पोलीस विभागातील एका बदलीची किंमत....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:12 PM2018-10-22T17:12:26+5:302018-10-22T17:18:20+5:30

एकीकडे शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी व असुरक्षितता यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे कर्तव्यतत्परता दाखवलेल्या निरीक्षकाची तडकाफडकी बदली होते. हे चित्र नक्कीच भुवया उंचवायला कारणीभूत ठरते...

Price of a replacement in the police department .... | पोलीस विभागातील एका बदलीची किंमत....

पोलीस विभागातील एका बदलीची किंमत....

Next
ठळक मुद्देदबावाला बळी पडून मिलिंद गायकवाड यांची बदली करण्याचा आल्याचा आरोप पुणे पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीत राजकीय हस्तक्षेप ? कोणताही अधिकारी सत्ताधाऱ्यांपुढे कायद्याचा आब कसा ठेवणाऱ..गल्लीतील नेतेही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना धमक्या देऊ लागले नाही तर नवल़... एका बदलीची मोठी किंमत पुणे आणि संपूर्ण पोलीस दलाला चुकवावी लागणार

-विवेक भुसे-  
पोलीस मॅन्युअलमध्ये सांगितले जाते की, पोलिसांकडे फिर्याद आली की त्यांनी ती दाखल करुन घ्यावी व नंतर त्याचा तपास करावा़ तपास करताना तक्रार खोटी आढळली अथवा पुरेसा पुरावा नसेल तर ती तक्रार रद्द करता येते. तसेच खोटी फिर्याद दिली म्हणून फिर्यादीवर गुन्हा दाखल करता येतो़ जाहीर भाषणातून वरिष्ठ अधिकारी असेच सांगत असतात़. पण जेव्हा एखाद्या निरीक्षकाने त्यानुसार वागून गुन्हा दाखल केला तर मात्र, हेच वरिष्ठ ‘राजकीय’ दबावापुढे झुकत चक्क त्या निरीक्षकाची बदली करतात, हे वास्तव नुकतेच समोर आले आहे़. 
 पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची नुकतीच बदली करण्यात आली़. आमदारांवर ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळेच भाजपच्या दबावाला बळी पडून गायकवाड यांची बदली करण्याचा आल्याचा आरोप करुन विरोधकांनी मोर्चे काढले़. पोलिसांनी प्रशासकीय कारणामुळे बदली केल्याचे सांगत सारवा सारव केली़. पण, या बदलीची किती किंमत पुणे शहर पोलीस दलाला चुकवावी लागेल, याचा थोडाही विचार झालेला दिसून येत नाही़. पोलीस आयुक्त डॉ़ के़. व्यंकटेशम यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये पुणेकरांमध्ये चांगले वातावरण तयार केले होते़. ज्याने कामगिरी केली, त्याला श्रेय देण्याचा त्यांचा प्रयत्न होता़. महापालिका व इतर संस्थांना बरोबर घेऊन शहरातील ज्वलंत समस्या असलेल्या वाहतूक प्रश्नाला हात घातला आहे़. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलाविषयी एक चांगले वातावरण तयार होऊ लागले होते़. हे सर्व वातावरण एका बदलीने पार बदलून गेले़. त्याचवेळी आमच्याकडे भक्कम पुरावे असल्याचे सांगून महाराष्ट्र बँकेच्या अध्यक्षांसह इतरांना पुणे पोलिसांनी अटक केली होती़. आता त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याचे कारण देत त्यांना या गुन्ह्यांतून वगळण्याची विनंती न्यायालयाला पुणे पोलिसांनी केली आहे़. मग, अटक केली होती, तेव्हाचे पुरावे कोठे गेले असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे़. 
मिलिंद गायकवाड आणि महाराष्ट्र बँकेचे अध्यक्षांबाबत न्यायालयात दिलेला क्लोजर रिपोर्ट या दोन्ही कारणाने पुणे पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीत राजकीय हस्तक्षेप किती होत आहे, हे दिसून आला आहे़. त्यातच गायकवाड यांच्या बदलीचा शहर पोलीस दल आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून निषेध केला आहे़. अनेकांनी आपल्या व्हॉट्सअपवर गायकवाड यांचा फोटो ठेवून बदलीचा निषेध केला आहे़. 
मिलिंद गायकवाड या एका पोलीस निरीक्षकाची बदली इतक्यावरच याकडे पाहता येणार नाही़. जर गुन्हा दाखल करताना त्यांच्याकडून काही तांत्रिक चुका राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करता आल्या असत्या़. पण बदली हा त्यावर पर्याय नव्हता आणि नाही़ यामुळे संपूर्ण पोलीस दलात आणि समाजात जो मेसेज गेला तो अत्यंत चुकीचा आहे़. भाजप आपल्या आमदारासाठी काहीही करु शकते, असे हे त्यांनी या घटनेतून दाखवून दिले आहे़. त्याचा परिणाम समाजावर मोठा झाला आहे़. आपल्याला कोणी वाली नाही, ही भावना समाजात वाढीस लागू शकते़. 
या घटनेमुळे आता कोणताही अधिकारी सत्ताधाऱ्यांपुढे कायद्याचा आब कसा ठेवणाऱ.. दुसरी बाजू पुण्यातीलच नाही तर शहर, जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांचे छोटे मोठे नगरसेवक, नेते यांच्या हातात तर हे कोलीतच मिळाले आहे़. अगोदर आघाडीतील मंत्री पोलीस अधिकाऱ्यांना तुला गडचिरोलीला पाठवितो, अशी धमकी देत होते़. आता गल्लीतील नेतेही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना धमक्या देऊ लागले नाही तर नवल़... 
दुसरीकडे या उदाहरणावरुन कोणता पोलीस अधिकारी दुसऱ्याची बाजू खरी असली तरी सत्ताधारी आमदारच काय साध्या नगरसेवकाविरुद्ध कशाला कारवाई करायचे धाडस करेल़.त्याचबरोबर पोलीस दाबले जातात, हे लक्षात आल्याने आता सर्वच जण सर्वच पातळ्यांवर पोलिसांना दाबण्याचा प्रयत्न करणार, हे वेगळे सांगायला नको़. 
एका आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने जर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली होत असेल तर निवडणुकीची प्रत्यक्ष दंगल अजून लांब आहे़.प्रत्यक्ष निवडणुका काळात सत्ताधारी किती दबाब टाकतील आणि पोलीस त्याखाली किती दबले जातील, अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाली तर त्यात कोणाला गैर वाटणार नाही़.. त्यामुळे एका बदलीची मोठी किंमत पुणे आणि संपूर्ण पोलीस दलाला चुकवावी लागणार आहे़. 

Web Title: Price of a replacement in the police department ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.