भारताचा शैक्षणिक इतिहास उज्ज्वल; वर्तमानाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:09 AM2018-10-17T10:09:00+5:302018-10-17T10:15:20+5:30

भारत देशाचा शैक्षणिक इतिहास उज्ज्वल आहे. नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठे जगविख्यात होती. चरकसंहिता इथली भास्कराचार्य इथले आयुर्वेद भारताचा योगशास्त्राची देण याच भूमीतली. हा महिमा राज्याचे महामहिम सी विद्यासागर राव यांनी लातूरच्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सांगितला.

present situation of education system in India | भारताचा शैक्षणिक इतिहास उज्ज्वल; वर्तमानाचे काय?

भारताचा शैक्षणिक इतिहास उज्ज्वल; वर्तमानाचे काय?

- धर्मराज हल्लाळे

भारत देशाचा शैक्षणिक इतिहास उज्ज्वल आहे. नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठे जगविख्यात होती. चरकसंहिता इथली भास्कराचार्य इथले आयुर्वेद भारताचा योगशास्त्राची देण याच भूमीतली. हा महिमा राज्याचे महामहिम सी विद्यासागर राव यांनी लातूरच्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सांगितला. वर्तमानातील उणीवांचीही जाणीव करून दिली. त्याचबरोबर आपली बलस्थाने सांगितली. एकूणच इतिहास उज्ज्वल; वर्तमानाचे काय हा प्रश्न या परिषदेत चर्चिला गेला. आज शेकडो अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झाली आहेत. यावर्षीच्या प्रवेशप्रक्रियेत अनेक जागा रिक्त राहिल्याचे दिसून आले आहे. हा ताजा संदर्भही राज्यपालांनी दिला. महाविद्यालयांची वाढलेली संख्या आणि शिक्षणाचा दर्जा हे त्यामागचे एक कारण आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी व एकूणच तंत्रशिक्षणाची स्थिती जितके प्रश्न निर्माण करणारी आहे, त्यापेक्षा कैक पटीने पारंपरिक शिक्षणाने प्रश्न निर्माण केले आहेत. बीकॉम व बीएससीच्या पदवीधरांना जी कौशल्य शिक्षणातून मिळतात, त्याआधारे किमान काही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात हजारोंच्या संख्येने कला शाखेची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर पुढे काय हा मोठा प्रश्न आहे. बीएड्, सेट-नेट अन् एकंदर अध्यापन क्षेत्रातील संधी अत्यल्प किंबहुना नगण्य आहे. शिवाय मुक्त विद्यापीठाने ज्या ज्या विषयांना प्रात्यक्षिक नाही असे सर्व विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामुळे नियमित महाविद्यालयात प्रवेश न घेता लाखो पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी बाहेर पडत आहेत. अशावेळी नियमित महाविद्यालयात बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी कोणती वेगळी कौशल्य आत्मसात करता येतात हा प्रश्न आहे़ त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये अमूलाग्र बदल केला पाहिजे़ कला शाखेतील विषयांबरोबरच कौशल्य मिळणाऱ्या विषयांचाही त्यांच्या शिक्षणात अंतर्भाव करण्याची आज वेळ आली आहे. एमए मराठी करणारा विद्यार्थी मुद्रित शोधनाचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. इतिहास शिकणारा विद्यार्थी पर्यटनासंबंधी कौशल्य आत्मसात करू शकतो. भूगोल अभ्यासणारा विद्यार्थी प्रत्यक्ष भूमापन, मृद तपासणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञानार्जन करू शकतो. समाजशास्त्राचा विद्यार्थी उत्तम समुपदेशक बनू शकतो. आज मानसशास्त्रही तितकेच महत्वाचे आहे. एकूणच सर्व कला शाखेतील विषयांना कौशल्याची जोड देणे अथवा तसे अभ्यासक्रम निश्चित करणे विद्यापीठ व महाविद्यालयांची जबाबदारी आहे. शिक्षण तज्ज्ञांचे व धुरीनांचे प्रथम कर्तव्य आहे. आज लाखोंच्या संख्येने बेरोजगारांचे थवे महाविद्यालयातून बाहेर पडत असतील अन् त्यांच्या हाताला काम देऊ शकत नसू तर उद्रेकाची स्थिती का निर्माण होणार नाही. 

भारत देश हा तरूण, युवकांचा देश म्हणून जगासमोर उभा आहे. या देशाचे सरासरी आयुर्मान २९ होत आहे. अशावेळी या तरूणांना उत्तम दर्जाचे, रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करू शकलो नाही तर लोकशाहीवर आपत्ती येईल ही राज्यपालांनी व्यक्त केलेली चिंता सर्वांनाच चिंताग्रस्त करणारी ठरू शकते. उच्च शिक्षणातील नव्या पैलूंवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांचेही लातूरच्या राष्ट्रीय परिषदेतील भाष्य अंतर्मुख करणारे होते. शिक्षणात येणारे नवीन प्रवाह आणि शासनाचे सतत बदलत जाणारे शैक्षणिक धोरण यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था कायम संभ्रमात असतात, हे वास्तव डॉ. विद्यासागर यांनी मांडले. जागतिकीकरणानंतर शिक्षणात गतीने बदल झाले आहेत. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. हे ओळखून शिक्षण संस्था व विद्यापीठांनी तंत्रज्ञानाच्या वेगाची जाण ठेवून अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे हे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन समर्पक आहे़ शहरांमध्ये जे दिसते तिच शैक्षणिक प्रगती नव्हे, स्वातंत्र्यानंतर आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण खेड्यांपर्यंत गेलेले नाही हे माजी कुलगुरू डॉ. आर. के़. काळे यांचे निवेदन अचूक आहे. निश्चितच जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रयोग होत आहेत. दर्जेदार शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. ज्यामुळे डिजिटल शाळा आणि प्रयोगशील शिक्षक बदल घडवत आहेत. मात्र त्याच शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावात वा तालुक्याच्या ठिकाणी दर्जेदार उच्च शिक्षण मिळत नाही हे वास्तव आहे. 

शिक्षणामुळेच मानवाची प्रगती झाली हे सत्य आहे. मात्र आजही जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत भारताचे एकही विद्यापीठ नाही. अशावेळी ज्ञानसंवर्धन, ज्ञानसंक्रमण आणि ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे हा विचार माजी कुलगुरू डॉ.जे. एम. वाघमारे यांनी परिषदेत सांगितला. सद्य:स्थिती मात्र संक्रमणाची आहे. शैक्षणिक धोरण अवलंबिताना शासनही निर्णयांचा गोंधळ करते़ परस्परविरोधी निर्णय घेतले जातात. धरसोड वृत्ती ही शिक्षणात मोठी घसरण करू शकते़. लोकसंख्या आणि त्यातील तरूणांची संख्या लक्षात घेता रोजगारक्षम शिक्षण आणि अभ्यासक्रम हे मोठे आव्हान आहे. ज्यावर सातत्याने मंथन आणि चिंतन झाले पाहिजे.
 

Web Title: present situation of education system in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.