उदयनराजेंसमोरची भाजपची हुजरेगिरी अन् मुजरेगिरी लाज आणणारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 05:19 AM2019-09-19T05:19:55+5:302019-09-19T09:23:04+5:30

जहाज बुडताना प्रथम त्यातील उंदीर पळतात, पण ते इतिहास घडवत नाहीत, हे नितीन गडकरींचे सुभाषित हे पळते उंदीर लक्षात घेतील, याची शक्यताही नाही.

The present form of BJP's euphemism is all but signifying democracy | उदयनराजेंसमोरची भाजपची हुजरेगिरी अन् मुजरेगिरी लाज आणणारी!

उदयनराजेंसमोरची भाजपची हुजरेगिरी अन् मुजरेगिरी लाज आणणारी!

googlenewsNext

प्रणाम ईश्वरास केला जातो, गुरूंनाही नमस्कार केला जातो, पण मुजरे त्यांनाही केले जात नाहीत आणि हुजरेगिरी मंदिरातही होत नाही. लोकशाही असणाऱ्या प्रगत राज्यात जुन्या राजेशाहीचे अनेक नवे रूप आकाराला येत असेल तर ती आपली प्रगती नसून अधोगती आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
सत्ताधारी युतीने आपल्या घराची दारे उघडताच, त्यात आपल्या अनेक पिढ्यांच्या इभ्रतींच्या पेट्या घेऊन घुसायला निघालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची व अखेर छत्रपतींची झुंड निघालेली महाराष्ट्राने पाहिली व ती पाहण्याचे त्याचे दुर्दैव अद्याप संपलेले नाही. या झुंडीत उपमुख्यमंत्रिपदे भूषविणारी, अनेक वर्षे खासदार व आमदार राहिलेली, मुख्यमंत्री म्हणून जगलेली माणसे होती. याने जनतेला तेवढेसे आश्चर्य वाटले नाही. कारण ही माणसे पूर्वीही कधी कुणास विश्वसनीय वाटली नव्हती, परंतु छत्रपती उदयनराजे, शिवेंद्रराजे व रामराजे यासारखे स्वत:ला छत्रपती म्हणविणारे व थोरल्या महाराजांचा वंश सांगणारे लोक त्यांत दिसल्याचे पाहून त्यांना मराठी माणसांच्या निष्ठावान इतिहासाविषयीच शंका वाटू लागली. तसे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही गरीब मावळे त्यांच्याशी एकनिष्ठ असताना, त्यांचे सेनापती व सरदार त्यांना सोडून गेल्याचे आपण इतिहासात वाचतोच. ही माणसे आल्याने ज्या भाजपची घरे भरली, त्या पक्षाला आनंद व्हावा, हे स्वाभाविक होते.


मात्र, यांची जाण्याची त-हा जेवढी हास्यास्पद, तेवढीच त्यांचे स्वागत करणा-या सत्ताधाऱ्यांची वृत्तीही लाचारीची व लोकशाहीला लाज आणणारी होती. देश स्वतंत्र झाला, तेव्हाच सारे राजे-रजवाडे संपले आणि देशाचा सामान्य नागरिकच त्याचा खरा राजा झाला. तरीही उदयन राजाचे स्वागत करताना राज्याचे मुख्यमंत्री स्वत:ला ‘मी त्यांचा मावळा’ असे म्हणाले असतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना लवून मुजरा केला असेल, तर तो प्रकार मात्र संतापजनक व लोकशाहीचे सारे संकेत मातीत घालणारा होता. एके काळी शिवसेनेच्या नेत्यांची छायाचित्रे अशी येत. त्यात प्रत्यक्ष बाळासाहेब, उद्धव व राज हे ‘राम पंचायतनासारखे’ उच्चासनावर बसलेले, तर त्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकसभेचे सभापती, आमदार व खासदार त्यांच्या भालदार व चोपदारांसारखे त्यांच्या मागे दाटीवाटीने उभे असत. शिवसेनेतील ती छायाचित्रांची परंपरा गेली असली, तरी हुजरेगिरी कायम राहिली आहे. भाजपत ती त्यांच्या जनसंघावतारातही नव्हती. मोदी व शहा यांनीही ती आणली नाही. त्यामुळे भाजपचे आताचे हुजरेगिरीचे रूप खास महाराष्ट्रीयन असल्याचे व त्यांची आपल्याला खंत असल्याचे जनतेने सांगितले पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले बाणेदार मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही राजेशाहीवर त्यावेळी केलेली टीका वादग्रस्त ठरली आणि तेव्हा काहींनी त्यांचा राग धरला होता. पुढे कोल्हापुरात त्यांचे अभूतपूर्व स्वागतही झाले होते. यशवंतराव स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी व वेणुताईंनी गो-या सोजिरांच्या लाठ्या खाल्ल्या होत्या. ते स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त होते. आताची माणसे या सा-यापासून दूर राहिलेली व सत्तेचीच चटक असणारी आहेत.

ती मुजरे करतील, हुजरेगिरी करतील, पायघड्या घालतील आणि स्वत:ला त्यांचे सेवकही म्हणवून घेतील. हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आहे, सावरकर आणि आंबेडकरांचा आहे. त्या आधीही तो ज्योतिबा आणि आगरकरांचा होता. त्यांनी या मुज-यांच्या परंपरा मोडीत काढल्या व सामान्य माणसांचा स्वाभिमान जागविला. ती माणसे आताचे मुजरे व मावळेगिरी पाहत असतील, तर ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणून उद्वेग व्यक्त करीत असतील, पण सत्तेला आणि सत्तेलाच चटावलेल्यांना याची लाज वाटत नसते. ‘कुणी निंदा, कुणी वंदा आमचा सत्तेचाच धंदा’ असे त्यांचे वर्तन असते. एके काळी हे काँग्रेसनेही केले, पण तेव्हाही ते तेवढेच लज्जास्पद होते. त्याचे अनुकरण करण्यात हशील नाही व त्याचा आधार घेऊन आपले समर्थनही कुणाला करता येणार नाही. आता जनतेने तुम्हाला सत्ता दिली आहे. मान वाकवायची असेल, तर ती जनतेसमोर वाकवा. जुन्या राजे-रजवाड्यांसमोर, न राहिलेल्या छत्रपतींसमोर, मंत्री व आमदारांसमोरही ती वाकत असेल, तर तिला ताठपणा नाही आणि तुम्हालाही कणा नाही, असेच म्हणावे लागेल. जहाज बुडताना प्रथम त्यातील उंदीर पळतात, पण ते इतिहास घडवत नाहीत, हे नितीन गडकरींचे सुभाषित हे पळते उंदीर लक्षात घेतील, याची शक्यताही नाही.

Web Title: The present form of BJP's euphemism is all but signifying democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.