अकाली एक्झिट ! कमी वयातील नेत्यांच्या मृत्यूनंतर.. घुसमटवून टाकणारा अस्वस्थ शोध !
By सचिन जवळकोटे | Published: March 14, 2023 07:31 PM2023-03-14T19:31:05+5:302023-03-14T19:31:14+5:30
लगाव बत्ती...
सचिन जवळकोटे
गल्लीतला साधा कार्यकर्ता जेव्हा गावातला नेता बनतो; त्या पाठीमागं असतो खूप मोठा इतिहास. असते संघर्षाची खूप मोठी कहाणी.. मात्र, लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच जेव्हा त्याची ‘अकाली एक्झिट’ होते, तेव्हा कळवळतो सारा समाज, सारा गाव. चार दिवस जातात त्यांच्याच आठवणीत.. नंतर मात्र सुरू होते त्यांच्या फॅमिलीची परवड. सहानुभूतीची लाट ओसरल्यानंतर मिळू लागतात दाहक अनुभव. बातमी नेहमीच नेत्याच्या मृत्यूची होते. मात्र, नंतरच्या कडवट वास्तवाचा शोध कुणीच घेत नसतं. ते अस्वस्थ काम आजच्या सदरात.
‘सिव्हिल’मागचा ‘पोटफाडी’ परिसर तसा नेहमीच दुर्लक्षित. करून खाणाऱ्या गरीब कामगारांची वस्ती. हातावर पोट असणाऱ्यांची दाटीवाटीनं गर्दी. याच टापूतली ‘खड्डा तालीम’ सोलापूरकरांना माहीत झाली. ‘मेंबरभाऊ’मुळं. होय..‘कामाठी’च्या ‘सुनीलभाऊं’मुळं. शून्यातून विश्व निर्माण करणारा हाडाचा कार्यकर्ता. आयुष्यभर किती माणसं जोडली होती, याची प्रचिती आली ‘भाऊं’च्या अंत्ययात्रेत. स्मशानयात्रेत ढसाढसा रडणारी मंडळी पाहून चक्रावले नातेवाईकही. चोवीस तास कार्यकर्त्यांमध्ये वावरणाऱ्या ‘भाऊं’ना दहा वर्षांपूर्वीच ‘शुगर’ डिटेक्ट झालेला. सोबतीला ‘बीपी’चाही त्रास. त्यांना या आजारांचं गांभीर्य कळालं नाही की एकदाच मिळणाऱ्या आयुष्याची किंमत समजली नाही, कुणास ठावूक.. त्यांनी स्वत:च्या तब्येतीकडं कधी लक्षच दिलं नाही. मात्र, त्यांच्या पत्नी ‘सुनीतावहिनी’ अलर्ट होत्या. घरातच ‘शुगर-बीपी’ चेक करण्याच्या मशिनरी आणून ठेवल्या. वेळोवेळी चेक करण्यावर स्वतः लक्ष देऊ लागल्या. ‘भाऊं’ची शुगर कधी तीनशे निघायची, तर कधी साडेतीनशे. त्रास झालाच तर पोटात गोळी जायची, अन्यथा स्ट्रीप कोनाड्यातच पडून राहायची.
पंधरा दिवसांपूर्वी मात्र त्यांना जास्त त्रास होऊ लागला, तेव्हा ते स्वत: चालत जाऊन ॲडमिट झाले. त्यावेळी कोणाला वाटलंही नाही की तिसऱ्या दिवशी त्यांची ‘डेडबॉडी’च ॲम्ब्युलन्समधनं घरी आणावी लागेल. हॉस्पिटलमध्ये शुगर चारशेच्या वर पोहोचली, तेव्हा त्यांनी पत्नीजवळ इच्छाही व्यक्त केेलेली, ‘मुलांना बोलावून घे.. मला त्यांना बघायचंय,’ मात्र मुलं येईपर्यंत ते कोमात. व्हेन्टीलेटरवर. गॉन केस. नो चान्स.
कालच ‘भाऊं’चा तेरावा झाला. त्यांच्या भल्यामोठ्या फोटोसमोर ‘सुनीतावहिनी’ एकुलत्या एक मुलासह बसलेल्या. नजर शून्यात. भवितव्य अंधारात. मुलगा ‘शिवा’ यंदा बारावीला होता. ‘पप्पां’च्या जाण्यानं त्याची परीक्षा अर्धवटच झालेली. त्याला एक बहीणही. शिवाय दोन काकांची चार भावंडंही याच घरात. दोन्ही बंधू वारल्यानंतर ‘सुनीलभाऊं’नी या चारही मुलांना पोटच्या लेकरागत सांभाळलेलं. अशी सहा पोरं घेऊन ‘सुनीतावहिनीं’ना आता जगायचंय. घरातला कर्ता पुरुष अकस्मात गेलेला. त्यांचा बिझनेसही उघड्यावरचा. पार्टीतलेच कैक दुश्मन या धंद्यावर टपून बसलेले. 'दोनशे टपऱ्यांचं साम्राज्य' कसं टिकवायचं, याहीपेक्षा 'सहा लेकरांचा संसार' चालवायचा कसा ? हा प्रश्न उभा ठाकलेला.
