अभिनंदनीय वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:54 AM2019-03-02T05:54:09+5:302019-03-02T05:54:12+5:30

पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले.

Presentable present | अभिनंदनीय वर्तमान

अभिनंदनीय वर्तमान

Next

भारताची लष्करी तयारी आणि आत्मविश्वास पाहता युद्धात आपलेच अतोनात नुकसान होईल ही खुणगाठ पाकिस्तानच्या लष्करी व नागरी राज्यकर्त्यांनी स्वत:शी बांधली असेल. वर्धमानची लगेच सुटका होण्यामागे हे एक कारण आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले. दुपारी दोन वाजता होणारी सुटका तब्बल सात तास उशीरा झाली. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण पुढे करण्यात आले. अर्थात अभिनंदन जिवंत परत आले यातच देशवासियांना आनंद झाला यात शंका नाही. भारताच्या वायुदलाची क्षमता तसेच परराष्ट्रीय डावपेच या दोन्हींचा समन्वय होऊन वर्धमान यांची सुटका झाली. यातील परराष्ट्रीय डावपेचांचा मुद्दा समजण्यासारखा असला तरी वायुदलाची क्षमता या पैलूचा थोडा तपशील देणे आवश्यक आहे. भारताच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने २७ अत्याधुनिक विमाने घेऊन हल्ला केला. भारताचा हवाई तळ उद्ध्वस्त करण्याचा इरादा त्यामागे होता. परंतु, भारतीय वायुदलाने ज्या तत्परतेने व सफाईने घुसखोर विमानांवर प्रतिहल्ला केला तो पाहून पाकिस्तानचे लष्करी अधिकारी नक्कीच चकित झाले असतील. मिग-२१ सारखी कालबाह्य होणारी भारताची विमाने अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या एफ -१६ सारख्या अत्याधुनिक विमानांना पाडू शकतात हे पाकिस्तानसाठी धक्कादायक होते. पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणाऱ्या भारतीय विमानांचा पाकिस्तानला सुगावा लागेपर्यंत भारतीय विमाने परतलीही होती. पाकिस्तान वायुदलाची नाचक्की करणारी ही घटना होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताच्या मिग विमानांनी झटका दिला. या हवाई झटापटीत दुर्दैवाने वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले असले तरी पकडल्यानंतर वर्धमान यांनी दाखविलेले धैर्य, युद्धकैदी झाल्यानंतरही त्यांच्या देहबोलीतून दिसणारा आत्मविश्वास याचा जगावर प्रभाव पडला.

वर्धमान यांची सुटका करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणला होता. अमेरिका, चीन आणि प्रसंगी मुस्लीम राष्ट्रे यांच्या आधारावर पाकिस्तानने भारताविरुद्धचे घातपाती उद्योग गेली कित्येक वर्षे सुरू ठेवले होते. या मित्रराष्ट्रांपैकी एकानेही या वेळी पाकिस्तानला थारा दिलेला नाही. अमेरिकेने तंबी दिली आणि चीननेही सबुरीचा सल्ला दिला. पण सर्वात अधिक धक्का मुस्लीम राष्ट्रांच्या आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनने भारताला दिलेल्या आमंत्रणावरून बसला. या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला प्रथमच भारताला निमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले. आयओसी ही फार वजनदार परिषद नसली तरी मुस्लीम राष्ट्रांमध्ये त्याचे महत्त्व आहे. मुस्लीम नसूनही सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला भारत हा देश असल्याने भारतालाही सहभागी होण्यास द्यावे ही मागणी पाकिस्तानने कायम फेटाळून लावली. भारतातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व पाकिस्तानच करतो असा पाकिस्तानचा दावा होता. तो आता संपल्यामुळे पाकिस्तानचा चरफडाट झाला आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा हा मोठा विजय आहे हे त्यांच्या अन्य अनेक बाबींवर टीका करतानाही मान्य केले पाहिजे. आयओसीने भारताला दिलेले आमंत्रण पाकिस्तानला इतके झोंबले की पाकिस्तानने परिषदेवर बहिष्कार टाकला. आयओसीने तो झुगारला हे विशेष.

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे परिषदेतील भाषण हे भारताच्या आजपर्यंतच्या धोरणाला अनुसरून होते. भारताचा लढा दहशतवादाविरु द्ध आहे, कोणत्या धर्माविरु द्ध नाही हे त्यांनी स्पष्ट केले. सर्व धर्म एकाच ठिकाणी घेऊन जातात या भारताच्या चिरंतन तत्त्वज्ञानाचा उल्लेख त्यांनी ऋग्वेदातील ‘एकं सद् विप्रा बहुदा वदन्ति’ या वचनातून केला. एक अब्जाहून अधिक भारतीयांची व त्यातील साडेअठरा कोटी मुस्लिमांची प्रतिनिधी म्हणून मी इथे आले आहे, असे सांगून भारतातील मुस्लीमही भारताच्या बहुविध संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत, असे सांगितले. आखाती देश व यूएई यांच्याशी भारताचे संबंध दृढ होत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. अर्थात ओआयसीच्या या आमंत्रणामागे व्यापारी हेतूही आहेत. सौदी अरेबिया किंवा यूएई अशा राष्ट्रांना भारताचे व्यापारी महत्त्व लक्षात आले आहे. जिहादला मदत करून राष्ट्रे चालविता येत नाहीत हे त्या देशांच्या लक्षात आले आहे. पाकिस्तानच्या हे अद्याप लक्षात आलेले नाही हे त्या देशाच्या नागरिकांचे दुर्दैव. जगातील वारे बदलत आहे व चालू वर्तमान हे भारतासाठी अभिनंदनीय आहे.

Web Title: Presentable present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.