा वावर वाढला आहे. हे सारे प्रयोग करताना, गत काही निवडणुकांमध्ये ओबीसी समाज आपल्यापासून का दूर गेला, यासंदर्भात आत्ममंथन करणेही गरजेचे आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी मोठे केलेले नेते स्वप्रतिमा आणि स्वहितात अतिव्यस्त झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमधला संवाद तुटला आहे. परिणामी अ‍ॅड. आंबेडकर आले की गोळा होणारा गोतावळा त्यांनी अकोला सोडताच पुन्हा विखरतो.
एकीकडे काँग्रेस अ‍ॅड. आंबेडकरांना जवळ करण्यासाठी उत्सुक आहे, तर दुसरीकडे ते स्वत: तिसरा पर्याय उभा करण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी ओबीसींचा जागर करताना ते दुरावणार नाहीत याची काळजी घेतल्यास, ‘अकोला पॅटर्न’चा सुर्वणकाळ परतू शकतो.

 

Web Title:  Prakash Ambedkar's 'OBC' Jagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.