विशेष म्हणजे पोटचा मुलगा ‘शिवा’ म्हणतो, ‘मी या धंद्यात जाणार नाही. डिप्लोमा करून दुसरा बिझनेस करेन.’ मात्र ‘भाऊं’च्या मोठा पुतण्या ‘आकाश’ जुना धंदा सांभाळण्यासाठी तयार. दुसरा इस्टेटीतल्या बिझनेसमध्येही उतरायच्या मानसिकतेत. दिसायला सारं सोप्पं असलं तरी सारीच गुंतागुंत. रोज हसत-खेळत कार्यकर्त्यांमध्ये रमणाऱ्या नेत्याची अशी अकस्मात एक्झिट झाल्यानं हतबल झालेल्या ‘वहिनी’ केवळ सातवी पास. मात्र राजकारणातल्या बारीक-सारीक गोष्टी आजपावेतो ‘भाऊं’नी म्हणे रोजच्या रोज सांगितलेल्या. धंद्यातल्या खाचा खळगाही माहीत झालेल्या. त्यामुळं भविष्यात ‘भाऊं’चा राजकीय वारसा चालविण्यासाठी ‘वहिनी’ पुढं आल्या तर वाटायला नको आश्चर्य.
गेल्या वर्षी सोलापूरच्या कार्यकर्त्यांसाठी एक धक्कादायक ब्रेकिंग न्यूज मिळालेली. भल्या सकाळी फॉरेस्ट भागातील ‘गौरव बाबा’ यांच्यासह चार तरणेबांड कार्यकर्ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भयंकर ॲक्सिडेंटमध्ये चिरडले गेले. ‘खरातां’च्या फॅमिलीवर जणू आकाशच कोसळलं. मुंबईतल्या नेत्याच्या ‘वाढदिवसा’साठी चाललेल्या या चौघांची ‘पुण्यतिथी’ साजरी करण्याची दुर्दैवी वेळ नातेवाइकांवर आलेली. ‘गौरव’चे वडील वकील. भावाचीही प्रॅक्टीस सुरू. पत्नी ‘रचना वहिनी’ वयाच्या पस्तीसाव्या वर्षी रिकामं कपाळ घेऊन समाजात वावरू लागल्या. त्यांना दोन छोट्या मुली. गार्गी अन् रिद्धी. मोठी आठ वर्षांची, धाकटी पाच वर्षांची.
‘रचना वहिनी’ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टिचर. तेही परमनंट. त्यामुळं संसाराचा गाडा चालविण्यासाठी होत नसेल आर्थिक दमछाक; मात्र वयाच्या पस्तीसाव्या वर्षी दोन लहान पोरी घेऊन जगतानाच्या मरणयातना जगाला कशा कळणार ? इवलीशी रिद्धी आजही विचारते, ‘बाबा कुठे गेलेत.. कधी येणार ?’ ..तेव्हा ‘रचना वहिनी’ काहीतरी उत्तर देऊन विषय बदलविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात, ‘ते ना गावाला गेलेत, येतील लवकरच...’ हे ऐकताना मोठीच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन विचित्र. कारण तिला माहितेय ‘बाबा नेमकं कुठं गेलेत.’ आता या ‘रचना वहिनी’ अजून किती दिवस अशी खोटी-खोटी उत्तरं देणार ? कारण त्यांच्या डोळ्यातून नकळत टपकणारे अश्रू एक ना एक दिवस घात करणारच.
दोन-अडीच वर्षांपूर्वी ‘कोरोना’ लाटेत अशाच एका नेत्याची एक्झिट झालेली. नाव ‘करण’. परिसरातल्या पोरांची शरीरं तगडी व्हावीत म्हणून स्वखर्चानं ‘जीम’ काढून देणारे हे ‘करणअण्णा’ या विषाणूसमोर मात्र पुरते दुबळे ठरले. दोन दिवसांत फ्रेश होऊन येतो म्हणून गेले.. घरासमोरून थेट अंत्ययात्राच निघाली. त्यांना दोन मुली. एक छोटा मुलगा. पूर्वी कॉन्ट्रॅक्टरची कामं घेत असताना जेसीबीही होता. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर ‘अनिता वहिनीं’नी जेसीबी भाड्यानं चालवायला दिला. इन्कम तर सोडाच हाती दुरुस्तीचं भलं मोठ्ठं बिल आलं. नंतर काही दिवस हक्काच्या रस्त्यावर लावून ठेवलेल्या या जेसीबीचे पार्टही चोरीला जाऊ लागले. काचा फुटू लागल्या, विश्वास तडकू लागला.. तसं नाइलाजानं टाकावं लागलं फुकून.
आज ‘म्हेत्रें’च्या दोन्ही मुली इंग्लिश स्कूलमध्ये. वर्षाला लाखभर फी. विकलेल्या जेसीबीचे पैसे आयुष्यभर थोडंच पुरणार ? पूर्वी पती असताना राजकारणात ‘मेंबर’ झालेल्या ‘अनिता वहिनीं’ना आता पस्तीशीत मात्र एकच प्रश्न सतावतोय, ‘राजकारण गेलं चुलीत. या तिन्ही मुलांना कसं मोठं करायचं ?’
---